Saturday, July 5, 2025
Homeलेखपसरवू या आत्मविश्वासाची लाट

पसरवू या आत्मविश्वासाची लाट

कोरोना कालावधीत पहिली लाट, दुसरी लाट, असं करत आपण खूप काही अनुभवलं. काहींना गमावलं, तर खूप काही शिकलो. या सर्वांमध्ये मधल्या काळात भिती आणि काही तरी आपण हरवत आहोत अशी भावना होती.

पण आता राज्यभर कोरोना नियंत्रणात आल्याने गुदमरलेले श्वास आणि चौकटीच्या आत अडकलेले पाय मोकळे होत आहेत. आपल्या संयमाची आणि सहनशक्तीची प्रत्येकानेच परीक्षा दिली आहे. कोणाची गेलेली नोकरी परत सुरू होतेय तर कोणाचे बंद झालेले छोटे छोटे व्यवसाय सुरू झालेत, चैतन्याचा सळसळता झरा आषाढ सरींनी थोडा का होईना चैतन्यवत केलाय.

असं हे वातावरण असताना निसर्गातील हिरवाई मनात देखील कोठेतरी गारवा निर्माण करु पाहतेय. आणि कोरोनाच्या भितीला हरवत आहे. माणसामाणसांतील जाती-धर्म वर्णांचे भेद गळून एकात्मतेच्या गोफात गुंफून कोरोनाने कोणताही भेदभाव न ठेवता गरीब- श्रीमंत एकच पातळीवर आहेत ही जाणिव करुन देण्याची अनोखी किमया निसर्गताच साधली.

कोरोनाची भिती, झालेले नुकसान कसं भरुन काढायचं ? काहींना तर आयुष्याची नवीन सुरूवात पुन्हा करावी लागत आहे, हे सर्व नव्याने जीवनचक्र सुरू करताना आजुबाजुला दिसतात.

अगदी हातगाडीवर भाजी विक्रेता तर शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवांपासून ते मोठ्या उद्योग समूहाचं झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्याची जशी आव्हाने आहेत तसेच आपल्या समाजातील नागरिकांच्या शारिरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. खूप वेगळ्या परिस्थिती आणि मनस्थितिला आपन सामोरे जात आहोत.

एक व्यक्ती ही समाजाची बहुमोल संपत्ती असते. यास मानव संसाधन म्हणून आपण संबोधतो. कोणत्याही संसाधनाची काळजी आणि गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे कार्य विकास प्रक्रियेत होत असते. आज या मोठ्या कालावधीनंतर गरज आहे, तुमच्या आमच्यासह समाजात आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्याची. एकमेकांच्या जीवनात सहकार्य, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची लहर किंवा लाट पसरवण्याची.

चांगल्या गोष्टी घडवून आणाव्या लागतात तर विरुध्द किंवा नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी काही करण्याची गरज नसते. वाईटावर चांगल्याचा विजय आणि खचलेल्या मनाला आणि उभारी देण्याऱ्या आत्मविश्वासाची लाट पसरवून लहानांपासून मोठ्यापर्यंत आनंदी जीवन निर्माण करणाऱ्या कालावधीसाठी आपण सर्व निमित्तपात्र होवू.

यामध्ये प्रशासनाने पार पाडलेली अविरत जबाबदारी, आरोग्य यंत्रणेच्या उपचारासह प्रसंगी आई वडिल, मुलगा-मुलगी, मित्र अशा भूमिका बजावून कोरोना रुग्णाचे उपचारासह मनोबल वाढवण्याचं जे अनमोल कार्य आहे त्याला तोडच नाही. कारण कोणत्याही कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाजवळ आरोग्य यंत्रणेच्या नर्स, डॉक्टर, शिवाय दुसरे कोणीच जाऊ शकत नाही. वेळोवेळी उपचाराप्रमाणे मनाला धीर आणि जगण्याची उर्मी देणारे आरोग्य कर्मचारी हे खऱ्या अर्थाने रुग्णाच्या मनात आत्मविश्वास पेरणारे, कोणतेही नातेसंबध नसतांना प्रसंगी नात्याच्या पलीकडेही जावून ही मदत करणारे सगेसोयरे ठरले आहेत.

तसेच ऑक्सिजनचा पूरवठा वेळेत व्हावा यासाठी अहोरात्र काम करणारी समन्वय यंत्रणा, समिती सदस्य, ऑक्सिजन टँकर चालक ते रुग्णाला वेळेत योग्य तो ऑक्सिजन मिळतोय का ? ते पाहणारे डॉक्टर, तंत्रज्ञ ते नर्स पर्यंत सर्व या उपचार साखळीतील अन्नय साधारण महत्वाचे घटक आहे.

प्रशासनाप्रमाणेच प्रत्येक लोकप्रतिनिधी ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील मोठ्या स्वरुपात जीवनावश्याक वस्तुंचे गरजूंना वाटप, जेवण, वैद्यकीय मदत, आर्थिक मदत तसेच ज्या प्रकारात मदतीची आवश्यकता होती त्याप्रकारे मदत करुन खारीचा वाटा उचलला आहे.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ मोठ्या उद्योग समूहानी सीएसआर निधीअंतर्गत
ऑक्सिजन प्लांटसह कोविड रुग्णांसाठी रुग्णालये उभारली. स्वत:च्या उद्योग समूहातील लोकांच्या तपासणी आणि उपचारासाठी स्वत: यंत्रणा उभी करुन मदत केली. याचबरोबर गावागावात कोरोनामुक्त गाव, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ या मोहिमेत आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा राहिला. पायाभूत आरोग्य घटक म्हणून व्यवस्थेत त्याचं काम कौतुकास्पदच राहिले आहे असे राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे एका संवाद कार्यक्रमात बोलले आहेत.

कोरोनाच्या प्रतिबंधात प्रत्येकाने स्वत:  मी जबाबदार  म्हणत स्वत: कुटूंबाची आणि समाजाची काळजी घेतली आहे. आता सुस्थितीत सुरूवात झालेल्या जीवनाला प्रगतीकडे तेही आरोग्यपूर्ण वातावरणात नेण्याची जबाबदारी आणि स्वयंशिस्त पाळणं तेवढंच गरजेचं आहे. पाऊल पडते पुढे असं म्हणत आता गरज आहे ती सर्वांनी सहकार्य आणि समन्वयाने पुढे येण्याची. शक्य होईल तेवढ्या प्रमाणात स्वत: सिध्द होऊन एकमेकांस आत्मविश्वास निर्माण करण्याची तरच आपण प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करु शकतो, तसचं मनामनातील भिती दूर करुन आत्मविश्वासाची लाट पसरवू शकतो, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या ऐवजी आत्मविश्वासाची लाट समाजात पसरावी या अपेक्षेसह…..

मीरा ढास

– लेखन : मीरा ढास.  सहायक संचालक (माहिती)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments