Saturday, July 12, 2025
Homeकलामराठी मालिका : बिघडलेली रेसिपी

मराठी मालिका : बिघडलेली रेसिपी

कंटाळवाणे असले तरी आपण टी व्ही वरचे कार्यक्रम, मालिका का बघतो ? त्याचे उत्तर TINA म्हणजे there is no alternative, दुसरा काही उद्योग, उपाय नाही म्हणून असे आहे !

रटाळ मराठी मालिकांचे खोल परीक्षण केले तर सहज लक्षात येईल की या सर्व मालिकात तोच तोचपणा असतो. एक साचा झाला आहे या सर्व मालिकांचा. तीच मालिकांची बिघडलेली रेसिपी सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

बहुतेक मालिका या नायिका प्रधान असतात. कथा स्त्री वर्गाशी संबंधित. त्यात ओरिजनल असे फार काही नसते. अनेक मालिका इतर भाषांत अन्य चॅनल वरून चक्क उचललेल्या देखील असतात. नायिका एक असली तरी नायक मंडळी बरीच असतात. नवऱ्याची भानगड असलीच पाहिजे. म्हणजे आणखीन एक खलनायिका आली. ती तिची आई किंवा कुणी आत्या मावशी तिच्या कृष्ण कृत्यांना साथ देणारी. पूर्वी पडद्यावर प्राण, प्रेम चोप्रा, जीवन अशा खलनायकांचे राज्य होते. आता खलनायिकांना जास्त महत्व आले आहे.या खलनायिका मुख्य सोशिक साध्या भोळ्या नायिकेला छळण्याचे काम मालिका संपेपर्यंत करीत असतात. श्यामची प्रेमळ आई आजकाल कुठेच दिसत नाही. ती किंवा यशवंताच्या कवितेतील डोळ्यात आसवे आणणारी आई अचानक कुठे गायब झाली कोण जाणे ? इथल्या बहुतेक आया एकतर सोशिक, आसवे ढाळणाऱ्या किंवा कट कारस्थाने करणाऱ्या असतात.

कुटुंबात बरीच माणसे दाखविलेली असतात. त्यामुळे प्रत्यक्षात हम दो हमारे दो, अन् वेगळे राहणारे वृद्ध आईबाप अशी परिस्थिती असली तरी मराठी मालिकात भरले कुटुंब दिसते. मराठी मालिकांना आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्या मुळे बंगले, राजवाडे, महाल दिसत नाहीत.साधे गरीब घर किंवा एकदोन सोफा सेट असलेली बैठक ! आता तर खेड्यापाड्यातील लोकच टी वी बघतात अशी धारणा झाल्यामुळे ग्रामीण भाषा, गाव खेड्यातील पार्श्वभूमी यावर कथानक बेतलेले दिसते. त्यामुळे इथे कुणी रागावले, भांडले की चक्क एकमेकाच्या थोबाडीत मारतात ! हा असा हिंसाचार घरच्या एकत्र कुटुंबाने आपल्या मुलाबाळासह बघावा अशी या लेखक निर्मात्यांची इच्छा असते !

प्रत्येक मालिकेत एक दोन लहान मुले असलीच पाहिजे असा नियम झाला आहे. एक पुरुष, दोन बाया असे सूत्र ठरल्याने या दोघी पैकी खाष्ट बाई, खलनायिका या मुलाना चक्क त्रास देते. त्यांचा छळ करते. हा लहान मुलांवरील उघड अत्त्याचार आपण एकत्र कुटुंबाने चॉकलेट सारखा चघळत बघावा अशी दिग्दर्शकाची इच्छा असते.
खल नायिकांचे कारनामे, मुलांचे छळ यांचे संवाद लिहिणाऱ्या, दिग्दर्शन करणाऱ्या, एवढेच काय कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या देखील बहुतांशी बायकाच असतात, हे श्रेय नामावली वरून सहज लक्षात येते. आता याला काय म्हणावे ?

बहुतेक नायक हे तापट, जिद्दी, तऱ्हेवाईक वागणारे असेच दाखवले असतात. त्यांचा तऱ्हेवाईकपणा सहन करणारे कुटुंब, त्याचे आईवडील, त्याच्या आयुष्यातील एक पेक्षा दोन स्त्रिया.. सगळेच मालिकाभर सहन करीत असतात.
एकमेकांवर खोट्या केसेस, मग पोलीस स्टेशनच्या चकरा कुणाला तरी कोठडी (कारण पोलिस स्टेशन, जेलचे सेट सदा सर्वदा तयार असावेत) हेही ठरलेलेच!एरवी पोलिस इन्स्पेक्टर यांच्या ड्रेसेस चे काय करायचे हा प्रश्न पडत असावा निर्मात्यांना.

यातील बायका घरात देखील बाहेर नेसायच्या किमती साड्या, ड्रेसेस घालून वावरताना दिसतात. झोपतात देखील भारी साड्या नेसून. कदाचित सेट वर कपडे कसे कुठे बदलायचे ही समस्या असावी !

बहुतेक कथानक सुरुवात चांगली असलेली पण नंतर महिन्या दोन महिन्यांनी भरकटत जाणारी असतात. उद्या काय शूट करायचे, हे कलाकारांनाही माहिती नसावे. ते वेळेवर समोर आलेले संवाद बोलून प्रसंग निभावून नेतात. मूळ कथा काय, नेमके काय सांगायचे आहे, मनोरंजन कुणाचे कडे करायचे आहे, याचा विचार न करता, टी आर पी बघून, निर्मात्याच्या मर्जी प्रमाणे कथा, पात्रे बदलत जातात. अनेक पात्रे मधूनच गायब झालेली दिसतात. एका मालिकेतील नायिका सुरवातीला डेंटिस्ट असलेली दाखवली.पुढे तिचा दातांचा दवाखाना गायब झाला. त्यामुळे ती कुठे काय करते हे कळायला मार्ग नाही. पुढे ती नायिका च गायब झाली. तिच्या जागी दुसरी आली.

या अशा रिप्लेसमेंट झाल्यावर सोशल मीडियावर निवेदन, ट्रोल, चर्चा हे सगळे ठरवून केलेले नाटक. सिरियल सोबत फुकट मनोरंजन ! कोणताही सण आला की मग तर विचारूच नका. तो प्रत्येक चॅनल च्या प्रत्येक सिरियल मध्ये साग्रसंगीत साजरा झालाच पाहिजे. मग वेगवेगळ्या सिरियल मध्ये वेगवेगळ्या दिवशी, या वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा होतो. त्या निमित्ताने प्रेक्षक मूर्ख आहेत असे गृहीत धरून त्या सणाचे महत्व, त्या मागची कथा कुटुंबातील वृद्ध आजोबा किंवा आजी सांगतात.या निमित्ताने समाज प्रबोधनाचे, संस्कृती संवर्धनाचे पुण्य, लेखिका, दिग्दर्शिका, निर्मात्या आपल्या पदरात पडून घेतात.

मधूनच डोक्यावर देवीचा घट घेतलेली मोठ्ठे कुंकू लावलेली बाई अवतरते. ती पुढे काय संकट येणार हे आधीच सांगून अंध विश्वासाला खतपाणी घालते. कधी कधी हेच काम प्रत्येक सिरियल मध्ये आलटून पालटून येणारी तीच ती भटजी मंडळी करतात. नायिकांनी विशिष्ट हावभाव, ओठांची विचित्र हालचाल करूनच बोलले पाहिजे असा दंडक असतो. काही स्त्रिया ऐश्वर्या नारकर, सुलोचना यांची जुनी आठवण जागवणारा सोशिक नायिकेचा, आईचा अभिनय करतात. नायक मंडळींनी अमिताभ सारखे रागीट, संतापी, काहीसे तऱ्हेवाईक असले पाहिजे असा नियम दिसतो. मृदू गोड स्वभावाचे, अमोल पालेकराची आठवण करून देणारे साधे बिचारे नायक दिसत नाहीत कुठे.

सिरियल मध्ये घडणाऱ्या प्रसंगामागचे लॉजिक, एडिटिंग मध्ये होणाऱ्या घोडचुका, विस्कळीत भरकटत जाणारी पटकथा याबद्दल न बोललेलेच बरे.

कोणे एके काळी उत्कृष्ट नाटकात, चित्रपटात काम केलेले मुरलेले, जाणते, कसबी कलाकार सिरियल मधील हा अतार्किक सावळा गोंधळ कसा काय सहन करतात हा माझ्या सारख्या ला पडलेला गहन प्रश्न ? पण कशासाठी, पैशासाठी हे साधे सोपे उत्तर कुणाला प्रश्न न विचारताच मिळते. अन् जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असो द्यावे समाधान.. असे स्वतःच स्वतःला समजवावे लागते !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कुठल्याही मालिकेचे नाव न घेता खूप छान लिहिले आहे सर…पण शेवटी पालथ्या घड्यावर पाणी आणि आपल्या हातात नरोटी सारखा दिलेला रिमोट त्यामुळे रिमोट कंट्रोल करण्यापेक्षा रागावर कंट्रोल ठेवून मालिका पहाव्यात…अगदीच नगण्य मालिका (तशा सगळ्याच नगण्य) असेल तर रिमोट कंट्रोल करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments