१. सख्या रे …
सख्या रे,
तुझी याद धुंद पावसाळी
अशी कशी आली,
गाली माझ्या लाली ॥ धृ ॥
क्षण तुझ्या सोबतीचे
थेंब झरावे निळाईचे
थरथरती अधर काया
ओली झाली || १ ||
चांदण फुलते प्रीतीचे
दरवळ्ते गंध स्मृतीचे
जशी फुलून आली,
पानावरी अबोली || २ ||
हात तुझा हाती होता
की मज तो भास होता
रिमझिमता सहवास होता
कळले नाही मज काही
तुझे गोंदणे भाळी || ३ ||
२. भिजलेली ती….
भुरभुरता पाऊस,
भिजलेली ती
ओलेत्या पापणीत,
रुजलेला मी ॥ धृ.॥
पायात पैंजण, वाजते रुणझुण
बोटांची गुंफण, मनात धून
बरसत्या सरीत बिलगती ती
मोहरलेला मी || १ ||
पदराची सळसळ, अधराची मखमल
देहाचा दरवळ, नजरही अवखळ
श्रावण गंधात, विरघळती ती
अडलेला मी || २ ||
सोनेरी ऊन केळीचे बन
गुंतलेले मन, सातरंगी कमान
कातळ कड्यावर निथळती ती,
गुंतलेला मी || ३ ||
आभाळ गर्भात भरल्या ढगात
अंकुरल्या पातीत, मातीच्या कुशीत
आठवाच्या स्वप्नात थिरकती ती
निजलेला मी ||४||
३. तू भेटीस यावे….
असता रिमझिमता पाऊस
तू भेटीस यावे
तुझ्या माझ्या ओलेत्या
मिठीचे गाणे व्हावे || धृ ||
दरवळता मातीचा गंध,
मन धुंद धुंद
अंकुरती सोडूनिया बंध,
जाई जुई कुंद
हिरवाईच्या चित्रामध्ये
तुला मी पहावे || १ ||
थेंब थेंब पावसाचे
इंद्रधनुचे टिंब
मन होते झुला,
जीव होतो ओलाचिंब
घेऊनी पंख पाखराचे,
आभाळा रंग द्यावे || २ ||
घेऊनी गार वारा
सांज पावसाळी
सोडूनि अबोला
भेटण्यास आली
तुझ्या सोबतीने गं,
जीवन हे फुलावे || ३ ||
४. भरून येतं आभाळ …
भरून येतं आभाळ
तुझी आठवण येते
बरसत्या सरींनाही
तुझे गंधाळणे कळते
मी चालू लागतो वाट
तुझ्या ओढीने रानातली
थेंब थेंब होऊन उतरतात
अलगद गाणी पानातली
धुंद धुक्यातली ती साद
आणि बरसणारा झरा
तू साकारतेस मनातली
काळजावर ओलसर चरा..
पुन्हा एकदा पाऊस
तुझा न माझा

— रचना : रवी वाडकर. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर कविता