आपल्या सर्वांसाठी गुढी पाडवा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचं सण असतो. इंग्लंड मधील मराठी मंडळी तर या सणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. एकतर हिवाळ्यातले छोटे आणि अंधारी दिवस संपून ते हळू हळू मोठे होऊ लागतात. त्याचबरोबर वृक्षवेलींना पालवी फुटून रस्त्यारस्त्यांवर उगवणारे डॅफोडिल्स आणि ट्युलिप दिनचर्येत एक नवा उत्साह भरू लागतात. इंग्लंड हा खूप छोटा देश असला तरी इथे मराठी कुटुंबीय मात्र मोठ्या प्रमाणात आहेत इतकी की सध्या इथे ५० हून अधिक मराठी मंडळं आहेत. त्यातील सर्वात जेष्ठ म्हणजे नव्वदी ओलांडलेले “महाराष्ट्र मंडळ लंडन”. लंडन मधून वाहणारी थेम्स ही इंग्लंड मधील सर्वात मोठी नदी. त्यानंतर येते ती मँचेस्टर-लिव्हरपूल भागातून वाहणारी “मर्सी” नदी. तिच्या तटावर वसलेल्या ५-६ कुटुंबीयांनी एकत्र येऊन सुमारे ५२ वर्षांपूर्वी – नॉर्वेमा (North West Marathi Association) या संस्थेची पायाभरणी केली. आता नॉर्वेमाची दुसरी- तीसरी पीढी वेगवेगळे उत्सव साजरे करून मराठी सांस्कृतिक वारसा पुढे नेत आहे. नॉर्वेमा तर्फे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रचलेले हे स्वागत गीत ……
१. स्वागत सुमने उधळू चला
ही स्वागत सुमने उधळू चला
लहर लहर वायूंची नादे
मोद भरे या धुंद दिशा || ध्रु ll
चैत्रातिल हा शुभ दिन आला
अंगणी अमुच्या वसंत फुलला
श्री रामाची गुढी उभारुन
स्वर सुमनांनी सजवू तिला
ही स्वागत सुमने उधळू चला || 1||
मर्सी तटी हा मेळा जमला
नाद मराठी घुमू लागला
सैह्याद्री जरी दूर राहिला
साद देऊ त्या चला चला
ही स्वागत सुमने उधळू चला || 2||
— रचना : श्रीकांत पट्टलवार. रुणकर्ण (Runcorn – UK)

२. गुढीपाडवा पर्वणी
नव संवत्सर साजरा करू या चला
चैत्र आला चैतन्य घेऊनी स्वागताला
घरांवर उंच ब्रह्म ध्वज उभारू या
गुढी पाडवा मुहूर्त शुभ तोरणाला
-१-
रेशमी वस्त्रे, पुष्पहार, साखर गाठी
कडुनिंबाची डहाळी, कळकाची काठी
रजत कलश मंडित उंच गुढी उभारू या
नव पर्वणी लाभाची चैत्र शुक्ल प्रतिपदेला
-२-
विजय ध्वज हा अयोध्या लोकराजा श्रीरामाचा
उल्हासित नगरजन न्यायदाता स्व राजाचा
सत्य युग अवतरले शांती समृद्धी जपाया
संपला वनवास कल्याणा राम अवतरला
-३-
संपले असूर राज संहारली राक्षसी कांक्षा
नष्ट मायाजाल जनांतरी रामराज्य प्रतिक्षा
सम दृष्टी प्रजे प्रति लोक हितकारी निर्णया
असो पाषाण क्षुद्र कितीही राम नामे तरला
-४-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
३. मांगल्याची गुढी
गुढी रेशमी वस्त्रांत
टोप वैभवाचा डोई
कडुनिंब- तुरा त्यात
गळां गाठी- गोडवाही
घाली गवसणी नभा
गुढी मांगल्याची आई
तिच्या नित्य स्मरणाने
गाठी बांधावी पुण्याई
तिच्यापुढे सानथोर
वाकतात नम्रपणे
बाजू काढून नमती
उन्मत्तही आभूषणे
गुढी प्रताप- पताका
विजयाचा अभिमान
तिच्या पूजनाने येई
आज वास्तवाचे भान
पेटलेल्या हाळामध्ये
शांतिध्वजाचे रोपण
दिव्य, उदात्त पुजावे
परंपरा आठवून
प्रतिपदेचा मुहूर्त
विश्वचिंतनी रमावा
पुण्यकर्मासाठी व्हावा
प्रतिक्षणाचा पाडवा
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
“गुढीपाडव्या” बद्दलच्या सर्वच काव्य रचना अर्थपूर्ण आहेत. खुप छान.
सर्वांना नविन वर्षांच्या हार्दिक, भरघोस शुभकामना.