Saturday, July 12, 2025
Homeलेखमाझे वडील : माझे गुरू

माझे वडील : माझे गुरू

वर्दीतील व्यक्तीसुद्धा किती संवेदनशील मनाची असू शकते, हे निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनिता नाशिककर मॅडम यांनी त्यांच्या वडीलांविषयी लिहिलेल्या पुढील आठवणींवरून दिसून येईल. त्यांचे वडील स्वर्गीय कृष्णाजी कुलकर्णी यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

आज १० जुलै. या निमित्ताने मला माझ्या वडिलांची खूप आठवण येतेय. योगायोग आजच गुरू पौर्णिमा आहे. या निमित्ताने माझ्या वडिलांचे स्मरण करताना, माझ्या लक्षात येते की, माझे वडील हे केवळ माझे वडिलच नव्हते तर ते माझे “गुरू” देखील होते. त्यांची शिकवण अंगीबाणवल्यानेच मी माझी पोलिस सेवा चांगल्या पद्धतीने बजावू शकले. तसेच माझे जीवन देखील योग्य प्रकारे जगू शकले आणि जगत आहे.

नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात (पीटीसी) पोलिस उप निरिक्षक पदासाठी मी ३८ वर्षांपूर्वी प्रशिक्षण घेत असताना, वडील अचानक गेले तो हा दिवस,म्हणजे १० जुलै, मी विसरू म्हणते तरी आज पर्यंत कधी विसरू शकले नाही, इतका या दिवसाने माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला आहे.

मी वडिलांना काका म्हणायचे आणि ते मला सुनिल म्हणायचे. तिथेच माझ्या भविष्यातली पाळमुळं रुजली गेली, असं मला वाटतं. काकांनी माझा पिंड चांगलाच ओळखला होता. दहावी झाल्यावर मला कॉलेजला जायचं होतं. आमच्या हुपरी गावात कॉलेज नव्हतं. म्हणून मला हुपरीहून कोल्हापूरला बसने अपडाऊन करावं लागणार होतं. तेंव्हा काका म्हणाले, तुला वावगं काही आवडत नाही. त्यामुळे तू रोज भांडण करून येशील. म्हणून मग मी काकांना वचन दिलं की, मी कुणाशी भांडणार नाही,पण मला कॉलेज शिकू द्या. मला ग्रॅज्युएट होऊ द्या. मला नोकरी करायचे आहे.

तेव्हा आमच्या घरात नोकरीची अजिबात काही पार्श्वभूमी नव्हती. चांदीचा उद्योग आणि शेती या दोन्ही धंद्यांमध्ये रमलेले आमचे कुटुंब होते. त्यात मी नोकरीचा हट्ट धरलेला होता. काकांनी मला कॉलेजला घातलं. मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत १९८६ साली कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू काॅलेज मधून बी.कॉम झाले.

सुदैवाने १९८६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निघालेल्या जाहिरातीनुसार मी अर्ज केला. मूळची खेळाडू असल्याने मला पास होणं काही अवघड गेलं नाही आणि मी ६ जून रोजी काकांचा निरोप घेऊन नाशिकला जाणाऱ्या सटाणा गाडीत बसले .त्यावेळी काकांचा जो निरोप घेतला तो शेवटचा ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ते खरं ठरलं आणि १० जुलै १९८७ रोजी काका हृदय विकाराच्या झटक्याने गेले.

मला घ्यायला माझे भाऊजी पीटीसीत आले. त्यापूर्वी दोन दिवस आधी शुक्रवारी काका गेले त्याच दिवशी आम्हांला पीटीसी मध्ये गोड पदार्थ असायचा आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज असायचं. मी शाकाहारी असल्याने मला गोड पदार्थ दिला होता. खरं म्हणजे गोड पदार्थ म्हणजे माझा आवडीचा विषय. पण त्या दिवशी का कोणास ठाऊक, मला गोड खावेसे वाटलं नाही. मी ते आणून रूममध्ये ठेवलं. रात्री त्याला मुंग्या लागल्या म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिलं. थोड्याच वेळात मला सांगण्यात आले की तुमचे भाऊजी तुम्हाला भेटायला आलेले आहेत. मी त्यांना भेटायला गेले तर ते मला म्हणाले, सुनिता लगेच आवर. आपल्याला गावी जायचं आहे. माझ्या छाती अचानक धडधडू लागली. म्हटलं काय झालं ? तर भाऊजी म्हणाले, काका आजारी आहेत आणि त्यांनी तुला भेटायला बोलावलेले आहे. मी म्हटलं काका असे कधीच बोलवणार नाहीत मला भेटायला. काय झाले सांगा आणि दुर्दैवाने तो धक्कादायक प्रसंग घडून गेला होता.

शुक्रवारी काकांचा दुर्दैवी अंत झाला होता. मी सटाण्यातून नाशिक वरून सटाणा बसने पुन्हा कोल्हापूरहून हुपरी ला येत असताना मला काकांसारखी माणसं गाडीत दिसायला लागली. माझे चुलते जे होते त्यांना आम्ही म्हातारबाबा आणि काकांना त्यांची मुलं काका म्हणायची म्हणून म्हणून आम्ही मुलं देखील वडिलांना काकाच म्हणत असू. घरी आम्ही वडिल, आई, माझ्या आईची आई (आजी) माझ्या वडिलांची बहीण आणि माझा भाऊ आणि आम्ही आठ बहिणी, भावाची बायको आणि त्याची तीन मुलं, गुरेढोरे असं मोठं खटलं असलेला आमचं कुटुंब. तरी देखील आम्ही चांदीचा व्यवसाय असताना व शेती असताना सुद्धा अतिशय साध्या घरात राहत होतो. काकांचं म्हणणं असायचं की ज्या मधून आपल्याला परतावा नसतो अशा मध्ये आपण पैसे खर्च करायचे नसतात. शिवाय एवढ्या मुलींची जबाबदारी देखील होती.

असं माझं बालपण गेलं. आज जेव्हा बालपण आठवतं, तेव्हा काकांचे एकेक गुण एकेक आठवतात. एकदा भावाला ते म्हणाले होते “राम’ हे शंभर रुपये काँग्रेसच्या शाखेत दे आणि त्यांच्याकडून पावती घेऊन ये. काँग्रेसच्या खर्चासाठी हे पैसे आपण देत असतो. तेव्हा मला काही त्याचा अर्थ कळला नव्हता. पण आज कळतं की कोणत्याही पक्षाला अर्थकारण चालवण्यासाठी निधी लागतो आणि आज आपण त्याचा पक्षनीधी कसा उभा राहत असतो ते पाहतो. असो…

माझे वडिल अतिशय दूरदर्शी होते. माझ्या मैत्रिणीला (कल्पना गाटला) म्हणाले, तू लॉ केलेले आहेस म्हणून तू जज्ज होण्यासाठी परीक्षा द्याव्या असं मला वाटतं. त्याप्रमाणे तिनं ते केलं आणि ती जज्ज झाली.

काकांचं सामाजिक कार्य देखील दांडगं होतं. त्याकाळी पैसा फंड बँकेमध्ये एक कमिटी होती ज्याच्यामध्ये सामुदायिक विवाहाचे आयोजन केलं जायचं. काका त्या कमिटीचे सभासद होते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जोडप्यांचे लग्न मोफत लावून दिलं जायचं व त्यांना संसाररोपयोगी वस्तू देत. त्याचप्रमाणे ते ग्रामपंचायतचे पंच असताना देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. गावामध्ये जेव्हा पण लग्न ठरवण्याचे असेल किंवा वाटणी करण्याची असेल अशी कोणतीही कामे असतील तेव्हा काकांना आग्रहाचं निमंत्रण असायचं की आपण यावं. काकांचा स्वभाव अतिशय रागीट असला तरी प्रांजळ सुद्धा तेवढाच होता. त्यांना गैर काहीच चालत नसे. नेमका हाच गुण माझ्यात सुद्धा आला, असं मला वाटतं. त्याचप्रमाणे काका म्हणायचे की धंद्यामध्ये म्हणजे आम्ही जो चांदीचा धंदा करत होतो तो ९७ टंच असलेला म्हणजे फक्त तीन टक्के त्यात आवश्यक (टंच) भेसळ असायची आणि अशा प्रकारे शुद्ध माल आपण ग्राहकांना पुरवला पाहिजे याबाबत ते आग्रही असायचे. जेव्हा कुणाला पूर्ण शुद्ध माल पाहिजे असल्यास आमचे स्पर्धक सांगत की तुम्ही कृष्णाजी कुलकर्णीच्या दुकानात जा तिथे तुम्हाला चोख वस्तू मिळेल. असं काकांनी ते नाव कमावलेलं होतं. सर्व जण काकांना के.एस म्हणायचे. कृष्णाची श्रीपाद कुलकर्णी हे हुपरीच्या चांदी बाजारपेठेतला एक नावाजलेलं नाव, खात्रीशीर दुकान होते. त्या काळी हुपरीच्या चांदी असोसिएशन तर्फे निवडक कारखानदारांचे चांदी व्यवसायातील वाटचालीचे पुस्तक प्रकाशित केले होते त्यात काकांवर लेख होता. आजही ते दुकान तिसऱ्या पिढीमध्ये माझ्या भाचे चालवत आहेत. वडिलांचे नंतर भाऊ आणि त्याच्यानंतर त्याची मुलं माझे भाचे आहेत ते काम सांभाळत आहेत. काका म्हणायचे की कोणताही व्यवसाय करताना त्याच्यामध्ये पत राखावी लागते आणि ती पत म्हणजे आपले वचन असते. आपले बोल राखायचे असतात.अशी पत सांभाळून कुठलाही व्यवसाय करावा असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. त्यामुळे ते संस्कार आमच्यावर नकळत होत गेले. आपलं बोलणं म्हणजेच आपली पत असते आणि आणि पत म्हणजेच आपलं बोलणं आणि त्याप्रमाणे वागणं याबाबतचे बाळकडू आम्हाला काकांकडूनच मिळाले.

आज वडिलांना जाऊन ३८ वर्षे झाली पण पोलीस ट्रेनिंगला जाताना वडिलांची निरोप घेतानाची मूर्ती आजही जशीच्या तशी मनात जिवंत आहे. काकांची कमतरता जाणवते. म्हणतात ना जे विधिलिखित असते ते होते. खरतर मी ट्रेनिंग ला गेल्यानंतर ठरविले होते पहिला पगार झाल्यानंतर त्यांच्यासाठी आरामखुर्ची घेऊ म्हणून. पण माझी ईच्छा अपुरीच राहिली.
परंतु काकांचा सहवास व सल्ला अधिक लाभला असता तर आज जीवन अधिक पारदर्शी असते.

काका तुम्ही माझ्या ह्रदयात संस्कार रूपाने जिवंत आहात. आपली कमतरता आजही जाणवते काका. आपल्या स्मृतिस भावपूर्ण श्रध्दांजली.

सुनिता नाशिककर

— लेखन : सुनिता नाशिककर.
सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments