Saturday, July 19, 2025
Homeलेखवृद्धाश्रम : असावेत की नसावेत ?

वृद्धाश्रम : असावेत की नसावेत ?

पुर्वीच्या काळी लोकांचा ओढा शहरांकडे नसायचा. घरची शेती आणि जित्राप यावरच साऱ्या कुटुंब कबिल्याचा चरितार्थ चालायचा. काही कुटुंबं छोटामोठा व्यवसाय करत गावातच आपले जीवन कंठत असत. दैनंदिन गरजा देखील एकदम कमी प्रमाणात होत्या. दोन्ही वेळचे खाऊन-पिऊन सुखी असलेले कुटुंब असायचे. घरातील कर्त्या पुरुषांचा काहीतरी पिढीजात व्यवसाय असायचा. किंवा शेती तरी असायचीच. त्यातून निघणारे उत्पन्न विकायला जरी नाही भेटले तरी वर्षभराचा उदरनिर्वाह आरामात व्हायचा. छानछौकी किंवा चंगळवादात जगायची सवय नव्हती. साधी राहणी, उच्च विचार आणि सुसंस्कारी मन यामुळे घरातील आजी, आजोबा, काका, काकू, आईबाबा, आत्या आणि सर्व भावंडे मिळून मिसळून सुखासमाधानात राहत होती. साधारणत: सगळ्यांची समान परिस्थिती असल्यामुळे ईर्ष्या, हेवेदावे नसत.

जेमतेम लिहायला वाचायला येण्यापुरता पुरुष वर्ग साक्षर असे. स्त्रियांची अवस्थाही थोड्या शिकलेल्या, काही निरक्षर तर काही अंगठेबहाद्दर असत. शिक्षणावाचून कुणाचे फार काही अडत नसे. बँक , ऑफिस किंवा वैचारिक विषयांवर फारशा चर्चा नसत. आपले घर आणि संसार यातच सर्वजण मश्गुल असत. शिक्षणाला फारसा खर्च नसे. चार-पाच आकड्याचा पगार जरी नसला तरी सुखी आणि खाऊन-पिऊन व्यवस्थित अशी सर्व कुटुंबे असायची. घरातील स्त्रियां काटकसर करुन आपला संसाररथ चालवत असत. स्त्रियां जास्त शिकलेल्या नसल्यामुळे नोकरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. पापड, लोणची, सांडगे, वाळवण अशी सर्व कामे घरगुती स्वरूपावर केली जात. त्यामुळे खर्चही खूप कमी होत असे. सावकाराचे कर्ज डोईवर असण्याची भानगडच नव्हती.’ मी आणि माझे घर’ यातच सर्वजण खुश असायचे. काही ठिकाणी फावल्या वेळेत काही स्त्रिया लोणची, पापड, मसाले बनविणे असे काहीतरी गृहोद्योग करत नि संसाराला हातभार लावत. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरातल्या सर्व स्त्रिया एकत्रच मिळून अशी कामें करत. त्यामुळे गप्पा, गाणी म्हणत आणि हसत खेळत सर्व कामं पार पाडली जात असत.

गावातून बाहेर कुठे स्थलांतर नसल्यामुळे वडिलोपार्जित घरातच सर्व लोक एकत्र राहत असत. त्यामुळे घर बांधणीचा खर्चही फार काही नसे. शिक्षणाचा प्रसार वाढला आणि लोकांच्या दैनंदिन गरजाही वाढल्या. शिक्षण, नोकरी या निमित्ताने लोकं खेडी सोडून शहराकडे वास्तव्य करू लागली. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली आणि खर्चाचे प्रमाण वाढले. चंगळवाद वाढला. फॅशनच्या नावाखाली मोठे शॉपिंग मॉल्स, मनोरंजनासाठी थिएटर्स आणि हॉटेल्स यांचा सुळसुळाट झाला. पैशाला चारी बाजूने फाटे फुटू लागले. हातात पैसा खुळखुळण्याऐवजी खर्चच जास्त होऊ लागला आणि जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले. माणसातली माणुसकी हरवू लागली. तरुण मंडळी शहराकडे सरकल्यामुळे वृद्ध मंडळी आपोआपच गावातल्या घरात राहू लागली. त्यांना शहरात राहण्याची सवय नसल्यामुळे आणि ते वातावरणही मानवत नसल्यामुळे गावी राहण्यावाचून पर्याय उरला नाही.आता चैनीसाठी घरात वस्तूंची रेलचेल होऊ लागली. स्त्रियांही परिपूर्ण आणि साक्षर होऊ लागल्या. एकाच्या कमाईत घर संसार चालवणे कठीण होऊ लागल्यामुळे सहाजिकच स्त्रियांही घराबाहेर पडून चरितार्थासाठी मार्ग शोधू लागल्या.

दिवसभर बाहेर राहिल्यामुळे बाहेरचे खाणे, घरात कामाला बाई, मुलांना सांभाळण्यासाठी नोकरचाकर यामुळे आता स्त्रियांनी कमवणे अपरिहार्य होऊन बसले. उच्च शिक्षणामुळे स्त्रियांचाही आत्मविश्वास वाढला. आतातरी संगणकयुग आले. नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे दैनंदिन गरजाही वाढल्या. दूरदर्शन, संगणक, लॅपटॉप, मोबाइल या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी घरात आणि हृदयात कधी स्थान पटकावले तेही कळाले नाही. आता तरी आपण त्या माध्यमांचे गुलाम बनलो आहोत. थकलेल्या वृद्धांना गावी ठेवणे आता गैरसोयीचे होऊ लागले. शिवाय शहरातली घरे खुराड्यासारखी छोटी त्यात सर्वांची सोय होणे दुरापास्त झाले. घरातील मुले, संसार, स्वयंपाक, भाजीबाजार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या स्त्रियां घामाघूम झाल्या. परावलंबित्व असणाऱ्या वृद्धांचे काम करणे आता मुश्किल होऊ लागले. यातूनच वृद्धाश्रमांचा जन्म झाला. घरातील वृद्ध लोकांना आणि लहान मुलांना सांभाळून करिअर करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. मुलांना ठेवण्यासाठी पाळणाघरे उपलब्ध असतात. पण वृद्धांची काय व्यवस्था करावी हा यक्षप्रश्न आहे. दिवसभरासाठी मोलकरीण ठेवणे हा एक पर्याय आहे, पण हल्ली सर्वजण नोकरी करत असल्याने सहजासहजी मोलकरीण मिळणे दुरापास्त. त्यातून तिचा पगार जास्त असेल तर तेही देणे परवडायला हवे. विश्वासू मिळेल याचीही खात्री नसते.

आई वडिलांच्या जीवावर बेतण्यासारखे असते. त्यांची काळजी ती कशी घेईल सांगता येत नाही, त्यांना वेळेवर जेवण खाणे, औषधे देईल याची खात्री नसते. काही वृध्द इतका त्रास देतात की घरातल्या लोकांना जीवन नकोसे वाटते. त्यामुळे वृद्धाश्रम हा उत्तम पर्याय आहे. पण तो नीट चौकशी करून घेतलेला असावा. वृद्धांची काळजी घेतली जाते की नाही याची शहानिशा करूनच त्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना ठेवावे.

दुसरी गोष्ट महागाईच्या जमान्यात दोघांनी पैसे कमावणे आवश्यक बनले आहे. मुलांचे शिक्षण आजार इतके महागडे झाले की एकाच्या पगारात सर्वकाही भागवणे मुश्किल झाले आहे. त्यांच्या जगण्याच्या काही आशा अपेक्षा असतात. त्यांनी लग्नापासून अशा वृद्धांना सांभाळत राहिले तर त्यांचे जीवनही नरकमय होईल. त्यांच्या जीवनात त्यांना रस वाटणार नाही. फिरायला जाणे किंवा हॉटेलात जाणे, सहलीला जाण्यासाठीच्या आनंदापासून त्यांना त्यांच्या जीवनाचा उपभोग घेण्याची संधी कधी आणि कशी मिळणार ? वृद्धाश्रमही सर्व सुखसोयींनी युक्त असा निवडला तर आईवडिलांची सेवासुश्रुषा चांगल्या पद्धतीने होईल. वृद्धाश्रमात सर्व वृद्ध समवयस्क असतात. त्यामुळे त्यांच्यात एकोपा असतो. ते एकत्र राहू, खाऊ-पिऊ, गप्पा मारून एकमेकांची विचारपूस करणे यात त्यांचा वेळही जातो. आणि स्वतःचे सुख-दुःख शेअर करू शकतात.

सुना मुलांच्या संसारात आडकाठी आणून त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्यापेक्षा आपल्या वयाच्या लोकांबरोबर एकत्र राहण्यामुळे उरल्यासुरल्या जीवनाचा आनंद उपभोगता येतो आणि आणि स्वतःचे जीवन स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगू शकतो. यामुळे वृद्धाश्रम असणे हे फायद्याचे झालेले आहे.आयुष्यभर कमावलेली पुंजी वृद्धपणासाठी राखून ठेवली तर सुखमय जीवन जगू शकतो. त्यामुळे वृद्धाश्रम हे सर्वांच्या सोयीसाठी असावेत हे मला वाटते आणि पटतेही. वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवले की वरचेवर फोन करून त्यांची ख्यालीखुशाली विचारणे, अधूननमधून भेटण्यासाठी येणे हे मुलामुलींचे परम कर्तव्य असावे. येताना आपल्या आई-वडिलांना आवडणारे पदार्थ खायला करून आणणे किंवा कपडालत् घेऊन यावे. इतर वृद्धांना देखील भेटीदाखल वस्तू,मिठाया आणणे असे केले तर त्या वृद्धांना वृद्धाश्रम हा नरक न वाटता आपले घर वाटू लागेल. ते आनंदाने तिथे रमतील. त्यांच्यासमवेत आपला वेळ व्यतित केला तर त्यांना परमानंद होईल. आपल्याला विचारणारे कोणी आहेत या कल्पनेनेच वृद्ध लोकांचे जीवन सुखमय होऊन जाईल. एवढेतरी कर्तव्य मुलांचे आपल्या वृद्ध मातापित्यांच्याप्रती असावे ना! त्यांच्या जीवनाची सायंकाळ सुखात पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत काही क्षण घालवून त्यांचे जीवन निरोगी, आनंदी राखणे हे मुलांचे कर्तव्य असावे.

भारती सावंत

— लेखन : सौ.भारती सावंत. खारघर, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?
Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on माध्यमभूषण याकूब सईद