साम्य काय तुझ्यात न माझ्यात
तिच्यात आणि त्याच्यात
आपल्या सर्वांच्यात ?
तुझ्या जीवनाचा गहिरा आलेख
सतत उंचावत जाणारा..
माझ्याच अस्तित्वाची जाणीव
डंख मारत राहते मला
तिचे अगदीच वेगळे
न्याय्य, उदात्त सारी
तत्वेच अनोखी..
तिच्या जीवनाची
तुझ्या जीवनात येणारी वादळं
त्याच्या आयुष्यात
घोंघावणारी उलथापालथ
माझे अगदीच मिळमिळीत
जणू साधे वरण
झणझणीत तर नाहीच साधी
तूप जिऱ्याची फोडणी सुद्धा नाही
तिच्या मनांत उठणारे
संभ्रम, विभ्रम
उत्कंठा, आसक्ती, असोशी
त्याच्यात काहीच नाही
तो षंढ. थंड. बैल
स्वतः च्याच कुवती साठी
अनोळखी, निर्विकार
असे कसे…. प्रत्येकाचे श्वास,
उसासे… भिन्न भिन्न
मी मानव तू ही मानवच
तुझे कार्य वेगळे माझे आगळे
मग साम्य काय ?
तू जन्माच्या वेळेस फोडलेला ट्या..हा…
मी ही..जाताना सोडणार तो शेवटचा श्वास

— रचना : सौ.स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800