“गुरूच्या लिला अनंत
वानू कश्या त्या अगाध
धिटावा करूनी देते
शब्दरूप त्याला
चुकले माकले
क्षमा करा मला”
“तुझ्या पोझिशन प्रमाणे तरी रहात जा ग”…. टकाटक रहाणा-या मैत्रिणीची अपेक्षा !
“काय हो किती साध्या रहाता, तेच तेच ड्रेस असतात तुमचे”…एखादी परिचित म्हणते.
खरंच, का नाही मोह मला या मोहमयी दुनियेचा ? असा प्रश्न मीच मला विचारते. वय वाढल्यावर या साधेपणाचे मुळ नक्की कुठे आहे हे आकलन व्हायला लागले आहे.
माझं माहेर नगर (अहिल्यानगर). शिर्डी – नगर म्हणजे अंगण ओसरी. न कळत्या वयापासून मी वडिलांबरोबर शिर्डीला जात असे. जवळ जवळ 50/60 वर्षापूर्वी शिर्डी संस्थानचा “व-हाडपांडे खुन खटला” उभ्या महाराष्ट्रात गाजला. या खटल्यात माझ्या वडिलांची (श्री नागेश डावरे) स्पेशल सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली होती.

या खटल्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली. BBC वर ही या खटल्याची बातमी, चर्चा होती. महाराष्ट्रात एक तडफदार, अभ्यासू, तरूण फौजदारी वकिल म्हणून त्यांचा सन्मान झाला. त्यावेळी वडिलांचे वय 28 होते. व-हाडपांडे खुन खटल्यावर आधारीत “तो मी नव्हेच” हे नाटक लिहीले गेले आणि ते गाजले ही. त्या वेळेपासून वडिलांचे शिर्डीला जाणे वाढले. अंर्तयामी त्यांनी साईबाबांना गुरू मानले.
माझे आजोबा (श्री रंगनाथ डावरे) नगर जिल्ह्यातील नावाजलेले सराफ होते. सराफाच्या घराण्यातील असल्यामुळे माझ्या वडिलांचा सोने, चांदी, मोती, हिरे यांच्याशी लहानपणापासून संबंध होता. त्यांना मोती, हिरे याची उत्तम पारख होती.
पण कधीही त्यांनी सोन्याची, हि-याची अंगठी गळ्यात सोन्याची साखळी घातली नाही तर बोटात साईबाबांची अंगठी आणि कोटाच्या खिशात धुनीतला अंगारा एका छोट्या डबीत. त्यांचे साधे रहाणे, दुसर्याला सतत मदतीचा हात, प्रामाणिकपणा, र्निमोहीवृत्ती हे सारे गुण गुरूंच्या (साईबाबा) भक्तीने रूजत गेले असावे, असे वाटते.
लहानपणापासून ते आजतागायत मी बाबांच्या दर्शनाला जाते. माझ्या वृत्ती प्रवृत्तीत थोडा का होईना बदल होत गेला हे आत कुठेतरी जाणवते. गुरूच्या दर्शनाने, त्यांच्या सान्निध्याने आपण आतुन पार बदलून जातो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जीवनाचा अर्थ समजायला लागतो. मुख्य म्हणजे आपल्याच दोषांची जाणीव होते. त्याच बरोबर गुण ही नीट समजू लागतात.
खरं, खोटं, सत्य असत्य यातला भेद ध्यानी येवू लागतो. दोष हळू हळू कमी होवू लागतात. त्यामुळेच आत्मविकासाचा मार्ग सापडतो आणि आपण उन्नतीच्या मार्गाने जावू लागतो. तेंव्हा आपली प्रगती झाली असे आत्मिक समाधान आपल्याला मिळते.
हि होणारी उन्नती, प्रगती यामुळे मिळणारे समाधान देणारे आपले गुरूच असतात. या जाणिवेने निष्ठा आणि श्रध्दा वाढते. मी इतकी भाग्यवान स्वतःला समजते की वडिलांचे गुरू साईबाबा, आईची दत्तउपासना आणि भावाचे गुरू श्री क्षीरसागर महाराज अश्या भक्तिमार्गाचा त्रिवेणी संगमच माहेरी होता.

आई, वडिल, भाऊ यांच्या आचरणातून हा भक्तिमार्गच योग्य हे नकळत दाखवून दिले. त्या मार्गाने जाताना गुरूवरची श्रध्दा अढळ घट्ट घट्ट होत जाते. त्यामुळेच या प्रपंचात अनेक बरे वाईट अनुभव घेताना एक आत्मिक बळ येते. सारे सहज घडते ते फक्त आणि फक्त गुरूंच्या आशिर्वादानेच. तेंव्हा वाटते “कृपादृष्टी गुरूची ज्यावरी, पडतसे वरद हस्त मस्तकी विराजमान होतसे.”

— लेखन : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800