आजकालच्या AI व नवीन टेक्नाॅलाॅजीच्या युगात आपण आपल्याला हवे तसे घडवता येईल काय असा विचार कधीचाच मनात घोळत होता. सायन्टिस्ट आता माणसाचा DNA पण आता बदलू शकणार आहेत, हि नुकतीच BBC वरची बातमी ऐकून तर ते अशक्य नक्कीच नसेल. निदान पुढील एखाद्, दोन शतकात तर ते संभवनीय वाटतेय. २००३ साली लिहिलेल्या या लेखाची आठवण झाली. त्यावेळेस कॅनडातून निघत असलेल्या “एकता” या मासिकात तो प्रकाशित झाला होता. आजच्या बातमीमुळे त्यावेळच्या विचाराला आणखीन दुजोराच मिळालाय. लेख अधिकच “ताजा” वाटला. म्हणूनच तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावा असे वाटतेय. कसा वाटतोय ते अवश्य सांगा बर का !
मला आणि नंदाला काहीही विशेष खरेदी करायची नसली तरी शॉपिंग सेंटरमधून भटकंती करायला खूप आवडत. विशेषतः ख्रिसमसच्या आधी नटलेली, सजलेली दुकान पाहायला आवडतात आणि दुकानातून सेल सुरू झाले, की, एखादी आवडती पण खूप किमतीची वस्तू एकदम स्वस्त किमतीत मिळाल्याचा आनंद लुटता येतो. ईस्टरच्या सुट्टीनंतर इथे सेल सुरू होतात. म्हणून आम्ही दोघी मँचेस्टरच्या “आर्नडेल” सेंटरमध्ये स्वस्तात काही मिळतय का ते बघत, शोधत फिरत होतो. अनपेक्षितपणे, नंदाचं लक्ष एका हॅन्डबॅगकडे गेलं. तिची किंमत ५० टक्क्यांनी कमी केलेली होती. “अग, ही बघ “गूची” (Gucci) ची डिझायनर हॅन्डबॅग”, नंदा जवळ जवळ किंचाळीच. “नंदा, तुझ्याकडे सात-आठ हँडबॅक्स आहेतच की!”. नंदा ती हॅन्डबॅग विकत घेणार या शंकेने मी आपलं तिला सावध केलं. “पण डिझाईनची एकही नाही. आजकाल डिझायनर लेबलचं के~व~ढ खुळ माजलय ते तुला माहीतच आहे. मध्यंतरी नवीन ओळख झालेल्या परविंदर कडे मी गेले होते. नवरा बायको दोघेही पंजाबी, धंदेवाईक आणि श्रीमंत. केवढी तोऱ्यात मला तिच्याकडच्या सगळ्या डिझायनर लेबलच्या गोष्टी दाखवत होती. डिझायनर कपडे, शूज, दागिने, अगदी फर्निचर सुद्धा.” नंदाने तिच्या हॅन्डबॅगच्या आकर्षणाचा खुलासा केला. “हो बाई, काही लोकांना त्याचा फारच अभिमान असतो.” मी माझं मत सांगून टाकलं. “नंदा, आता तर काय डिझायनर बेबीज् पण होणार आहेत म्हणतात.” मला वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आठवली. “मी परवा डिझायनर डॉट कॉमची जाहिरात पाहिली, पण — “, माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच “अग, त्या कंपनीचे लोक तुमच्या घरी येऊन तुमचं सग्गळं घर तुमच्या आवडीप्रमाणे खूप सुंदर सजवून देतात. तोच तर डिझायनरचा अर्थ. परविंदरच सांगत होती.” नंदाने अधीरतेने मला सांगून टाकलं. नंतर परविंदर कडून ऐकलेली “डिझायनर्स” बद्दलची सगळी माहिती नंदाने मला ऐकवली. आणि माझ्या ज्ञानात भर टाकली ! कदाचित परविंदरला दाखवायला असेल, पण, नंदाने ती गुचीची हॅन्डबॅग घेतलीच. नंतर नेहमीप्रमाणे दुपारचा केक आणि कॉफी झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या घरी परतलो.
घरी आल्यावर शॉपिंगच्या श्रमपरिहारासाठी (!) म्हणून चहा केला. अनिल त्यांचा चहा झाल्यावर नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे फिरायला बाहेर पडले. मी निश्चिंतपणे चहा घेत होते. डिझायनर लेबलचे विचार मनात घोळत होतेच. चहाचा एक एक घोट घेत, आपल्याकडे डिझायनर लेबलचे काय काय आहे ते शोधलं. पण, एकही गोष्ट सापडेना. परविंदर सारखं आपल्याला डिझाईन लेबलचं काय घेता येईल ? काय वापरता येईल ? असा सहजच मनात विचार आला. डिझायनर लेबलचे कपडे, विशेषतः पाश्चिमात्य प्रकारचे, मी तर ते वापरणे शक्यच नाही. इथे रोजच्या जीवनात तसले कपडे कोणी वापरत असलेलं, माझ्या पाहण्यात सुद्धा नाही. शिवाय त्यांच्या भरमसाठ किंमतीमुळे खूपच थोड्या लोकांना ते परवडत असतील. यात शंकाच नाही. आणि, साठी उलटलेल्या या वयात तसले कपडे घालून, तसलं लचकत, मुरडत चालायचं स्वप्न पाहणं म्हणजे शुद्ध खुळेपणाच आहे. मला कॅटवॉक वर चालणाऱ्या मुली आठवल्या. झालं, म्हणजे जी अवस्था कपड्यांची तीच दागिन्यांची व शूजची होणार. तसले उंच उंच टाचांचे शूज घालणं म्हणजे पाय मुरगळून घेऊन नको ते दुखणं मागे लावून घेणंच आहे. ज्याला माझी काळजी घ्यावी लागेल, त्याच्या शिव्याच मला खाव्या लागतील. आणि दागिन्यांची तर मला मुळातच फारशी आवड नाही. शिवाय ते मोठे मोठे डिझायनर दागिने, माझ्या लहानखुऱ्या चणीला शोभणार पण नाहीतच. आत्तापर्यंत कधीच न घातलेले तसले कपडे, दागिने व शूज अट्टाहासाने घातलेच तर “साठी बुद्धी नाठीचे” चे उदाहरण म्हणून लोकं माझ्याकडेच बोट दाखवतील. नाही म्हणायला, एखाद वेळेस नाजूकसा डिझायनर दागिना किंवा एखादी सुंदरशी साडी हवीशी वाटते. पण, माझ्या पेन्शनरच्या खिशाला ते काही परवडणार नाही. समजा, डिझायनर फर्निचर किंवा घरातली एखादी गोष्ट घ्यायची ठरवलं तर आता सग्गळच घेऊन झालं आहे. त्याचीच नीट देखभाल करायचा कंटाळा येतो. मग पसारा आणखीन कशाला वाढवायचा. मुलं नातवंड लांब असतात. म्हणून, आपल्या दोघांना सोबत वाटेल म्हणून डिझायनर बेबी —- ? बापरे, माझ्या विचाराने मी हादरलेच. ५८ वर्षाच्या बाईला मुलं झाल्याची बातमी नुकतीच वाचली होती. कदाचित शारीरिक दृष्ट्या या वयात मुल होणं अगदीच अशक्य नाही. किंवा तसं नाही, तरी “सरोगेट मदर” शोधून तसं मुल घेतलंच, तरी ते वीस वर्षाचं होईपर्यंत त्याचं पालन पोषण करायचं सामर्थ्य माझ्यात कुठे आहे ?. जीव जन्माला घालणं सोप, पण त्याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन ते वाढवणे फार कठीण आहे. विशेषतः सध्याच्या या काळात तर ते कर्म कठीणच वाटतं. कसं कोणास ठाऊक, पण सहज मनात आलं की मी स्वतःला डिझाईन केलं तर ? घडवणारी मीच व घडलेली पण मीच. माझंच “डिझायनर लेबल” मलाच चिकटलेलं असेल. डोळे मिटवून, विचारात मी गुंग झाले होते. अनिल फिरून केव्हा परत आले कळलंच नाही. “आज जेवण आहे ना ? का शॉपिंगनेच पोट भरलंय ?” असं हंसत हंसत विचारत ते बैठकीच्या खोलीत आले. मला डोळे मिटून स्वस्थ बसलेले पाहून, “थकली आहेस ना ? मग ओव्हनमध्ये फिश आणि चिप्स केलेस तरी चालेल”. त्यांनी सौजन्य दाखवले. माझ्यातली गृहकृत्यदक्ष स्त्री एकदम जागी झाली. “सकाळीच सगळी तयारी करून ठेवलीय. पटकन होईल जेवण तयार.” मी घड्याळाकडे पाहत सांगितलं. “संध्याकाळी सात वाजताची टीव्हीवरची नेहमीची मालिका पाहायची आहे, म्हणजे सगळं पटापट आवरायलाच हवं !” असं मनाशी म्हणत मी स्वयंपाक घरात आले.
स्वतःलाच डिझाईन करायची माझी कल्पना मला खूपच आवडली. त्यामुळे स्वयंपाक करताना तेच विचार सुरू झाले. किती छान कल्पना आहे ! नाहीतरी मला बरेच वेळा वाटतंच, की अमक्यासारखं रूप आपल्याला नाही, तमक्यासारखी बुद्धी आपल्याला हवी होती. धाडसाच्या बाबतीत तर शून्यच. देवाने निदान एखादी तरी कला देऊन जन्माला घालायचं, तर ते पण नाही. असा बरेच वेळा देवालाच दोष देत असते. त्यापेक्षा स्वतःच स्वतःला डिझाईन करावं. ते कसं करावं याबद्दल मनात विचार घोळायला लागले. भाजी फोडणीला टाकली आणि अनिताच्या स्वादिष्ट पदार्थांची चव जिभेवर रेंगाळली. आणि एकदम ठरवूनच टाकलं. स्वतःला असं डिझाईन करायचं की सरोज, सुलभा, शीला यांच्यासारखे चविष्ट शाकाहारी आणि अनिता, मंगला यांच्यासारखा मस्त चिकन-मटन चा स्वयंपाक करता आला पाहिजे. प्रत्येकाच्या हाताची चव यायला मला किती हात लागतील! अष्टभुजा देवी सारखीच माझी अवस्था होईल की! या विचाराची गंमत वाटून माझं मलाच हंसू आलं. नवरोजी अनिल मात्र एकदम खुश होतील. मग डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. म्हणजे, अजून रांधा, वाढा,
उष्टी काढा, यांतून मन काही बाहेर पडत नाहीये. काय बुद्दु आहे मी ! स्वतःला मारे डिझाईन करायला निघाले आणि फक्त वेगवेगळे पदार्थ करता यावेत, एवढीच इच्छा केली. शेवटी “सरड्याची धांव कुंपणापर्यंतच” म्हणतात तेच खरं. छे,छे, छे, हे काही बरोबर नाही. असं मनाशी म्हणत फुगलेली पोळी, हवा काढण्यासाठी जरा जास्तच जोरात, ताटलीवर आपटली. स्वतःला कसं डिझाईन करायचं याची परत पहिल्यापासून सुरुवात करायची ठरवलं. कशापासून सुरुवात करावी बरं ? रूप, बुद्धी, कला, गुण असा प्रत्येक बाबतीत विचार करायला हवा. नशीब, स्वयंपाक करणे आता खूप सरावाचे झाल्याने विचार न करता हात काम करत होते. स्वयंपाक झाल्यावर लगेच जेवणं पषआटोपली. मागचे आवरायला अनिलने हातभार लावला. त्यामुळे टीव्हीवरची आवडती मालिका पाहता आली. मी धाकट्या नातवाच्या स्वेटरचं विणकाम हाती घेतलं. अनिलने पटकन टीव्ही चॅन¹ल बदलला. मेरिलिन मन्रोची फिल्म सुरू होती. अनिलची ती आवडती नटी आहे ते माहीत असल्याने, “हं, मला वाटलंच, तुमच्या आवडीची फिल्म असणार!” त्यांची मी थट्टा केली. अनिल तन्मयतेने फिल्म पाहत होते. सौंदर्याची सुद्धा कित्ती रुपे असतात! माझ्यातली डिझायनर एकदम जागी झाली. स्वतःला घडवताना आपण मेरिलिन मन्रोसारखं रूप घ्यायचं का? परत वाटलं, नको. तसलं सेक्सी रुप सिनेमात ठीक आहे. रोजच्या जीवनात योग्य वाटणार नाही. मीनाकुमारी, ग्रेस केली यांच्यासारखं सोज्वळ, सुंदर असावं का? कल्पना ठीक वाटली. पण, मग एकदम आठवली, आम्हां सगळ्या शाळा, कॉलेज मधल्या मैत्रिणींची, लाडकी, जिच्यासारखं दिसण्याची स्वप्नं रंगवली होती, ती, लोकप्रिय नटी मधुबाला. नाक, मोठे मोठे डोळे, सगळंच कसं रेखीव. चेहऱ्यावरचे लाडिक, मोहक भाव, त्यामुळे आलेला गोडवा, लोभसवाणा. बांधा, शरीरयष्टी रूपसुंदरी सारखी. “चलती का नाम गाडी”, “बरसात की रात”, “मोगले आजम”, मधली मधुबाला डोळ्यासमोर आली. आणि स्वतःला घडवतांना तिच्यासारखं सुंदर रूप घ्यायचं मनाशी निश्चित केलं. आता मात्र दिवसभराचा शीण चांगलाच जाणवू लागला होता. म्हणून विणकामात झालेल्या चुकांची दुरुस्ती उद्यावर ढकलली आणि जेमतेम ठळक बातम्या ऐकून झोपायचं ठरवलं. अनिल त्यांचा नेहमीचा “रोजच्या घडामोडींवरचा” कार्यक्रम बघितल्याशिवाय झोपत नाहीतच. म्हणून माझं सगळं आवरून बिछान्यावर पडले. डोळे गपागप मिटत होते.
डोळे मिटून मी स्वतःला मधुबालाच्या सुंदर रूपात पाहत होते. माझ्यातली ‘डिझायनर” मला काही सोडतच नव्हती. दिसायचं कसं ते ठरवलं, आता बुद्धीच काय ? या विचाराने माझी झोपच उडाली. खूप गोष्टी कराव्याशा वाटतात. पण, तेवढी बुद्धिमत्ता नसल्याने ते करणे जमत नाही हे सारखं जाणवतच. त्यामुळे काहीही असो, स्वतःला घडवताना खूप खूप बुद्धिमत्ता मात्र हवीच. प्रत्येक क्षेत्रातले बुद्धिमान लोक नजरेसमोर आले. महत्त्वाचे शोध लावून जगावर खूप मोठे उपकार करणारे न्युटन, फॅरेडे, गॅलिलिओ यांच्यासारखे महान संशोधक. बुद्धिमत्ते बरोबरच शौर्यात निपुण असलेले नेपोलियन, अलेक्झांडर पासून भारतातल्या शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात लढलेले वीर सावरकरांसारखे शूरवीर. राजकारणामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, चर्चिल, आणि आमच्या मार्गारेट थॅचर बाई. साहित्यांत, जगभरच्या सगळ्या साहित्यिकांनी त्या त्या भाषिकांना दिलेलं प्रचंड शब्द भांडार आणि त्यामुळे विचारांना मिळालेली प्रेरणा. रामायण, महाभारत हे ऐतिहासिक ग्रंथ म्हटले तरी ते लिहिणाऱ्या किंवा सांगणाऱ्या वाल्मिकी, व्यास ऋषींची असामान्य कल्पनाशक्ती त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे प्रतीकच आहेत. नुसत्या मराठी भाषेतच नाथमाधवांपासून कुसुमाग्रज, गो.नी. दांडेकर, पु ल देशपांडे. अशा कितीतरी साहित्यिकांनी भरभरून दिलेलं साहित्य. अध्यात्मात तर भारत अग्रगण्यच. त्यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संत मंडळींची खूपच मोठी यादी होईल. असे निरनिराळ्या क्षेत्रातले कितीतरी लोक आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावरच खूप मोठी कामगिरी करू शकले. इतकी असामान्य प्रगल्भ बुद्धी असायला खूप जन्म घ्यावे लागतील. यात शंकाच नाही. पण, निदान एखाद्या क्षेत्रात तरी त्याच्या वरच्या पदापर्यंत पोहोचता येईल एवढी तरी बुद्धी हवीच. म्हणजे “ऐवढे पण मी करू शकत नाही”, ही मनाची खंत जाईल आणि कशात तरी “हिरो” असल्याची “दिवा स्वप्न” पाहणे बंद होईल. माझ्या दृष्टीने लोकमान्य टिळक हे बुद्धीच्या बाबतीत अग्रगण्य. खगोलशास्त्र व गणिताचे गाढे पंडित, संस्कृत, इंग्लिश, व मराठी या भाषांवर प्रभुत्व. अध्यात्माचा त्यांचा सखोल अभ्यास केलेला असल्यामुळेच, गीतारहस्य सारखा महान ग्रंथ लिहून जगमान्यता मिळवलेली. राजकारणात तर ते महाराष्ट्राचे “गर्जणारे सिंहच” म्हटले जायचे. त्यांच्यासारखी प्रगल्भ बुद्धिमत्ता स्वतःला घेतलीच पाहिजे हे नक्की ठरवलं. मी विचारांच्या तंत्रितच होते. तेवढ्यात अनिलची चाहूल लागली. “डिझायनर मी” ने माझी झोप उडवली होतीच. निदान त्यांना तरी त्रास नको म्हणून मी अगदी चुपचाप स्वस्थ पडून राहिले.
अपेक्षेप्रमाणे पाच मिनिटातच अनिल गाढ झोपले. स्वतःलाच डिझाईन करायच्या सुंदर कल्पनेने मी मात्र उल्हसित झाले होते. रूप आणि बुद्धी किती व कशी घ्यायची ते नक्की केल्याने, कोणती कला आपल्यात असायला आवडेल. याचा मन विचार करू लागले. साहित्य, काव्य, गायन, नृत्य, चित्रकला असे कलेचे कितीतरी प्रकार आहेत. रविशंकर, अल्लारखां, भीमसेन जोशी यांच्यासारखे पारंगत असलेले कलाकारच अगदी वरच्या पदापर्यंत पोहोचतात. तेवढी जरी नाही, तरी छंद म्हणून काहीतरी कला प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात तरी यायला हवी. रोजच्या धावपळीच्या जीवनात समतोल राखायला, मनाला शांतता लाभायला त्याची मदत होते असे म्हणतात. “मोने”, “रेमब्रां” यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांची तैलचित्र पाहिली की मला त्यांचा नेहमी हेवा वाटतो. त्यामुळे ती कला थोड्याफार प्रमाणात माझ्यात निसर्गतः असलेली आवडेल. सतार सारखे एखादे वाद्य वाजवता आले कि स्वतःची करमणूक करता येईल आणि असले काही लिखाण करता आले तरी पुष्कळ झाले. म्हणजे कलांपैकी या गोष्टी घ्यायच्याच. ह्या पण गोष्टीचा निर्णय घेतल्याने थोडंसं हायसं वाटलं. एक सुस्कारा सोडून मी उजवीकडे वळले. नकळत पांघरून थोडसं खेचलं गेलं. पण सुदैवाने अनिल शांत झोपले होते. आता विचारांना गती मिळाली. मनाशी विचार केला — — हे, हे, सगळं रसायन जमणार कसं ? समजा वरती ठरवल्याप्रमाणे मनासारखे सगळे जमले नाहीच तरी आधी बुद्धिमत्ता मात्र भरपूर घेतलीच पाहिजेत. बाकीच्या गोष्टी कमी असल्या तरी चालतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप गोष्टी साध्य करता येतात हे आता अनुभवांनी कळले होते.
मनाला आलेल्या उत्साहामुळे कधी एकदा हे सगळं अनिलना सांगते असं झालं होतं. मी स्वतःलाच डिझाईन करून, सर्वगुणसंपन्न, अशी मी, स्वतःलाच कशी “निर्माण” करणार आहे. हे सक्काळी उठल्याबरोब्बर अनिलनां सांगून टाकायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं, की, अरे, आपण तर अजून कितीतरी गोष्टी लक्षात, विचांरात घेतल्याच नाहीत. मानव म्हणून जन्माला यायचं हे मात्र नक्कीच. कारण तरच बुद्धीचा, कलेचा पुरेपूर उपयोग करता येतो. मग — स्त्री व्हायचं का पुरुष? पुरुष झाल तर चांगलं. कारण स्वानुभवावरून संसाराच्या जबाबदारीमुळे स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय, आवडीनिवडी, सगळ्यांवर खूप मर्यादा घालाव्या लागतात. पुरुषांना मात्र त्यामानाने बरेच स्वातंत्र असतं. त्यांनी लग्न केलं नाही तरी समाज ते स्वीकारतो. स्त्री मात्र वेगळीच पडते. पुरुष जातीवरचा राग पांघरून खेचून ह्यांच्यावरच काढला गेला. अनिलना जाग येईल याची काळजी वाटली. पण त्यांनी झोपेतच स्वतःकडे पांघरूण ओढले आणि परत शांत झोपले. मी मात्र आधीच्या विचारात ओढली गेले. कोणच्या देशात जन्म घ्यावा बरं ? — पुढचा प्रश्न मनात आला. मी भारताभिमानी असल्याने भारतच चांगला वाटेल. मानव म्हणून जन्म घ्यायचा तर आधी आई-वडील शोधले पाहिजेत. हो, नाहीतरी ते आपल्याला कुठे ठरवता येतं ? विचारांची गती आता अधिकच वाढली. सध्याच्या सगळ्या आधुनिक शोधांचा फायदा घ्यायचा असे ठरवलं, तरी, आधी स्पर्म बँक शोधायच्या, मग लॅब मध्ये जन्म घ्यायचा. तसे केल्यावर अजून लॅब मध्ये पूर्ण माणूस जन्मला नाहीये. म्हणजे कोणातरी बाईचा गर्भाशय भाड्याने घ्यायचा आणि हे सगळं करायचं म्हणजे आधी या जगाचा निरोप घ्यायला हवा. तरच परत जन्म घेता येईल. म्हणजे, — हल्ली ख्रिस्ती समाजात प्रचलित असल्याप्रमाणे मला फक्त माझ्या मृत्यूनंतरच्याच विधींची सोय करून चालणार नाही. तर माझ्या पुढच्या जन्माची पण चोख व्यवस्था करूनच हे जग सोडावे लागेल. अ~रे, बा~प~रे, मी बिछानातच ताडकन उठून बसले. हे सगळं फारच “सायन्स फिक्शन” सारखे झालेय. ह्यांची चुळबुळ जाणवली. पण मी मात्र माझ्याच विचारात गर्क होते. एवढं करूनहि स्वभाव, आवडीनिवडी, नैतिक मूल्य, — कित्तीतरी गोष्टींचा मी अजून विचार सुद्धा केला नाहीये आणि आयुष्यात यशस्वी व्हायला (किंवा न व्हायला) नशिबाचा फार मोठा भाग असतो. हे आता अनुभवामुळे पूर्ण कळले आहे. त्यामुळे माझ्या इच्छेनुसार मी स्वतःला घडवलं तरी सुदैव, सुभाग्य हवे तसे, हवे तेवढे, घेता येईल का याची शंकाच आहे. ज्या देवाला मी सारखे दोष देत होते त्याच्याबद्दल मन आदराने भरून आलं. केवढं कठीण काम करत असतो हा आपला बिच्चारा देव ! असं मनाशी म्हणत मी हळूच आडवी झाले. एखादा जीव हवा तसा घडवण कित्ती अवघड आहे हे आता कळून चुकलं होतं. हे काही येर्या गबाळ्याचे, (म्हणजे माझं) काम नक्कीच नाही. “जेणो काम तेणो थाय” या गुजराती म्हणी प्रमाणे, उगीच गोता खाण्यापेक्षा, तो बिच्चारा देव, काही तक्रार न करता हे काम करतोय, तर त्यालाच ते करू द्यावं हेच बरं. माझी चुळबुळ मधून मधून होत होतीच. हळूहळू पाय “जमिनीला” लागत होते. हातच सोडून आपण पळत्याच्या मागे लागत आहोत. याची जाणीव झाली. आपल्यात जे काही “कमी” आहे त्याचाच फक्त विचार करण्यापेक्षा जे काही बौद्धिक, शारीरिक, मानसिक सामर्थ्य आपल्याजवळ आहे, त्याचाच पुरेपूर उपयोग केला म्हणजे झालं, नाही का ? शिवाय जे काही मला मिळालं आहे तेच कितीतरी चांगलं मिळालं आहे. माणूस म्हणून जन्माला आले, तेही भारतासारख्या प्रगत देशात. इथिओपिया, बिआफ्रा (Biafra) सारख्या ठिकाणी नाही. नंतर ब्रिटन सारख्या संपन्न देशात वास्तव्य करता आल्याने, खूप नवीन गोष्टी शिकता आल्या. भारत व ब्रिटन मधल्या चांगल्या गोष्टींचा संगम करायचा प्रयत्न करता आला. काही देशात स्त्रियांना किती कमी स्वातंत्र्य आहे हे ऐकून माहिती असल्याने त्याही बाबतीत मी सुदैवीच. शिवाय उच्चशिक्षित कुटुंबात जन्मले. झोपडपट्टी जन्माला आले असते तर कोणाची तरी धुणी-भांडी करण्यातच कदाचित जन्म गेला असता. माझ्या आई-वडिलांसारखे उत्तम शिकवण देणारे माता-पिता लाभले. त्यांच्या सुदृढ आरोग्याचा वारसा पण त्यांच्याकडूनच मिळाला. हे पण केवढं भाग्यच. कारण उत्तम आरोग्य असेल तरच जीवनातल्या कोणत्याही सुखाचा आनंद पूर्णपणे उपभोगता येतो हे तर नक्कीच आणि अनिलांसारखा मनमिळावू सहचरी, अभिमान बाळगावा अशी दोन अपत्ये, सून, जावई, नातवंडे मिळाली आहेत. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे लोक सुदैवानेच खूप चांगले मिळाले आहेत. त्यांनी सर्वांनीच खूप भरभरून दिलेलं प्रेम, माया, कोणत्याही जीवाला आणखीन काय हवं असतं? हे सगळं सोडून, स्वतःलाच डिझाईन करायचं कसलं खूळ मी डोक्यात घेऊन बसले आहे कोण जाणे ! नंदा सारखी एखादी “डिझायनर” हॅन्डबॅग विकत घेऊन “डिझायनर लेबलचं” हे खूळ मुळापासूनच उपटून टाकायचं आणि असले खुळ्यासारखे विचार मनात येऊ नयेत म्हणून बुद्धीला चालना मिळेल असं काहीतरी काम करायचं मनाशी निश्चित केलं. एवढ्यात “आज झोप येत नाहीये वाटतं ?”, पांघरुणांची खेचाखेची व माझ्या चुळबुळीमुळे झोपमोड झाल्याने अनिलांचा थोडा वैतागलेल्या आवाजातला प्रश्न. “आता येईल छान झोप” मी उत्साहाने म्हणाले. माझ्या उत्साहाचा काहीच संदर्भ न लागल्याने, एवढ्या उत्साही मनाने हि झोपणार कशी, अशा अर्थाचा ह्यांचा नुसताच प्रश्नार्थक “अं ?”. “हो, मी खूप खूप सुदैवी, भाग्यवान आहे याची मला आता पूर्ण जाणीव झालीय. त्यामुळे मला आता खूप छान, शांत झोप लागेल.” अस म्हणत मी अनिलना पुढे बोलायची काहीच संधी न देता हलकेच त्यांच्या अगदी जवळ सरकले. त्यांच्या चेहर्यावरचा आश्चर्यचकित आनंद मला रात्रीच्या काळोखात दिसला नाही पण त्यांच्या माझ्या भोवती लपटलेल्या हातांत नक्कीच जाणवला.

— लेखन : लीना फाटक. वाॅरिंगटन, यु. के.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
लीना फाटक यांच्या ‘डिझायनर मी एक स्वप्न रंजन’, हा लेख वाचला, खूप छान वाटला. खरोखर जगभर ब्रँडेड गोष्टींची गोष्टींचे सर्वांनाच आकर्षण आहे मात्र त्यापासून सुरुवात करून स्वतःलाच डिझाईन करायचे ही कल्पनाच अफलातून वाटली. AI प्रणाली चीनमध्ये एक संपूर्ण हॉस्पिटल चालवत आहेत आणि दहा हजार रुग्ण अत्यंत उत्कृष्ट रित्या उपचार घेत आहेत हे वाचून कालच मी स्तिमित झाले.AI च्या रोज नवनवीन बातम्या येत आहेत. नक्की कुठे जग चालले आहे याचा विचार करून भांबवायलाच होते आहे. या पार्श्वभूमीवर लीना फाटक यांनी काही वर्षापूर्वी स्वतःला डिझाईन करायची कल्पना मांडली ती प्रत्यक्षात यायला काही काळच आहे असे वाटते. मात्र तसे झाले की सारे जगच कृत्रिम होऊन जाईल. एकमेकांच्या कलांचा, गुणांचा आदर ही कवी कल्पना राहील. त्यांनी शेवटी म्हटल्याप्रमाणे मी ही नेहमी आपल्याला जे मिळाले ते खूप काही मिळाले असे म्हणते. त्यांच्या पुढच्या विचारांशी माझे विचार तंतोतंत जुळतात. त्यामुळे दिलासा मिळत असताना एक भाबडी आशा अजूनही आहे की सारेच काही कृत्रिम व्हायला नको.
एक छान लेख वाचल्याचे समाधान मिळाले.
नीला बर्वे,
सिंगापूर.
खुप खुप मनापासुन धन्यवाद नीलाताई. तुम्हाला माझे विचार, भावना पूर्णपणे समजल्या आहेत. हे तुम्हीच्या सुंदर अभिप्रायावरून लक्षात आलेय. त्याचा मनस्वी आनंद झालाय. AI ने सगळेच काबीज करायला नको. असे मला सतत वाटते. पण — शेवटी माझे अस्तित्व तोपर्यंत नसेलच. हा स्वार्थी विचार मनात आलाच. आपल्या हातात काहीच नसते. म्हणूनच — कालाय तस्मै नमः. एवढेच म्हणावेसे वाटते. मनःपूर्वक परत धन्यवाद.