मलेशियात शब्दचे चौथे मराठी साहित्य संमेलन ११ ते १५ जानेवारी २०१९ दरम्यान संपन्न झाले. या सम्मेलनाचा उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली.
उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र मंडळ, मलेशियातर्फे सौ.शिल्पा टंकसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे छान स्वागत केले. उद्घाटन सोहळ्यानंतर सौ. टंकसाळे यांचे पती श्री प्रशांत टंकसाळे यांची भेट झाली. दोन्ही उभयतानी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी मला ते आमंत्रण म्हणजे औपचारिकतेचा भाग वाटले. पण पुढे त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे हे आमंत्रण खरोखरच अगत्याचे असून तोंडदेखले नाही, याची मला खात्री पटली. शिवाय मुंबईतुन निघण्यापूर्वीच स्नेही सौ आशाताई आणि अशोक कुंदप यांनी परत परत सांगितले होतेच की, मलेशियात असणाऱ्या त्यांच्या भाच्याच्या घरी अवश्य जाऊन या म्हणून. त्यात टंकसाळे उभयतांचा मनस्वी आग्रह तसेच महाराष्टातून येथे आलेला आपला बांधव कुठे राहतो, कसा राहतो हे पाहण्याची उत्सुकता यामुळे मी त्यांच्या घरी जायचं ठरवलं.
बाटु केव्ह या ठिकाणी टंकसाळे येतील आणि मला त्यांच्या घरी घेऊन जातील, असे ठरले. त्याप्रमाणे ते आले. अतिशय विनम्र, शालीन स्वभाव असलेले टंकसाळे टॅक्सीने त्यांच्या घरी नेतील, अशी माझी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र त्यांची लांबलचक कार पाहून मी उडालोच. संध्याकाळच्या वेळी अतिशय सफाईदारपणे कार चालवत त्यांनी मला घरी नेले. मलेशियाच्या अत्यन्त उच्चभ्रू भागातील गगनचुंबी इमारतीत त्यांचे घर आहे. मराठी माणूस म्हटला की सहसा त्याचे घर दोन चार खोल्यांपेक्षा मोठे नसते. पण घरात पाय ठेवताच भव्य दिव्य हौलने मला अचंबित केले. सर्व घराची सजावट अत्यन्त सुंदर केलेली, आल्हाददायक रंगसंगती, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, स्वतःला, कुटुंबियांना मिळालेली पदके, पुरस्कार, पाहून मला घराची छायाचित्रे काढण्याचा मोह आवरता आला नाहीआणि त्यांच्या अनुमतीने मी काही छायाचित्रे घेतली. सर्व काही पाहून मला टंकसाळे यांची इतपर्यँतची झेप जाणून घ्यावीशी वाटली.
श्री प्रशांत टंकसाळे हे कुआलालमपुर येथील टेक्निप एफ एम सी या कम्पनीत १७ वर्षांपासून कार्यरत असून सध्या इंजिनियरिंग मॅनेजर उच्च पदावर विराजमान आहेत.ही कम्पनी तेल उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. कम्पनीच्या कामानिमित्त प्रशांत यांना जगभर फिरावे लागते. पत्नी शिल्पा, स्मित, पुष्प अशी दोन मुलं असे हे चौकोनी कुटुंब आहे. आम्ही बोलत असताना मलेशिया विद्यापिठात संगणक प्रणालीत संशोधन करणारी अपूर्वा वणगुजर ही महाराष्ट्र कन्या प्रशांतचे मार्गदर्शन घेण्यासाठी आली होती. तीही आमच्या बोलण्यात सहभागी झाली. प्रशांत यांची आजची परिस्थिती जरी अशी सुखद, यशस्वी दिसत असली तरी त्यांचा इथपर्यन्तचा प्रवास तेव्हढाच खडतर राहिलेला आहे.
सातारा येथील असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कुलमध्ये तर इंजिनिअरिंगचे शिक्षण कऱ्हाड येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. तेथून त्यांनी १९९२ साली बी ई ( मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली. दरम्यान काही अघटित घटनांनी त्यांना,कुटुंबियांना खूप बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अशाही परिस्थितीत ते इंजिनिअर झाले. तर वैशाली, रुपाली या बहिणी पदवीधर झाल्या. दोघीही आता आपापल्या संसारात सुखी आहेत. इंजिनिअर झाल्यावर प्रशांत यांनी चिपळूण येथील घरडा केमिकल्समध्ये १९९२ ते ९६ या काळात सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून तर पुढे त्याच कंपनीत डोंबिवली येथे ३ वर्षे काम केले.
चांगली संधी मिळते म्हणून ते ‘केमटेक्स’ या अमेरिकन कंपनीत, मुंबई येथे सिनिअर पायपिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले.तिथे दीड वर्षे नोकरी झाल्यावर अमेरिकेत २००२ साली मंदीची मोठी लाट उसळली. आपल्या सहकाऱ्यांना जाहीरपणे त्यांचे नाव पुकारून, सक्तीने राजीनामा लिहून घेऊन, हातात ३ महिन्याचा पगार देऊन कार्यमुक्त करण्यात येत आहे, हे पाहून प्रशांत हादरून गेले. आपल्यावरही अशी वेळ कोणत्याही क्षणी येऊ शकते याची त्यांना जाणीव झाली. म्हणून अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी आधीच दुसऱ्या नोकरीचा शोध सुरू केला.
एका मित्राने मलेशियात असलेल्या संधिविषयी माहिती दिली. त्या कंपनीत रितसर मुलाखत होऊन प्रशांतची सिनिअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. पुढे स्वतः च्या कर्तृत्वाने त्यांना याच कंपनीत वरची पदे मिळत गेली.
भारतातून मलेशियात येण्यापूर्वीच प्रशांतचा १९९९ साली इंजिनिअर असलेल्या शिल्पा यांच्याशी विवाह झाला होता. २००० साली पहिला मुलगा स्मित तर २००६ साली दुसरा मुलगा पुष्प याचा जन्म झाला. स्मित आता ऑस्ट्रेलियात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर पुष्प नववीत आहे. घराकडे पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेऊन शिल्पा पूर्णवेळ गृहिणी झाल्या आहेत. असे असले तरी कुआलालमपुर येथील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात त्या नेहमी आघाडीवर असतात. २०१६-१७ मध्ये त्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष होत्या.
भारतीय नेत्यांचे, कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात दोघेही सतत पुढाकार घेत असतात.त्यामुळे मलेशियातील केवळ मराठीच नव्हे तर सर्व भाषिक लोकांमध्ये ते प्रिय आहेत.
जेव्हा इथे आले, तेव्हा घरी फोनसुद्धा नव्हता. प्रशांतच्या कार्यालयातुन निरोप मिळत असे. दोन दोन आठवडे घरच्यांशी बोलणे होत नसे. घरच्यांची आठवण झाली की सार्वजनिक एसटीडी बूथची शोधाशोध करावी लागे. बोलता बोलता आपल्या कठीण भूतकाळात दोघंही हरवून गेले.
खरं म्हणजे,आपलं घर, गाव ,राज्य न सोडण्याची मराठी माणसाची मानसिकता असते. पण दूरवर ,अनोळखी असलेल्या मलेशियाकडे टंकसाळे कुटुंबाने झेप घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली .
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ +91 9869484800.