Saturday, July 12, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : २२

स्नेहाची रेसिपी : २२

“उपवासाचे साबुदाणा व भगरीचे रसगुल्ले”

आपल्याकडे काही ना काही निमित्ताने नेहमीच उपवास सुरु असतात आणि उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ, वडे, भगर म्हणजेच वरीचे तांदूळ, बटाटा.. रताळ्याचे पदार्थ सुद्धा खाण्याचा खूप कंटाळा येतो. म्हणून आज आपण एक मस्त आणि खास सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवूया.
मिरची, तिखट, तेलकट, तुपकट पदार्थांमुळे पित्त वाढते. म्हणून यासाठीच ही स्पेशल डिश बनवू चला तर मग …

साहित्य : १ लहान स्टीलची वाटी साबुदाणा, 1 वाटी भगरीचे पीठ, 1 मोठी वाटी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, केशर काड्या, रोझ, केवडा किंवा वेलदोडा यांपैकी आवडेल तो इसेन्स, 1 लिटर दूध.

कृती : सर्वांत आधी गॅसवर कढईत दूध उकळायला ठेवावे. तो पर्यंत साबुदाणा व भगरीचे मिक्सर मधून फिरवून बारीक पीठ बनवून घेऊ. साबुदाण्याचे पीठ मात्र एकदम बारीक करावे. ते बारीक छिद्राच्या रवापीठीच्या चाळणीतून व्यवस्थित चाळुन घ्यावे म्हणजे रसगुल्ले छान सॉफ्ट होतात. वरीचे तांदूळ म्हणजेच भगर थोडीशी रवाळ असली तरी हरकत नाही कारण ती शिजून सॉफ्ट होतेच.

आता दूध उकळायला लागले असेल. थोडेसे आटले की त्यात भगरीचे पीठ घालावे व व्यवस्थित घोटावे. मंद आचेवर 10 मिनिटे छान शिजवावे. बुडाला लागू नये आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून मधून मधून खाली वर हलवावे. पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यावी.

आता ते मस्त शिजल्यामुळे फुगून छान आळले असेल आणि घट्टसर झाले असेल. आता ते 10 मिनिटे घट्ट झाकून ठेवावे. ते थोडेसे थंड होईपर्यंत गॅसवर कढई ठेवून त्यात 1 मोठी वाटी साखर आणि ती बुडेपर्यंत पाणी घालावे. त्याचा अगदी एकतारी पाक बनवावा. त्यात आवडीनुसार इसेन्स किंवा वेलची पूड, केशर घालावे व गॅस बंद करावा.

आता ते झाकून ठेवलेले पीठ खाली परातीत काढून घेऊन पावभाजीच्या रगड्याने.. स्मॅशरने भरपुर घोटून घोटून घोटून सॉफ्ट बनवून घ्यावे. त्यामुळे हलकेपणा येतो. मग त्यात मिल्क पावडर घालावी व पुन्हा घोटावे. आता त्यात साबुदाण्याचे पीठ घालून छान मिक्स करावे. ते हलके होऊन हाताला, परातीला चिकटणार नाही तोपर्यंत व्यवस्थितपणे मळावे. म्हणजे ते खूप छान तयार झाले गोळे बनवण्यासाठी असे समजावे. त्यामुळे रसगुल्ले आतपर्यंत शिजून हलके होतात. अन्यथा आतून घट्ट राहतात व टेस्ट बिघडते.

त्यानंतर या पिठाचे आपल्या आवडीनुसार गोळे बनवावेत व मोदकपात्रात किंवा मोठ्या पाटीत पाणी उकळण्यास ठेवून मध्ये रिंग, वाटी ठेवून त्यावर चाळणी ठेवून त्याला किंचीत तुप लावून त्यावर हे गोळे पसरून ठेवावेत आणि मग त्यावर झाकण ठेवून 10..15 मिनिटे व्यवस्थित दणकून वाफवावेत. मग हे मस्त वाफले गेल्याची खात्री करून साखरेच्या गरम पाकात टाकावेत. जर पाक थंड झाला असेल तर गरम करून घेऊन मगच त्यात सोडावेत. म्हणजे पाक व्यवस्थित आतमध्ये जाईल 15..20 मिनिटे हे तसेंच मुरवावेत. म्हणजे पाक छान मुरून टम्म फुगतील.

आता आपले रसगुल्ले खाण्यासाठी एकदम तय्यार आहेत. ते आवडीनुसार गरम, थंड खावेत. सर्व्ह करताना सजावटी साठी वरून केशर काडी किंवा पिस्ते, बदाम यांचे काप घालावेत म्हणजे अधिक आकर्षक दिसतील.

वैशिष्टय : हे रसगुल्ले पांढरेशुभ्र, आकर्षक तर दिसतातच पण सॉफ्ट होतात आणि टेस्टी लागतात. आठवडाभर छान राहतात. उपवासाला साबुदाणा आणि भगर त्यात असल्यामुळे दमदार असतात त्यामुळे पोट पण भरते आणि लगेंच भूक लागत नाही. उपवासाच्या पदार्थांमुळे बरेच वेळा पित्ताचा त्रास होतो. थंड, गोड रसगुल्ल्यामुळे तो आजिबात होत नाही. हेल्दी, टेस्टी, आकर्षक अशी ही नावीन्यपूर्ण डिश सर्वांना नक्कीच आवडेल. वयस्कर लोकांना दातांनी पापड, चिवडे, शेंगदाणे वगैरे गोष्टी खाताना खूप त्रास होतो. या खास डिशचा कोणीही मनसोक्त सहज आस्वाद घेऊ शकतो. मग करून बघाच नक्की.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments