आज सकाळी लवकर उठून गॅलरीत असणाऱ्या गुलाबाच्या झाडावर उमललेल्या फुलाचं दर्शन घ्यायला मी धावले. दोन दिवसांपासून कळीचं हळूहळू फुलात होणारे रुपांतर पाहून खूप आनंद होत होता. आज पूर्ण उमललेलं ते सुंदर गुलाबी रंगाचे फुल पाहून मी भूतकाळात गेले.
त्यावेळी आम्ही मुंबईत; दादरला राहात होतो. माझी शाळा ‘बालक विहार’. आमच्या शाळेजवळच पाटलांचा मोठा बंगला होता. बंगल्याशेजारी खूप मोठी गुलाबाच्या फुलांची बाग होती. आम्हां मैत्रिणींना रोज मधल्या सुट्टीत तिथे जाऊन त्या विविधरंगी गुलाबाच्या फुलांना पहायचा जणू नादच लागला होता. विशेष म्हणजे पाटलांचा मुलगा माझ्या भावाचा मित्र होता. त्यामुळे भावाजवळ मी नेहमी त्या फुलांसाठी हट्ट करायचे. “आण ना रे, माझ्यासाठी फुलं !” मला केसात फुलं माळायला खूप आवडायचे. तसं अधून मधून माझा भाऊ मित्राच्या बागेतील एखादं फूल माझ्यासाठी मागून आणायचा. त्या बागेतील कधी पांढऱ्या गुलाबावर तर कधी लालबुंद गुलाबावर, तर कधी चिनी गुलाबावर माझी नजर जायची, माझं मनंच जायचं म्हणा ना ! आणि मनोमन मी ते फुल केसांत माळलेलं असायचं. मग काय, दिवसभर मी आनंदात असायचे.

आज ती बाग, ती रंगीबेरंगी फुले माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. चाळीस / पंचेचाळीस वर्षां पूर्वीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. कुठे एका कुंडीत उगवलेलं हे एकुलतं एक फुल आणि कुठे ती पन्नास साठ झाडे असलेली गुलाबाची बाग !
माझ्या मनात खूप माणसांनी गजबजलेल्या घराची आणि वन बीएचके मध्ये राहणाऱ्या कुटुंबाची उगीचच तुलना झाली. आजकाल अशा बागाही दिसत नाहीत आणि माणसांनी भरलेली घरही !

— लेखन : सौ.अरुणा कळसकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800