नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….. या सदरात आपले स्वागत आहे.
आता वाचू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
नमस्कार..
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य पत्रकार व क्रिकेट प्रेमी स्तंभ लेखक श्री सुब्रमण्यम साहेब यांचा गेले दहा ते बारा वर्षे माझा परिचय आहे. त्यांना संघामध्ये रोज संध्याकाळी कॅरम खेळण्यात रमलेले पाहून आनंद वाटायचा. ते स्वतः बँकेत मोठे अधिकारी असून सुद्धा ज्येष्ठांना भेटल्यावर त्यांना आनंद वाटायचा असे श्री सुब्रमण्यम साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांच्या कार्याला आपण प्रसिद्धी दिली, साहेब धन्यवाद 🌹👏
— विठ्ठल गव्हाणे.
उपाध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ. सानपाडा, नवी मुंबई.
२
सी के सुब्रह्मण्यम लेख चांगला आहे ..उत्कृष्ट पत्रकारिता.क्रिकेट खेळ आणि भरला संसार आणखी काय हवे निवृत्ती नंतर,,,, आवडला लेख
राधिका ताई म्हणतात ते खरे आहे …नाते रक्ताचे असायलाच पाहिजे का..काही ऋणानुबंध जपून ठेवावेत इतके संस्मरणीय असतात म्हणूनच त्यांना अजून पांडे बाई आठवत राहतात.
पाऊस ..कविता खूप सुरेख, तरल ..आवडल्या.
_ स्वाती वर्तक. मुंबई
३
आई-वडिलांची काळजी घ्या हे सांगावे लागत हे फार मोठे दुर्दैव आहे.
— शुभांगी पासेबंद. ठाणे
४
आजचा अंक पण नेहमीप्रमाणेच सुरेख, वाचनीय आहे. बिघडलेली रेसिपी मध्ये तरी सर्व प्रेक्षकांचे मनोगतच उलगडले आहे असे प्रकर्षाने जाणवले.
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
५
मा. देवेंद्रजी नमस्कार ….
बऱ्याच दिवसांनी मी लेखन करतोय . मा. स्वाती दामले यांचा *वृद्धाश्रम — काळाची गरज* हा लेख वाचला. त्या अनुषंगाने मी लिहीत आहे. योग्य वाटल्यास प्रसिद्ध करावा ही विनंती ….
*असाही एक वृद्धाश्रम ..!!*
मा. स्वाती दामले यांचा *वृद्धाश्रम …. काळाची गरज* हा लेख वाचला. मी स्वतः काही काळ वृद्धाश्रमात राहिलो आहे. आपण माझे लेख, कविता प्रसिद्ध करत होता, तेव्हा मी वृद्धाश्रमातच होतो.
पुण्यामध्ये कर्वेनगर येथे PA OLD AGE HOME या नावाचा एक वृद्धाश्रम आहे. मा. नितीन केळकर काका आणि मा. सुरेंद्र जोशी हे दोघे त्या वृद्धाश्रमाचे संचालक आहेत.
मी माझी पत्नी, मुलगा आणि विवाहित कन्या यांना कायमचे गमावल्यानंतर या वृद्धाश्रमात वास्तव्यास होतो.
समवयस्क व्यक्तींच्या सहवासात राहिल्यानंतर त्याची गरज व महत्व हे समजते.
रोज सकाळी सात वाजता आपल्या रुम मध्ये चहा, नऊ वाजता ब्रेकफास्ट, दुपारी एक वाजता जेवण, संध्याकाळी ५ वाजता चहा आणि रात्री ८ वाजता जेवण हा तेथील नित्यक्रम आहे. प्रत्येक रुममध्ये मनोरंजन म्हणून T. V आहे. या शिवाय ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांचे साठी वर्तमानपत्र आहे.
अत्यंत आपुलकीने सर्व देखभाल केली जाते. आजारी असल्यास दवाखाना व हॉस्पिटल यांचे नियोजन आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे आपले घर आहे, हाच तेथील प्रत्येकाचा मनभाव आहे.
वृद्ध माणसाला जे आवश्यक आहे, ते सर्व तिथे नित्यपणे तेथे आढळेल. या आश्रमशिवाय कोंढवा येथील सेवाश्रम (पूर्ण मोफत ) तसेच नर्हे येथे असे एकूण तीन आश्रम आहेत.
मी कर्वेनगर येथे होतो. आज माझ्या शेंडेफळ कन्येची, तिच्या गंभीर आजारात, गरज म्हणून मी आश्रम सोडून तिच्याकडे आलो आहे.
वृद्ध माणसाने स्वतः होऊन आपण आपल्या विचाराने, मार्गाने असावे या विचारांचा मी असल्याने , वृद्धाश्रम निवास निवडला होता. मी तिथे असतानाही मला माझ्या कलेला तिथे भरपूर वाव दिला जात होता. अनेक वृद्धाश्रमांबद्दल मी अगोदर माहिती करुन घेतली होती. काही ऐकीव ही होते.
त्या आश्रमात येण्यापूर्वी मी पूर्ण चौकशी तिथे जाऊन केली होती . मला तो वृद्धाश्रम निवासस्थान म्हणून अतिशय आपला असा दर्शनिय स्थितीत वाटला , आणि तोच अनुभव अखेरपर्यंत होता.
मी अजूनही कधी तिथे गेलो, तर आवर्जून माझ्या उपस्थितीची दखल घेतली जाते. नुकताच मी एक दिवस संमेलन साठी म्हणून तिथे राहिलो होतो. अत्यंत आपुलकीच्या वातावरणात मला तेथे राहण्याचा अनुभव आला .
*केव्हाही या, हे आपले घर आहे* ही भावना मला अजून ही तिथे पहावयास मिळाली .
वृद्धाश्रम असावेत हे नक्कीच …. पण ते आपले घर आहे ही भावना वृद्धांना जिवंत ठेवणारी असली पाहिजे.
*वृद्धाश्रम असेच असावेत*…. कारण ती आजकालची गरज आहे.
— अरुण पुराणिक. पुणे.
६
वृध्दाश्रमावर सुन्दर लेख. लेख वाचल्याबरोबर वृद्ध्राश्रमातील जिवंत वातवरण नजरे समोर आले. खूपच छान ❤️👌🏼🙏
— शैला राणे.
७
खरंच खूप सत्य आहे.
वृद्धाश्रमात सगळे आपल्या वयाचे असतात. त्यामुळे सगळ्यांचे प्रॉब्लेम जवळ जवळ सारखेच असतात. लेख खूप आवडला
— अलका राणे.
८
“वृध्दाश्रम: काळाची गरज”
हा लेख सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर चांगलाच प्रकाश टाकतो. ज्या भारतीय संस्कृतीत “मातृऋण, पित्रृऋण व आचार्यॠण हे कधी फिटत नसते, ते त्यांची शेवटपर्यंत सेवा करूनच थोडे हलके होते अशी धारणा अथवा श्रध्दा आहे त्या भरतभूमीचे हे उदात्तीकरण म्हणायचे की अंध:पतन असा संभ्रम निर्माण होतो.म्हणून वृध्दाश्रम ही काळाची गरज म्हणायचे की कर्तव्यापासून पलायन म्हणायचे असा डायलेमा सध्याच्या पिढीपुढे उभा आहे. जी संस्कारित पिढी आहे ती कर्तव्य समजते पण जी स्वतःला उच्चभ्रू समजते ती मात्र वृध्दाश्रमासारख्या पळवाटा शोधते आणि आपण कसे कर्तव्यदक्ष आहोत हे जगाला भासवते. म्हणून ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी ती गरज आहे. पण इतरांसाठी ती पळवाट आहे. उदाहरणार्थ एक दोन -तीन एकर जमीन असलेला शेतकरी भागत नसल्यास रोजगार हमी योजनेच्या कामावर कष्टाची कामे करून कुटुंबाचे उदरभरण करेल पण आईवडिलांना वृध्दाश्रमात ठेवल्याचे उदाहरण माझ्या तरी पाहण्यात आले नाही.
बघा साधकबाधक विचार करून तुम्हाला काय वाटते ?
— ब रा देशपांडे.
निवृत्त उप सचिव, महाराष्ट्र शासन, डोंबिवली.
९
“मग ही कोण ?” ही कथा वाचून मन सुन्न झाले. खूप सुरेख आणि विचार करायला लावणारी कथा आहे.👌🏻😢
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे.
१०
डॉ रामराव बापू महाराज या संत महात्म्यांबद्दल मी फारसे वाचले नव्हते ..आज बरीच माहिती मिळाली आनंद झाला धन्यवाद….
पोलिस असले तरी शेवटी त्यांचे ही हृदय कनवाळू असतेच .. आपल्या पित्या विषयी लिहिताना सुनीताताई ही हळुवार होतात.. मनाला भिडतो लेख.
रश्मीताईंनी वर्णिलेले २ गुरु ..छान वंदना.
कविता ही गुरू वंदन करणाऱ्या आवडल्या
स्वाती ताई, भारती ताई, गांगलजी सर्वांच्या कविता आजच्या दिवसाचे महत्व अधोरेखित करतात.
या निमित्ताने मी ही माझी गुरुवंदना सादर करीत आहे.
गुरुराया द्या आम्हा वरदान
नम्र विनंति तुम्हा करिते
मनीं राखुनी मान …1
नाही मजला ज्ञान अजुनि
पावन होते तुम्हा पुजूनि
तुम्हीच माझे सदा सर्वदा
सर्वज्ञ भगवान………2
श्रीकृष्णाला मिळे सांदीपनी
समर्थास शिवराया मानी
तुझ्याच चरणी लीन होऊनि
करिते तुझा सन्मान……..3
व्यास गुरूंना आज स्मरूनी
तुझ्या कृपे भिजवी लोचनी
प्रार्थना करिते वंदन करुनि
दे भक्तीचे तू दान …………4
— सौ.स्वाती वर्तक. खार
राधिका भांडारकर यांच्या माझी जडणघडण भाग ५६… वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत..
१
सुंदर. On Monday I have my Gita class. If your article comes during , then I switch off my video and read your article. Right or wrong I don’t know . I suppose wrong but I can’t stop myself.
— संध्या जंगले. मुंबई
२
किती सुंदर. फारशा अपेक्षा न ठेवता तनामनात आनंद फुलवित सुरू केलेला संसार एक विलक्षण आनंद देऊन जातो.
— अस्मिता पंडीत. पालघर
३
कथा मनाला खूपच भावली. Tried to relate myself.
— सुषमा पालकर. पुणे
४
नवीन संसार, मस्त
— सुमती पवार. नाशिक
५
खूप छान !
हा लेख वाचताना प्रत्येकच स्त्रीला तिच्या नव्या संसाराची घडी हळूहळु बसविताना आलेले अनुभव आठवून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळणार.
माझेही तेच झाले. सुरवातीला दोन खोल्यात मांडलेला पण अतिशय आनंददायी संसार आठवला. त्या सुखद स्मृतींच्या हिंदोळ्यावर अजून झुलते आहे. जडणघडणीच्या सदरातच या फारच रमते आहे.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
६
अतिशय छान सुरुवात संसाराची 👌👌लोकांचे मिळालेले प्रेम, दृढ आत्मविश्वास या गुणांनी संसार पूर्ण केला, राधिकाताई तुम्ही. छान लिहिलय राधिकाताई तुम्ही.
— छायाताई मठकर. पुणे
७
बकेट लिस्ट खूप भावली मनाला. मी पण nostalgic झाले. शून्यापासूनचा आमचा प्रवास ही असाच काहीसा होता.
— वंदना जोशी. पुणे
८
राधिका भांडारकर यांची जडणघडण वाचताना आमचे लग्नानंतरचे दिवस आठवले आणि त्यात थोडे साम्य आढळल्याने गंमत वाटली. त्याकाळी म्हणजे १९६८ च्या सुमारास बहुतेक जोडप्यांची अशीच कौटुंबिक स्थिती होती. वास्तववादी लेखन.
— ब रा देशपांडे.
निवृत्त उपसचिव, महाराष्ट्र शासन, डोंबिवली
९
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर लेख !
आजची पिढीचे सेटल होणे याची व्याख्या काय, हे सर्वच पार बुद्धीच्या पलिकडे जाते.
मलातर अजूनही गादीवर पडल्यावर छान झोप लागली की वाटतं, चला आजचा दिवस छान गेला आणि उद्याचा अगवणारा दिवस छानच जाणार!
— आरती नचनानी. ठाणे
१०
खूपच छान नवीन संसाराची सुरुवात.किती सुंदर आठवणी रेखाटल्यात. खरंच वाचताना माझाच संसार आठवत होता. राधिकाताई अप्रतिम!
— मीना वाघमारे. अमरावती
११
‘बकेट लिस्ट ‘ मस्तच !
संसाराला सुरवात झाली तेंव्हाच्या आठवणी. काही नसलं तरी जे असायचं त्यातला आनंद. समाधानी वृत्ती. नवी नवलाई. सगळं छानच वाटायचं. त्यातच मुलांचा विचार.
सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं बरं हे कानावरून जायचं. पण कुठे न डगमगता इथपर्यंत पोचलो.
आमचा तर ब्रायटन मधील अत्याधुनिक सुखसोयीनी युक्त फ्लॅट सोडून आम्ही जुनं फर्निचर घेऊन संसाराला सुरवात केली. आम्ही परत कां आलो असं अनेकांनी विचारलं. मायदेशा बद्दल वाटणारी ओढ हे एक कारण नक्कीच होतं.
तुझ्या संसारातील त्या कल्पक फर्निचरचे फोटो नाहीत तसेच आमच्या पॉश घराचे नाहीत. मोबाईल असता तर हे सगळे क्षण टिपले असते.
माझं लग्नाआधीचं जळगाव आणि तुझं जळगाव ह्यात मला फरक जाणवतो. काही वेळा हे सगळं मला कसं माहित नाही ? असं मनात येतं. 😊 खूप छान वाटलं वाचून.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800