विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सळोकीपळो करुन सोडणाऱ्या आणि रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेऊन क्रिकेट रसिकांना चकित करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा ‘मराठमोळा’ गोलंदाज सौरभ नेत्रावळकर यांचा सत्कार समारंभ नुकताच मुंबईतील बोरिवली येथील मल्ल्या वराडकर फ्रेन्डस क्रिकेट क्लब तर्फे बोरिवली येथे रेलनगर रहिवासी असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोरेगांव येथील पाटकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उदय माशेलकर, एअर इंडिया संघाचे माजी कर्णधार शेखर वराडकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार जगदिश आचरेकर, कामगार नेते सदानंद चव्हाण, मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक श्रीकांत दादरकर, ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या समारंभात सौरभ नेत्रावळकर यांच्या शुभहस्ते मल्ल्या वराडकर क्लबच्या युट्युब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. या चॅनल ची निर्मिती राजू देसाई यांनी डिझायनर भक्ती सावंत यांच्या सहकार्याने केली आहे.
यावेळी सौरभ नेत्रावळकर यांनी सुरेख गाणे गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
समारंभाच्या प्रारंभी ज्येष्ठ क्रिकेटपटू दिवंगत पॅडी उर्फ पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सौरभ नेत्रावळकर यांचे पिताश्री नरेश नेत्रावळकर, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजु देसाई, महिला क्रिकेट प्रशिक्षक वैशाली भिडे, संगीत संयोजक भूषण मुळे, उद्योजक गजानन वावीकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या साठ वर्षांवरील क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लबच्या संघाने नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल या संघातील खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच वयाची सत्तरी ओलांडलेल्या क्रिकेटपटूंच्या स्पर्धेची क्लबचे संयोजक रवि मल्ल्या यांनी उद्घोषणा केली.
अध्यक्ष शिरीष वराडकर व पदाधिकाऱ्यांनी रेलनगर रहिवासी असोसिएशनचे पदाधिकारी मोहन माने आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल त्यांना जगण्याची उमेद देणारा हा मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब असल्याचे तसेच वृंदावनात बहरलेले सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व असा गौरवपूर्ण उल्लेख रवि मल्ल्या यांच्या संदर्भात श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी केला आणि विविध आठवणींना उजाळा दिला.
हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकार करणारे अभिनेते अनिल गवस यांच्या समवेत मोहन माने, गिरिधर घाटे, सुरेश साळवी सत्तरी ओलांडलेल्या ‘चिरतरुण’ युवकांनी दिलखेचक गाणी गाऊन अनेकांना संगीताच्या तालावर पाय थिरकविण्यास भाग पाडले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800