“फरीदाबाद”
फरीदाबादचे हवाई दलातील नाव होते. ५६ ए एस पी (एअर स्टोरेज पार्क) इथला खाक्या एकदम वेगळा होता. स्टेशन अगदी छोटे होते. साधारण 300 जण आणि ऑफिसर्स पंधरा जण होतो. ग्रुप कॅप्टन राघवन म्हणून बॉस होते माझा डेप्युटी पायलट ऑफिसर चार्ल थॉमस म्हणून होता. तो नुकताच ग्रुप कॅप्टन बनून रिटायर झाला. फरीदाबाद हरियाणातील दिल्लीच्या जवळ 30 किलोमीटरवर होते. तिथून आमचे काम करायची जागा दहा किमी डबुआ कलोनीत एका खबदाडीत होती. याशिवाय रेल्वे स्टेशन जवळ एक गोडाऊन वजा आणखी जागा होती, असे दोन ठिकाणी वसलेले हे एअरफोर्स स्टेशन विमानांच्या वेगवेगळ्या स्पेअर पार्ट्स साठी गोडाऊनचे केंद्र होते.
फरीदाबादला पाणी जमिनीतून पंपाने काढून दिले जात असल्यामुळे पाण्याची चव खारट होती. मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मला सांगण्यात आले की या आधीच्याला तात्काळ काढून टाकल्यामुळे तुला तडकाफडकी पोस्टिंगला आणले आहे. विंग कमांडर गजरिया म्हणून चीफ एडमिन ऑफिसर होते.. सगळ्यांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. पण त्यांची खासियत अशी की ऑफिसच्या दरवाज्यात पाहिल्या पाहिल्या ते एकदम मनाला येतील त्या आवडीच्या शिवराळ भाषेत त्या व्यक्तीची संभावना करीत. ती लाट ओसरल्यानंतर मात्र त्याला ते एकदम बर बर, करतो तुझं काम असे म्हणून खुश करत. लॉजिस्टिक्स ब्रांचचे ग्रुप कॅप्टन राघवन हे माझ्या हवाई दलातील सर्व कार्यकाळातील एक अत्यंत निस्पृह कमांडिंग ऑफिसर होते. नंतर ते एअरमार्शल झाले. कडक शिस्त यांचे वैशिष्ट्य. ऑफिसर्स मेस मधील पार्टीला वेळेवर जाण्यात जर जरा जरी उशीर झाला तर ते त्या कपलला घरी परत पाठवत असत. आणि दुसऱ्या दिवशी रायटिंग मध्ये कारण दाखवा नोटीसीचे उत्तर द्यावे लागे. फरीदाबाद मध्ये वाहनांचे ड्रायव्हर सिव्हिलियन असत. दिल्लीला जायला यायला काही कारणामुळे जर दुपारी दोन वाजेपर्यंत झाले नाही तर काही खडूस ऑफिसर्सना ते सिव्हिलियन ड्रायव्हर कार वाटेत उभे करून निघून जायचे.
तिथल्या वास्तव्यात माझ्या लक्षात आले की हिंदी वर्तमानपत्रांमध्ये कोडी छापून येत नाहीत. तेव्हा मी राष्ट्रीय सहारा नावाच्या नुकत्याच चालू झालेल्या वर्तमानपत्राने 125 कोडी छापली गेली. माझा आते भाऊ शरद सोहनी आपल्या कुटुंबासह फरीदाबाद मध्ये गावात राहत असेल. तो अमेरिकन एम्बसी मध्ये कामाला होता त्यामुळे फरीदाबाद मध्ये आमचे जाणे येणे वाढले. शरद आणि मी माधवनगर मध्ये एकत्र शाळेतही गेलेलो असल्यामुळे आमच्यात एक वेगळीच मैत्री ही होती. शरदच्यामुळे भगवान रजनीश उर्फ ओशो यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि पुस्तकांतून एक वेगळेच विश्व आम्हाला लाभले. माझे पुण्यातील घर कोरेगाव पार्क मध्ये असल्यामुळे माझ्या कुटुंबियांना ओशो आश्रमात प्रवेश मिळाला आणि त्यांनी काही ध्यानक्रियाही शिकून घेतल्या. फरीदाबाद मधल्या वास्तव्यात आणखीन एक घटना घडली म्हणजे एकदा मला कॅन्टीन मधील मध्यांचा स्टॉक टेकिंग करायला सांगण्यात आले. हरियाणवी लोकांची मद्याची आवड प्रसिद्ध आहे. त्यावेळी कॅन्टीन मधून मद्य विकत घेणारी बाद झालेली, लोक मेलेली किंवा नसलेली अशी कार्ड्स आम्ही शोधून काढली आणि तो अहवाल नंतर ग्रुप कॅप्टन राघवन यांच्याकडे गेला. त्यामुळे कॅन्टीनच्या विक्रीमध्ये जबरदस्त घट आली आणि कॅन्टीनचा नफा खूप कमी झाला.
चुकीच्या वॉरंटचा घोळ ! – नवी दिल्ली जवळ फरीदाबादच्या एअर फोर्स स्टेशनमधून तांबरमला पोस्टींगवर जायला सर्व सामानाची बांधाबांध करून आम्ही तयार झालो होतो. संध्याकाळच्या जीटी एक्सप्रेसचे रिझर्वेशन झालेले. त्याच दिवशी नेमका इतका भयंकर धोधो पाऊस सुरु झाला की थांबायचे नाव काढेना. सामान घेऊन जाणारा ट्रक मथुरा रोडवर अडकून पडलेला. आयत्या वेळी दुसरा एक ट्रक मिळाला. पण तो होता छोटा! तो आला तेंव्हा दुपारचे २ वाजलेले. पावसात बाकीचे बॉक्सेस चढवल्यावर उरलेल्या जागेत फियाट गाडी त्यात मावेना. तिची मागची बाजू ट्रकच्या बाहेर आलेली होती ! पावसाच्या धारात उरलेले सामान कसेबसे ठासून त्यावर टार्पोलिनने करकचून बांधून ट्रक रवाना झाला. त्यातच ५ वाजले. नवी दिल्ली स्टेशनवर आम्हाला पोचवायला तोवर एक बस भरून साथिदार जमलेले. पावसामुळे बँक बंद त्यामुळे बरेच पैसे जवळ बाळगले होते. नवी दिल्ली स्टेशनवर आल्यावर बसमधून बरोबरचे सामान उतरवून घेण्याला माझा जुनियर फ्लाईंग ऑफिसर चार्ल्स थॉमस हिरीरीने कामाला लागला. मी वॉरंट एक्सचेंज करायला तिकिटाच्या खिडकीत हात घातला. तर ते परत मला देत फरमाईश झाली, ‘हे वॉरंट चालणार नाही. कारण त्याच्या वरची तारीख चुकीची आहे. नवे वॉरंट आणा नाहीतर पैसे भरून तिकिट विकत घ्या’. झाले !! वादविवाद करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता.
मी सौभाग्यवतींकडून झटपट दहा हजाराची एक गड्डी घेऊन निघालो. त्या काळात एसी क्लासचे तिकिट काढायला संपूर्ण १० प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागे. तोवर गाडी प्लॅटफॉर्मला केंव्हाच लागलेली होती. क्यू तोडून मी तिकिट विकत घेतले. पाऊस थांबण्याचे नाव नव्हते. रस्ते निसरडे. शूजमधे पाणी जाऊन ते मणामणाच्या ओझ्याचे झालेले. आयुष्यात प्रथम वाटले की आज गाडी चुकणार. थकवा इतका आला होता. घरच्यांचे चेहरे आठवले. आत्ता पाय लटपटून चालणार नव्हते. एकदम उत्साह वाटला. पावले झपझप टाकत मी धावलो. तिकडे गार्डने हिरवा झेंडा दाखवला व मी थॉमसच्या हाती ते वॉरंट ठेवले व कोणी गलती केली ते शोधायला सांगितले. मी गुड बाय करून हात हलवत असताना एक वयस्क बाई गाडीत शिरु लागल्या. त्यांना मी हात देऊन वेळेवर आत ओढले. त्यांचे सामान कुलीकडून घेतले. त्यांचा समाधानाचा चेहरा पाहून मला त्या दिवशीच्या कष्टांचे चीज झाले असे वाटले. पुढे वॉरंट लिहिण्यातील चुकी बद्दल दिलगिरी व्यक्त करणारे कमांडिंग ऑफिसरचे पत्र मला आले. अर्धी बाहेर लटकलेली कार घेऊन निघालेल्या ट्रकमधील सामानासह ते ही व्यवस्थित तांबरमला मिळाले.
आजही त्या दिवसाच्या प्रचंड पावसाने केलेल्या तारांबळीस आठवून तो थरारक प्रवास लक्षात राहून गेला…
फरीदाबाद नंतर माझी बदली तांबरम येथे झाली तिथे मात्र एक वेगळाच अनुभव आला त्यात मला दोन वेळा कोर्ट मार्शल साठी काम करावे लागले, तर नाडी ग्रंथ भविष्य नावाच्या कार्यामुळे माझ्या जीवनाला वेगळा अर्थ प्राप्त झाला.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800