Monday, July 21, 2025
Homeयशकथापत्रकार, ग्राहक कार्यकर्ता : किरण बोळे

पत्रकार, ग्राहक कार्यकर्ता : किरण बोळे

पत्रकार किरण बोळे यांची आणखी एक महत्त्वाची ओळख आहे ती म्हणजे ते ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रात ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायत या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा, उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार (पुणे विभाग) उद्या धाराशिव येथे होणार असलेल्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात येत आहे. या निमित्ताने जाणून घेऊ या किरण बोळे यांचे जीवन आणि कार्य….

सातारा जिल्ह्यातील फलटण ही कर्मभूमी असलेल्या किरण बोळे यांची जन्मभूमी ही फलटण तालुक्यातील मालोजी नगर, कोळकी ही आहे. त्यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे.

किरण बोळे यांनी २००५ साली ‘ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते म्हणून फलटण शाखेचे तत्कालीन जिल्हा खजिनदार श्री. पी.जी. ननवरे यांच्या माध्यमातून २००५ साली कामास सुरुवात केली. त्यानंतर फलटण तालुका सचिव, सातारा जिल्हा संघटक म्हणून पुढे ते काम करू लागले. सध्या ते सातारा जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत.

विविध कार्यक्रम, उपक्रम याद्वारे ग्राहक चळवळ सक्षम करण्यासाठी किरण बोळे सतत कार्यरत असतात. आतापर्यंत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे विद्यार्थी प्रबोधन केले आहे. तर तळेगाव ढमढेरे (पुणे), लातूर, जळगाव, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आहे. भारतीय मानक ब्युरो, पुणे शाखा कार्यालय यांच्या वतीने पुणे येथे आयोजित कार्यशाळेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.

किरण बोळे यांनी संघटन वाढीसाठी सातारा जिल्हाध्यक्षा सौ. सुनीता राजेघाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय व शैक्षणिक संस्थांमधील आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. प्रवासी दिनाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या वतीने रथसप्तमीला आयोजित प्रवासी दिन व तिळगुळ वाटप कार्यक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

किरण बोळे यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेले ठळक कार्य पुढील प्रमाणे आहे…
१) पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मिळणारी रक्कम देय असताना बजाज अलियांस विमा कंपनी ती देण्यास टाळाटाळ करीत होती. मात्र ग्राहक पंचायतच्या माध्यमातून कंपनीशी पत्रव्यवहार केल्या नंतर सदर रक्कम विमाधारकाच्या खात्यावर जमा करण्यात आली.

२) फलटण तालुक्यातील गोखळी येथील काळेश्वर ढोबळे या ग्राहकास वारंवार बिघाड होत असलेली घरगुती पिठाची चक्की, संघटनेच्या माध्यमातून नवीन व घरपोच (कोणताही मोबदला न आकारता) डिलरकडून देण्यात आली.

३) फलटण येथील सुमेश नायर यांनी महिंद्रा कंपनीची बोलेरो कॅम्पेनर गाडी (पिकअप) नवीन घेतली होती. एक वर्षाची वॉरंटी होती. गाडीचा स्टार्टर बसत नसल्याने गाडी सुरु होत नव्हती. पर्यायाने ग्राहकाचे मोठे नुकसान होत होते. वारंवार तक्रार करूनही योग्य समाधान होत नव्हते. तोच बिघाड पुन्हा पुन्हा होत होता. वॉरंटी संपण्यास केवळ पंधरा दिवस राहिले असताना संबंधित ग्राहक ; ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा फलटण कडे आला. त्यानंतर सदर तक्रारीबाबत संबंधित डीलर व कंपनीशी पत्रव्यवहार करून नायर यांना जवळपास साडेअकरा महिने वापरलेली सुमारे साडेतेरा लाख रुपये किमतीची सदर गाडी कंपनीने परत घेतली व नवीन गाडी दिली परंतु सदर गाडीच्या पासिंगच्या, विम्याच्या रकमेपोटी सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा पत्र व्यवहार केल्याने सदर रक्कम ही नायर यांच्याकडून घेण्यात आली नाही.

४) राष्ट्रीयकृत बँकांमधील विशेषता बँक ऑफ महाराष्ट्र मधील कॅश डिपॉझिट मशीन मध्ये भरणा केलेली रक्कम खात्यामध्ये जमा न झाल्याने व ती पुन्हा बाहेर न आल्याच्या तक्रारीबाबत अनेक ग्राहकांना मार्गदर्शन केल्याने सुरुवातीला ग्राहकांची तक्रार ऐकून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सदर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात आली.

५) फलटण येथील डॉ. उज्वला म्हेत्रे यांनी ओकीनावा कंपनीची इलेक्ट्रिक बॅटरी वरची दुचाकी गाडी खरेदी केली. परंतु सदर गाडी ची बॅटरी व चार्जर हे वारंवार नादुरुस्त होत असल्याने गाडी जागेवरती होती. याबाबत फलटण येथील सब डीलर व सातारा येथील डीलर यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट पी बी देवकाते यांच्या माध्यमातून ग्राहक मंच, सातारा येथे याबाबत दावा दाखल केला. सदर दाव्याचा निकाल लागून कंपनीने सदर गाडी परत घेऊन गाडीची पूर्ण किंमत 78 हजार पाचशे रुपये ग्राहकाला परत करायची आहे व दावा दाखल केल्यापासून त्यावरती सदर रकमेवर सहा टक्के व्याजही ग्राहकाला द्यायचे आहे. याव्यतिरिक्त मानसिक त्रासापोटी 35 हजार रुपये व दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहे.

दि. ६ जानेवारी २०२३ पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्प, दर्पण सभागृह, पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘विशेष दर्पण पुरस्कार सपत्नीक स्विकारताना किरण बोळे, शेजारी आमदार नितेश राणे, जेष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे, जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ व अन्य

किरण बोळे यांनी ग्राहक पंचायतीच्या कामांबरोबरच फलटण प्रेस क्लब पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, नेहरू युवा मंडळ, कोळकीचे अध्यक्षपद, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहिले आहे. सध्या नव्याने सुरु केलेल्या ‘समता घरेलू कामगार संघटनाचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत.
या संघटनेचे सदस्य म्हणून गेल्या वर्षभरात फलटण, सातारा शहर, कोरेगाव, खटाव येथून सुमारे १ हजार घर कामगार महिलांची सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली असून फलटण येथील घरकाम करणाऱ्या १८६ महिलांना मोफत भांडी वाटप करण्यात आली आहे.

साप्ताहिक सह्याद्री बाणाच्या ‘ग्राहकहीत’ २०२४ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर महेंद्र गांधी, डॉक्टर सौदामिनी गांधी, ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्य कोषाध्यक्ष सौ सुनीता राजेघाटगे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व अन्य

किरण बोळे यांची आजपर्यंतची पत्रकारितेतील कारकिर्द सुद्धा लक्षणीय अशी आहे. दै. मुक्तागिरी या वृत्तपत्राचे फलटण प्रतिनिधी म्हणून त्यांनी २२ वर्षे काम केले आहे. ते दै. लोकमत (कोळकी डेट लाईन) चे २००३ ते २०१० या दरम्यान प्रतिनिधी होते. तर २००४ ते २००१४, दै. तरुण भारत (शहर प्रतिनिधी) २०१४ ते २०१८, दै. सकाळ मध्ये (शहर प्रतिनिधी) म्हणून त्यांनी २०१८ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत म्हणून काम केले आहे. त्यांनी २०२१ साली स्वतःचे ‘साप्ताहिक सह्याद्री बाणा’ हे साप्ताहिक सुरु केले आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न समस्या यांची प्रभावी मांडणी केल्याबद्दल किरण बोळे यांना आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील एक प्रमुख पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व विद्यमान भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना. रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या हस्ते 2023 साली पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे प्रदान करण्यात आला.

अतिशय निरलस वृत्तीने पत्रकार आणि ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावित असलेल्या किरण बोळे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?