जगभरात कोट्यावधी लोक दिवाळी सण साजरा करतात. ह्या दिवाळी सणाच्या दृष्टीने 7अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ‘दिवाळी सण’ साजरा करणाऱ्या हिंदू, जैन, बौद्ध व शीख धर्मियांच्या दृष्टीने बुधवार ५ मार्च २०२५ हा “सोनियाचा दिन” ठरला. त्याला कारण ही तसेच होते, ते म्हणजे स्प्रिंगफिल्ड या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या टोलेजंग व आकर्षक अशा संसद भवनात (Illinois State Capitol Building) दिवाळी सणाला अधिकृत मान्यता देणारा संसद ठराव १०७५ (House Bill 1075) द्विपक्षीय समिती पुढे मांडला जाणार होता.
हा ठराव द्विपक्षीय समितीमध्ये आणण्यासाठी Vernon गावच्या विश्वस्त आदरणीय गौरी मागती यांची महत्त्वाची भूमिका होती. गौरी मागती ह्या शिकागो भागातील इलिनॉय राज्याचे आमदार डॅनियल डीडेच (Daniel Didech) यांच्याबरोबर या ठरावासाठी लागणाऱ्या सर्व तरतुदी पूर्ण करण्यासाठी झटत होत्या. यासाठी लेक काउंटी इंडियन्स असोसिएशन आणि HSS पाचजन्य शाखा बफेलो ग्रोव्ह आणि इतर भारतीय अमेरिकन समुदाय यांनीही मोलाचे योगदान दिले.
दिवाळी सणाला ह्या राज्यात सरकारची अधिकृत मान्यता मिळण्यासाठी हे विधायक विशेष द्विपक्षीय समितीमध्ये मांडले जावे व त्या सर्व सभासदांचा त्यासाठी बहुमोल पाठिंबा मिळावा, यासाठी शिकागो भागातील राज्याचे आमदार डॅनियल डीडेच (Daniel Didech) अनेक दिवस कसोशीने प्रयत्न करीत होते. शिकागो परिसरातील वेगवेगळ्या भागातून २१ भारतीय स्प्रिंगफिल्ड राजधानीतील संसद भवनामध्ये ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व भागीदार होण्यासाठी गेले होते. केवळ एक दोन दिवसाच्या पूर्वसूचनेवर, गौरी मागती, राजा मागती, राकेश मल्होत्रा, अमिताभ मित्तल, देवेश, हितेश देसाई, टीना रामकृष्ण, सरन्या राजी, नीरव, जुओठी यांसारख्या विविध प्रांतातील उत्साही व्यक्ती या प्रसंगाच्या साक्षीदार होण्यासाठी तेथे उपस्थित होत्या. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षा नमीता वेदक यांच्यासह महाराष्ट्र मंडळ शिकागोचा विश्वस्त म्हणून मी स्वतः, (माधव गोगावले) माझी पत्नी ज्योती गोगावले, तसेच, वृंदा पांडव, उर्मिला दाते, आणि ज्ञानदा पवार या प्रसंगी उपस्थित होतो. काही प्रतिनिधी बसने तर काही प्रतिनिधी आपली कार घेऊन आले होते.
खरं म्हणजे, त्या दिवशी हवामान खूपच प्रतिकूल होते. सत्तर मैल वेगाने वारे वाहत होते. सुरुवातीला काही वेळ मुसळधार पाऊस व नंतर हिमवर्षाव (heavy snow) सुरू झाला होता. सुमारे एक मैल अंतरावर कार पार्क करून बोचऱ्या थंडीत चालताना एकच विचार मनात चालला होता, की आज आपण एका अनोख्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी जात आहोत. विधान भवन सभागृहात हा महत्त्वाचा ठराव मंजूर होणाऱ्या प्रसंगाचे साक्षीदार व भागीदार आपण होणार आहोत, या विचाराने त्या प्रतिकूल हवामानाचा आमच्यावर काही परिणाम झाला नाही. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही, त्याप्रमाणेच हे होते !

विधानसभा सभागृहात पहिल्या मजल्यावर आमदार आपापल्या आसनावर बसले होते.अनेक आमदार आपापल्या मतदारांना व प्रतिनिधींना ठरल्यावेळी विधानसभा सभागृहातील तिसऱ्या मजल्यावरच्या प्रेक्षकांच्या आसनावर नेत होते.
वेगवेगळ्या ठरावांबद्दल आमदार व सचिव यांनी माहिती सांगितल्यानंतर सभागृहात आलेल्या मतदारांना व प्रतिनिधींना उभे राहण्यास सांगून त्यांचा गौरव केला जात होता. सर्व कसे व्यवस्थित आणि शिस्तीत चालू होते. सगळीकडे सुरक्षा अधिकारी होते .प्रेक्षकांनी कुठले अडथळे आणू नयेत, यासाठी ते सगळीकडे फिरत होते व कटाक्षाने तशी काळजी घेत होते. आमदार डॅनियल डीडेच (Daniel Didech) यांनी House Bill 1075 ठरावाबद्दल माहिती सांगून, हिंदू संस्थेच्या प्रतिनिधींना उभे राहण्यास सांगितले. आम्ही सर्वजण अभिमानाने उभे राहिलो.
दुपारी दोन वाजता द्विपक्षीय समिती त्या दिवसातील ठरावावर मतदान करून निर्णय घेणार होती. मधल्या काळात आमदार डॅनियल डीडेच यांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयाजवळील एका मोठ्या खोलीत नेले. त्या ठिकाणी दुपारचे जेवण करता करता सर्व प्रतिनिधींनी थोडक्यात आपली ओळख करून दिली. आमदार डॅनियल यांनी आम्हाला एक वाजून चाळीस मिनिटांनी ठराव समिती सभागृहात नेले.

प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोचली होती. इतर ठरावांच्या मानाने हिंदूंचे प्रतिनिधी खूपच बहुसंख्येने आल्यामुळे बऱ्याच जणांना उभे राहावे लागले होते. ठराव मांडणाऱ्या आमदारांनी ठराव मांडल्यावर मतदान घेऊन समितीचे अध्यक्ष निर्णय सांगत होते. दिवाळी सण ठरावाच्या अगोदर तीन-चार ठराव ५-३, ६-२, ५-३, अशा मताने पास झाले होते. आमदार डॅनियल यांनी हिंदूंच्या प्रतिनिधी आणि या ठराव्याच्या मुख्य पुरस्कर्त्या गौरी मागती यांना दिवाळी सणाबद्दल थोडक्यात माहिती देण्याची विनंती केली. गौरी मागती यांनी ती माहिती ठराव समितीसमोर वाचली. समितीच्या अध्यक्षांनी मतदानासाठी द्विपक्षीय समिती सभासदांना विचारले. एका सभासदाने हात वर करून बोलण्याची परवानगी मागितली. थोड्या वेळापूर्वी झालेल्या तीन चार ठरावांवर एकाही सभासदाने तशी चर्चा घडवून आणली नव्हती. त्यामुळे आम्हा सर्वांच्या छातीत गोळा आला. ‘अरे बापरे! हे काय मध्येच माशी शिंकल्यासारखे ?’ असे वाटून प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुचचुकली. सर्वांनी कान टवकारून त्या सभासदावर लक्ष केंद्रित केले. थोड्या वेळातच परवानगी मिळाल्यावर त्या सभासदांनी ज्यावेळी सांगितले, की ‘मी आतापर्यंत अनेक दिवाळी कार्यक्रम पाहिले आहेत, किती आनंदी, भव्य, आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या असतात. दिवाळी सणाचा उद्देश मानवतेसाठी खूप चांगला संदेश देणारा आहे. दिवाळी सणाला राज्यात अधिकृत मान्यता देणाऱ्या ठरावाला माझेही नाव एक पुरस्कर्ता म्हणून घालाल का ?’ हे ऐकून आम्हा सर्वांना जीव भांड्यात पडल्यासारखे वाटले व मनोमनी परमेश्वराचे आभार मानले. अध्यक्षांनी त्याला होकार दिला व मतदान घेतले. मग सर्व सभासदांनी एकमताने ठराव पास झाल्याचे घोषित केले. तेव्हा आमच्या आनंदाला भरती आली आणि शिकागो भागातील सर्व २१ हिंदू प्रतिनिधींनी उभे राहून “जय श्रीराम” व “भारत माता की जय” या घोषणांनी सर्व सभागृह दणाणून सोडले.
या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व भागीदार झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.त्यानंतर सर्वांनी आमदार डॅनियल व गौरीचे आभार मानले व आनंदात फोटोसेशनकडे वळले. आता वाट पाहतोय,ती कधी एकदा दिवाळी येते, त्याची !

— लेखन : माधव ना. गोगावले. शिकागो, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800