दुकानात शिरल्या शिरल्याच डाव्या हाताला मस्त फुलांचे गुच्छ, गृहशोभेची झाडे दिसली. भिंतीलगत विविध गुच्छ, त्यात गुलाबी, पिवळ्या, नारिंगी गुलाबांची रेलचेल. त्यासोबतच टपोरी जर्बेरा, कार्नेशन अशी कितीतरी आकर्षक तजेलदार फुले. त्यांचा एकत्रित येणारा मंद सुगंध ! अहाहा ! दिल खुश हो गया.
जरा पुढे जाते तोच ॲार्कीडच्या लहानमोठ्या कित्ती कुंड्या. काय त्यांचे सुंदर रंग. त्यापुढे वेगवेगळ्या शेवंत्या पिवळ्या पांढऱ्या, अगदी आकर्षक. सहज नजरेत भरणाऱ्या. मधून मधून छोटे मोठे फुगे, झिरमिळ्या, वेगवेगळ्या फुलदाण्या. आपल्या कडे पाहून गोंडस हासणारी विविध रंगांची फुले त्यातच कुठे बदामाचे आकार तर असचं काहीबाही. पण काही म्हणा हा विभाग पाहीला न की अगदी फ्रेश वाटत.

त्यापुढे गेल की सर्व भाज्यांचा, फळांचा विभाग येतो. हारीने मांडलेले टोमॅटो. अबब किती ते लांबट चकचकचकीत, अगदी बोराएवढे तर अगदी द्राक्षासारखे. ग्रेप टोमॅटो., चेरी टोमॅटो. काही हे भले मोठे जाएंट टोमॅटो. काय सुंदर लाल, शेंदरी, पिवळा रंग. आकाशीचं इंद्रधनुश्य वितळून खाली येऊन विसावलं.
बहुतेक सर्व भाज्या रंगसंगती साधत इतक्या खुबीने मांडलेल्या की सुरेख नजारा पहातच रहावा. कुठेही कलाकुसर वापरली की काही वेगळाच चमत्कार होतो नाही ?

हिरव्यागार काकड्या त्याच्याच शेजारी झुक्कीनी, थोडी गडद आणि थोडी फिक्की हिरवी. त्यालाच लगटून पिवळी, केशरी सिमला मिरची. खालच्या अंगाला केशरी गाजर आणि हिरवी फरसबी. काय सुंदर मांडणी. नुसतं नेत्रसुख लाभलं तरी डोळ्यांना शांत वाटत. बायकांचं आणि या भाज्याचं विशेष नातं. अगदी सौख्याचं. मला तर भाजी घ्यायला फारच आवडते. नुसतं तिथुन फिरूनच फ्रेश वाटत. भाज्या बघत डोळ्यांनीच आस्वाद घेत मनात चक्र चालू असतात, आज रात्रीला ही, परवा काय पाहुणे येणार म्हणून विशेष भाज्या वगैरे. जरा पुढे नजर गेली की हिरवा, जांभळा कोबी. लेट्यूसच्या पानांचे विविध प्रकार. रंग वेगळे आकार वेगळे. त्यालाच चिकटून लाल गुलाबीसर मुळे, बिट ! कित्ती सुंदर.

मधल्या भागात पिवळी केळी, आंबे, नारळ आणि वेगळच दिसणारं ड्रॅगन फ्रूट. त्याच्या समोरच्या बाजूला ही सारी छोटी संत्री, मोसंबी सदृश संत्री, विविध जातीची सफरचंद, पेर, अलु बुखार. अगदी रंगांचा गंधांचा उत्सवच जणू! त्यापुढे लाल चुटूक स्ट्रॅाबेरी, ब्लूबेरी, रासबेरी. छटा तरी किती सांगाव्या. बाजुलाच कलिंगड, टरबूज सर्व रचना इतकी खुबीनी केलेली असते की घ्यायला जातो एखादच फळ किंवा भाजी पण पिशव्या भरभरून घेतल्याशिवाय राहवत नाही. पलिकडची आव्होकाडोही खुणावत राहतात. कांदे बटाटे, सुरण रताळी सारं एकत्र.
ह्या विभागातून फिरताना कधी कधी भाज्यांवर विशेषतः पालेभाज्यांवर हलका पाण्याचा शिडकावा मारला जातो. आपल्याही अंगावर काही चुकार थेंब येतात आणि अगदी प्रसन्न वाटत. फ्रीज ला मर्यादा आहेत म्हणून नाहीतर सारी भाजीच घरी नेण्याचा मोह आवरता घ्यावा लागतो.
तिथला तो शिडकावा, विशिष्ट रंगसंगती, तिथेच लागणारी इतर सामग्री, रंगीबेरंगी छोट्या चाळण्या, भाज्यांच्या पिशव्या. मन अगदी बेहद्द खूष होत.
ॲाफीसमधून घरी परतताना या दुकानात शिरलं की सारा शिण निघून जातो. एखाद दुसरी भाजी घ्यायला गेलेली मी थैलीभर भाजी, विविधरंगी फळं आणि पिवळी, गुलाबी, नारिंगी, पांढरी सर्व फुलं गोळा करते. आता ओझ्यानी हात भरलेले असतात पण मन मात्र सुगंधी आणि खूप हलकं झालेलं असते. तो ताजवा मनात घेऊन मी सर्व सामान गाडीत टाकते आणि एक तजेलदार अनुभूतीनं कृतकृत्य होते.

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800