श्रीनगर ते कारगिल प्रवासाने रात्री गाढ झोप लागली. तिसऱ्या दिवशी सकाळी निवांत झोपून उठलो. शीन गेल्याने आल्हाददायक वातावरणामुळे आम्ही सारे फ्रेश झालो होतो. श्रीनगर – कारगिल वाटेवर उजाड डोंगर बघण्याची डोळ्यांना सवय झाली होती. पुढील प्रवासात अवघड घाटाचा १३,४७९ फूट उंचीवरील नमिका-फोटुला पास आम्ही पार केला. इकडे जुलै मध्ये उन्हाळा असल्याने डोंगर माथ्यावर बर्फ दिसत असला तरीही उन्हाचा चटका जाणवत होता. गावालगत व नदीकिनारी सुचिपर्णी प्रमाणे उंच वाढणारी पॉपलर वृक्ष दृष्टीस पडत होते. या झाडांचा प्रामुख्याने इमारतीसाठी वापर केला जातो. रस्त्यालगत जरदाळू झाडे फळांनी लगडलेली दिसली. पुढील काही अंतरावर उजव्या बाजूस इंडस व झंस्कार नदीचा संगम दिसला. उन्हाळा हंगाम असला तरी बर्फ वितळून गढूळ पाण्याने वाहणारी नदी पुढे पाकिस्तान हद्दीत शिरते.
पत्थर साहिब गुरुद्वारा : लेहच्या सुमारे ४५ किमी अलीकडे डोंगर पायथ्याशी पत्थर साहिब गुरुद्वारा आहे. या स्वच्छ व शांत गुरुद्वाराचे संचालन अगदी पूर्वीपासून मिलीटरीकडे आहे. तेथे सर्व भक्तांना सैनिकांनी चालवलेल्या लंगर मार्फत गरमागरम प्रसाद व चहा दिला जातो. गुरुद्वारा परिसरात शांत व प्रसन्न वाटते.

मॅग्नेटिक हील : पुढे काही अंतरावर दुतर्फा डोंगर रांगा मधोमध एक पठारी रस्ता लागतो. या रस्त्यावर थांबवलेली नुट्रल गिअर मधील हलकी वाहने उतारा ऐवजी चढाच्या दिशेने आपोआप खेचली जातात म्हणून याला मॅग्नेटिक हिल असे म्हणतात. पूर्वी दूरदर्शन वरुन प्रसारीत ‘सुरभी’ मालिकेत सिध्दार्थ काक व रेणुका शहाणे यांचेकडून ही माहिती ऐकली व पाहिलेली होती. त्याची आम्ही खातरजमा करून घेतली.
सायंकाळी आम्ही समुद्र सपाटी पासून अती ऊंचीवर स्थित लेह मुक्कामी पोहोचलो. ऑक्सिजन कमतरतेमुळे किरकोळ पायऱ्या चढतानांही आम्हाला धाप लागत होती. भीमसेन कापूर हुंगत आम्ही वातावरणाशी जुळवून घेत होतो. काहींनी धाप लागू नये म्हणून डायमॉक्स गोळी घेतली. रात्री कडाक्याची थंडी चांगलीच जाणवत होती. आल्हाददायक वातावरणात सकाळी लवकर जाग आली. नाश्ता पाणी उरकून पुढील प्रवासाला लागलो.

सेंद्रिय हुंदर गाव : लेह नंतर नुब्रा-व्हॅली जवळ जगातील सर्वात उंचीवरुन (१८,३९० फूट) वाहन जाणाऱ्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उन्हाळा असूनही पांढरा शुभ्र बर्फ साठलेला होता. तेथे हळुवार चालले तरी धाप लागत होती. तरीही आम्ही बर्फाचे गोळे करून एकमेकावर फेकत फोटो घेतले.

तदनंतर हुंदर गावात मुक्कामी पोहोचण्यापूर्वी डीस्किट मॉनेस्ट्रीत अवाढव्य सोनेरी बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. प्रांगणात ढोलाच्या आकारात पितळी व कोरीव स्वतःभोवती फिरणाऱ्या घंटा आपले लक्ष वेधून घेतात.

हुंदर गावासभोवती डोंगर व मधोमध भले मोठे वाळवंटी पठार आहे. तेथे दोन कुबड असलेल्या दुर्मिळ मंगोलियन जातीच्या उंटावरुन आम्ही रपेट मारली. सभोवतालच्या डोंगरावरचे बर्फ वितळून मुबलक पाणी साठा झालेला आहे. या पाण्यावर परिसरात सर्वत्र सेंद्रिय शेती केली जाते. हॉटेल सभोवती गरजेनुसार सेंद्रिय भाजीपाला उत्पादन केला जातो. ताज्या व सेंद्रिय भाजी पाल्यात बनवलेलं भोजन रुचकर होते. आता पर्यंतच्या प्रवासाने व नुब्रा व्हॅली उतरुन खाली आल्याने तेथील वातावरणात आम्ही समरस झालो होतो.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800