अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथील एक तरुण अनंत अडचणींना तोंड देत राष्ट्रीय भारूडकार होतो, तसा किताब मिळवितो, एम ए पर्यंत शिक्षण होऊनही पूर्ण वेळ भारुड सादर करून, त्यावरच आपली उपजीविका करतात, असे कलाकार म्हणजे हमीद सय्यद हे होत.
हमीद सय्यद यांचा जन्म १३ जून १९८१ रोजी भूमिहीन शेतमजूर असलेल्या आईवडिलांच्या पोटी झाला. ते दोघेही ज्यांच्या शेतावर काम मिळेल, तिथे काम करीत असत. त्याशिवाय वडील घरोघरी जाऊन कावडीने पाणी टाकायचे. मार्केटमध्ये जाऊन हमाली करायचे. दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
अशा हलाखीच्या परिस्थितीत हमीद सय्यद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातीलच शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेजमध्ये झाले.
विशेष म्हणजे हमीद सय्यद यांना लोक कलेची आवड ते शाळेत असतानाच लागली होती. कविता म्हणणे, देशभक्तीपर गीत गाणे, गाणी, अभंग, गौळणी, लोकगीते म्हणणे तसेच गावातील नाम सप्ताहात कथा, कीर्तन ऐकणे त्यातून आवड वाढत गेली. रेडिओ, टीव्ही वरील भारूड, पोवाडे, गाणी ऐकणे, कलावंताच्या मुलाखती बघणे, कार्यक्रम बघणे ते बघून त्यांना आणखी प्रेरणा मिळायची.

हमीद सय्यद एकदा मित्रासमवेत पंढरपूर वारी करून आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवगड येथील दत्त जयंती सोहळयामध्ये मित्रांसमेवत त्यांनी प्रथम भारूड सादर केले. पुढे शाहिरी पथकात सामील होऊन ते वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून स्टेजवर कार्यक्रम करत आहे. अशा प्रकारे ते गेली ३२ वर्षे कार्यक्रम करीत आले आहेत. प्रख्यात भारुडकार ह. भ. प. चंदाताई तिवाडी या त्यांच्या भारुडातील गुरू आहेत.
आज जरी राष्ट्रीय भारुडकार म्हणून हमीद सय्यद यांनी नाव लौकिक मिळविला असला तरी, सुरवातीला समाज नांव ठेवील म्हणून घरातून फार विरोध झाला. पण आता मात्र घरातून पूर्णपणे पाठींबा मिळत आहे.
स्टेज शो करता करता हमीद सय्यद यांनी २००७ साली आकाशवाणी, पुणे केंद्रावर प्रथम स्वर चाचणी केली. त्यात ते उत्तीर्ण झाले आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आज ते ए ग्रेड चे आकाशवाणी कलाकार आहेत. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई, अहिल्यानगर, सातारा केंद्रांवर त्यांचे असंख्य कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत आणि निरंतर चालू आहेत
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बाबतीत बोलावले तर हमीद सय्यद यांचे मुंबई दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर धीना-धीन-धा, लोकोत्सव, लोकभजन, कीर्तनाचे रंगी, प्रभात कट्टा, माझी माय, मैत्र शब्द सुरांचे, गुढीपाडवा विशेष कलामहोत्सव अशा विविध कार्यक्रमात त्यांनी भारुड सादर केले आहे. तर एबीपी माझा वाहिनीवर “माझा विठ्ठल माझी वारी” या कार्यक्रमात, झी टॉकीज व झी चित्र मंदिर वरील “मन मंदिरा गजर भक्तीचा” या कीर्तन मालिकेत त्यांनी अनेक वेळा भारुड सादर केले आहे. बीबीसी मराठी वाहिनीवर त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

हमीद सय्यद यांच्या मुलाखती, कार्यक्रमाच्या बातम्या, लेख अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिध्द होत असतात.
आपल्याला “राष्ट्रीय भारुडकार” हा किताब कसा मिळाला ? असे विचारले असता हमीद सय्यद यांनी सांगितले की, “जेष्ठ नाट्यदिग्दर्शक पद्मश्री प्रा वामन केंद्रे सर यांच्या रंगपीठ थिएटर मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने केंद्रे सर यांच्या बीड जिल्ह्यातील दरडवाडी या गावी त्यांच्या गावी, त्यांचे वडील जेष्ठ भारूडकार कै माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीदिनी २०१४ साली “राष्ट्रीय भारूड महोत्सव” आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात हजारो भारूडकार सहभागी झाले होते. त्यात मी ही एक होतो. स्पर्धात्मक असलेल्या या महोत्सवात माझ्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. प्रथम राष्ट्रीय भारूडकार या पुरस्काराने प्रा. वामन केंद्रे सरांच्या व गौरी केंद्रे मॅडम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रुपये २५ हजार असे पारितोषिक देऊन माझा सन्मान करण्यात आला” आणि तेव्हापासून ते राष्ट्रीय भारूडकार झाले.

हमीद सय्यद हे मराठी व्यतिरिक्त हिंदी भाषेतही भारुड सादर करीत असतात.

हमीद सय्यद आध्यात्मिक प्रबोधनाबरोबर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आर्टिस्ट ग्रुप यांच्या मार्फत केंद्र, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, स्वच्छता, पर्यावरण, वृक्षारोपण, बेटी बचाओ, महिला सक्ष्मीकरण, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, जलसंधारण अशा अनेक सामाजिक विषयांवर जनजागृतीचे कार्यक्रम निरंतर करीत असतात.
हमीद सय्यद यांनी भारुड सादर केलेल्या महत्वाच्या कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम म्हणजे विश्वशांती केंद्र आळंदी आयोजित जागतिक सहिष्णुता सप्ताह, पद्मश्री वामन केंद्रे यांच्या रंगपीठ थिएटर मुंबई यांच्या तर्फे आयोजित राष्ट्रीय भारुड महोत्सव, (प्रथम पारितोषिक) वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित वारकरी संत साहित्य संमेलन, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी, पु ल देशपांडे अकादमी मुंबई आयोजित लोककला महोत्सव, संसदीय राजभाषा समितीसमोर शिर्डी येथे भारुड सादरीकरण बहिणाबाई महोत्सव, जळगाव, सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरीहरण यांची संकल्पना असेलेल्या साउंड ऑफ महाराष्ट्र हा कार्यक्रम, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने माजलगाव येथे आयोजित भारूड महोत्सव, विधिनाट्य महोत्सव, कोल्हापूर हे होत.

हमीद सय्यद यांनी जय हिंद लोककला मंच या संस्थेची स्थापना करून विविध लोककलांचे जतन, संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. याद्वारे युवा कलाकारांना प्रशिक्षण, लोककलावंत संघटन, अनेक सामाजिक उपक्रम राबवून विविध सामाजिक विषयावर लोककला व भारुडातून ते समाज जनजागृती करीत आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोककला द्वारे प्रबोधन तसेच लोककला कार्यशाळा ते आयोजित करीत असतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केंद्रीय युवक महोत्सवात लोककला भारूड, पोवाडा, गोंधळ या विषयासाठी मान्यवर परीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार देशात समता, बंधुता, एकात्मता, नांदावी, सामाजिक सलोखा कायम राहावा याकरिता सदैव ते सदैव प्रयत्नशील आहेत. आपली जात, धर्म विसरून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांचे सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधन चालू आहे.
आजवर हमीद सय्यद यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली अशा विविध ठिकाणी ४ हजार पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केले आहेत.

हमीद सय्यद यांना भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक मंत्रालयातर्फे नेहरू युवा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, माजी उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते विश्वशांती केंद्र आळंदी, माइर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे यांचा राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड अध्यात्मरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार, जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते संस्कृती प्रतिष्ठान, बीड यांचा संत भगवान बाबा अध्यात्म गौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा लोकशाहीर पठ्ठे बापुराव पुरस्कार, लोकमत कला गौरव पुरस्कार असे ३०० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी वारकरी साहित्य परिषदेने त्यांचा विषेश सन्मान केला आहे.

लोककलेच्या क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल ? असे विचारले असता हमीद सय्यद म्हणाले, “कुठल्याही कामात संघर्ष अटळ आहे. आपल्या कामात सातत्य ठेवा. निर्व्यसनी रहा. चारित्र्य जपा. काळाच्या ओघात लोप पावणाऱ्या लोककलांचे जतन सवर्धन करा. एक दिवस नक्कीच यश मिळेल.”
खरंच, सशक्त, सक्षम भारत देश घडण्यासाठी हमीद सय्यद यांच्या सारख्या हजारो, लाखो राष्ट्रीय भारुडकारांची देशाला, जगाला नितांत गरज आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप छान उतरतोर अशीच प्रगती होत जावो हीच शुभेच्छा
राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांच्याबद्दल….
राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांच्या कार्यावर देवेंद्र भुजबळ जी यांनी लिहिलेला लेख वाचून खूप आनंद वाटला. आपल्या भारुडकलेतून समाजाला जागं करण्याचं काम त्यांनी मोठ्या निष्ठेने केलं आहे. विविध सामाजिक विषयांवर भारुड सादर करताना ते सामान्य माणसाच्या भाषेत, त्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या शब्दांत उद्बोधन करतात – हे खूपच विलक्षण आहे. आकाशवाणी व दूरदर्शनचे ते एक मान्यता प्राप्त कलाकार आहेत,
त्यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्ष, कष्ट, निष्ठा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम. बालपणापासूनच कलेशी प्रामाणिक प्रेम जपत त्यांची ही अविरत वाटचाल खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
देवेंद्र भुजबळ जी यांनी त्यांच्या या प्रवासाचे चित्रण अतिशय नेमकं, हळवं आणि प्रभावी पद्धतीने केलं आहे. लेख वाचताना हमीद सय्यद यांच्या कष्टाची, त्यांच्या संवेदनशील मनाची, आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीची जाणीव मनात ठसते.
त्यांच्या या अद्वितीय कार्याला माझा मनःपूर्वक सलाम. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा.
– यशवंतसुत (दादाभाऊ तांबे)
Very inspiring story. Hameed deserved for many more things. Congratulations and all the best 💐
राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद हे खरोखरच सर्वगुणसंपन्न आहेत.समाज प्रबोधन ची त्यांनी स्विकारलेली सेवा अतिशय स्तुत्य आणि नतमस्तक होण्याइतकी पवित्र आहे..देव देश आणि धर्म यासाठी अश्या व्यक्तीच समाजाला दिशादर्शक आहेत.
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
निरोगी दीर्घायुषी व्हावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना..
अतिशय कस्टाळू व कलेची आवड असणारे कलाकार,ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवणारे महान कलाकार,
अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.