“मग ही कोण ?”
बेला आज खूप खुशित होती. टीचरनी तिला टीम लीडर बनवले होते. आज नववीच्या विद्यार्थिनी वृद्धाश्रमात सेवा करण्यासाठी जाणार होत्या. सगळ्या जणी उत्तेजित झाल्या होत्या. आपला आठवडाभरचा पॉकेट मनी त्यांनी साठवून ठेवला होता आणि वृद्धांसाठी काही भेटवस्तू घेतल्या होत्या.
बेलानेही फळे, बिस्किटांचे पुडे, कानटोप्या असे काय काय घेतलं होतं. ठरलेल्या वेळी स्कूलबस वृद्धाश्रमाकडे रवाना झाली. तिथे पोचल्यावर तिथल्या कर्मचार्यांनी विद्यार्थिनींचं जोरदार स्वागत केलं. तिथे एकट्या रहाणार्या वृद्धांना या मुली आपल्या नातींसारख्या वाटल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्यावर वेळच अशी आली होती, की आपलेच लोक परके बनले होते.
सगळ्या मुली त्यांना सन्मानपूर्वक भेटी देऊ लागल्या. एका वृद्ध स्त्रीपुढे बेला आली. त्या स्त्रीने आपला पदर पसरला. बेलाचा हात अचानक थांबला. जिने पदर पसरला होता, ती तिची आजी होती. वडलांची आई. आजी आणि नात क्षणभर स्तब्ध झाले. बेलाने आजीला मिठी मारली. अश्रू आणि ममतेचं मोठं अजब दृश्य होतं ते.
परतताना बेला अगदी गप्प गप्प होती. पुस्तकातून शिकलेला, समजलेला नात्यांचा अर्थ तिला चुकीचा वाटू लागला. घरी पोचल्यावर तिने आपल्या आई-वडलांकडे उपेक्षित नजरेने पाहिले. मग तिने आपल्या वडलांना सरळ सरळ विचारलं, ‘पप्पा, आजी आपल्या गावाला, आपल्या एका नातेवाईकांकडे गेलीय आणि आता कायम तिथेच रहाणार, असं म्हणालात ना तुम्ही ?’
‘हो’ पप्पांनी चाचरत म्हटलं.
‘मग ही कोण आहे ?’ बेलाने आपल्या मोबाईलमध्ये आजीबरोबर काढलेली सेल्फी दाखवत म्हंटलं.
— मूळ कथा : आपणे बन रहे पराये.
— मूळ लेखक : सेवा सदन प्रसाद.

— अनुवाद : उज्ज्वला केळकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान 👌👌👌👌