साल होते, १९८५. एका मित्राच्या काही व्यक्तिगत बाबींमुळे त्याचा पत्रकारितेवरच राग होता. त्यामुळे मी पत्रकार आहे, ही बाब बहुधा त्याला काही रुचत नव्हती. म्हणून त्याने मला सुचविले की, मी पत्रकारिता सोडावी म्हणून. त्याचा माझ्यावर असलेला प्रभाव आणि त्याच बरोबर अन्य काही कारणांनी मी केसरी मधील उप-संपादकाची नोकरी सोडली. पण अल्पावधीतच माझी चूक माझ्या लक्षात आली, कारण नोकरी सोडून मी काय करणार होतो ? याचा काही विचारच केला नव्हता. म्हणून मग केसरीचेच प्रकाशन असलेल्या साप्ताहिक सह्याद्री साठी विशेष प्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो.
त्यावेळची मी सह्याद्रीसाठी लिहिलेली, खूप गाजलेली आणि पुन्हा अंकाच्या ७० हजार प्रतींची प्रिंट ऑर्डर द्यावी लागलेली कव्हर स्टोरी म्हणजे शनि शिंगणापूरवर लिहिलेली. दुसरी एक पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट वर लिहिलेली. बाकी अशाच छोट्या मोठ्या बातम्या मी सह्याद्रीला देत होतो.
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील माझा वर्गमित्र, खोलीमित्र बाबासाहेब काझी याचा मित्र असलेला, पत्रकारितेच्या विभागात येऊन, बाबासाहेब काझी याच्याकडे लक्ष ठेव, म्हणून सांगून गेलेला, छत्री ही फोल्डिंगचीही असते, असे ज्याच्याकडे बघून समजले तो दौलत हवालदार हा महाराष्ट्र शासनाच्या व्हीटी स्टेशन समोरील, हजारीमल सोमाणी मार्गावर असलेल्या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दखल झाला होता. संस्थतेच वसतिगृह असल्याने त्याचा जवळपास २४ तासाचा वेळ संस्थेतच जात असे.
एकदा दौलत हवालदार ला भेटण्यासाठी मी संस्थेत गेलो होतो. त्यावेळेस त्याच्या सोबत तयारी करणाऱ्या इतर काही जणांच्या ओळखी झाल्या. त्यातील काही म्हणजे सुनील कदम, राजेंद्र मापुसकर आणि सीताराम बेडगे हे होत. लवकरच मी या सर्वांशी मिळून मिसळून वागायला लागलो. दरम्यान मी अशी टूम काढली की, आपण भारतभ्रमण करू या म्हणून. माझ्याकडे तर पैशांची बोंबच होती. म्हणून मी असे सुचविले की, आपण भगव्या कफन्या घालून रेल्वेने तसेच फिरायचे. माझ्या बऱ्याचशा कल्पना या व्यवहार्य नसायच्याच आणि अजूनही नसतात म्हणा, म्हणून मग विचारांती आम्ही काटकसरीने गोवा ट्रिप करून यायचे ठरले. काही नावे कमी होत होत, शेवटी दौलत हवालदार, सुनील कदम, मी आणि सीताराम बेडगे असे चौघे जण नक्की झालो.
आमच्यामध्ये हिशेब ठेवणारा पक्का माणूस म्हणून आम्ही एकमताने सुनील कदम याच्याकडे पैसे जमा करायचे, प्रत्येक ठिकाणी त्यानेच बिले द्यायची आणि हिशेब ठेवायचा, असे ठरले.
शेवटी १९८५ च्या डिसेंबर महिन्यात आम्ही व्हीटी स्टेशन हून रेल्वेने मिरज येथे गेलो. तिथून गाडी बदलून वास्को येथे उतरलो. वास्को हून पणजी येथे आलो. पणजीत आमचा मुक्काम युथ हॉस्टेल मध्ये होता. मग सुरू झाल्या एकेक गमतीजमती. आमच्या चार जणांच्या ग्रुप मध्ये तीन ग्रुप पडले ! मनमौजी असलेला दौलत आणि मी, हा एक ग्रुप. हिशेब ठेवणारा, तटस्थ राहणारा सुनिल कदम आणि मी म्हणतो, तेच ऐकले पाहिजे, केले पाहिजे असे वाटणारे सीताराम बेडगे !
आमच्यात खटके उडण्याचे, वादाचे मुख्य कारण असे; ते म्हणजे मी आणि दौलत. बीच वर गेलो की आम्ही दोघे हमखास बिअर घेत असे. किती घेत असू, त्याची काही मोजदाद नसे. आमचा होणारा खर्च हा जमलेल्या सामूहिक निधीतून होत असे. त्यात या सर्व बाबी बेडगेना निषिद्ध होत्या. तर सुनील कदम कुणाची बाजू घ्यावी, या संभ्रमात असे. बेडगेंचे एक प्रकारचे सततचे बॉसिंग आम्हा दोघांना काही केल्या सहन होत नसे. त्यामुळे बीच वर किंवा परत हॉस्टेल मध्ये आल्यावर काही ना कारणांनी वादावादी होत असे. अशा प्रकारे एक आठवडा गेला.
परतताना आम्ही सांगली येथे उतरून आपापल्या वाटांनी जायचे ठरविले होते. त्या प्रमाणे आम्ही बस ने सांगली गाठली. सांगली बस स्टँड वरील कॅन्टीन मध्ये आम्ही चौघेही चहा घेण्यासाठी गेलो. तिथे बसल्या बसल्या बेडगे असे काही तरी बोलले की, दौलतने आठवडाभर दाबून ठेवलेल्या रागाचा, संतापाचा एकदम स्फोट झाला आणि त्याने पाणी पिण्यासाठी उचललेला काचेचा ग्लास खिडकीतून एकदम आकाशाकडे भिरकावला. वर जाऊन तो ग्लास आम्ही बसलेल्या खिडकीजवळच येऊन मोठा आवाज करीत खळकन फुटला आणि आमची तिथून पांगापांग झाली.
या आमच्या ऐतिहासिक ट्रिपच्या काही आठवणी सांगताना दौलत ने सांगितले, “आपण सर्वच बेडगेंना खूप तत्वनिष्ठ समजत होतो. त्यामुळे व्हीटी वरून गाडी सुटल्यावर गर्दी पाहून आपण सर्व सेकंड क्लास स्लीपर कोच मधून प्रवास करायचे ठरविले. पण आपण थर्ड क्लास चे तिकीट काढले असल्यामुळे सेकंड क्लास स्लीपर कोच मधून प्रवास करणार नाही, अशी तात्विक भूमिका घेत बेडगेनी पूर्ण रात्र त्या गर्दी असलेल्या डब्यातून प्रवास केला. आपण मात्र आरामशीरपणे सेकंड क्लास स्लीपर कोच मधून प्रवास केला.
“त्यावेळी बोगमालो बीच नव्यानेच (आजच्या भाषेत व्हर्जिन बीच) उदयास येत होता. तर आपण एक दिवस त्या बीच वर गेलो. बीच वर काही परदेशी पर्यटकांचे टॉवेल, शाम्पू अशा बऱ्याच काही वस्तू पडलेल्या दिसत होत्या. या वस्तूंचे कुणीच मालक दिसत नाही, असे पाहून आम्ही त्या वस्तू घेऊन हॉस्टेल वर परतलो. वस्तूंचे वाटप करताना, चांगल्या आणि भारी वस्तू बेडगेंनी स्वतःसाठी ठेवून घेतल्या. इतर काही वस्तू मला (दौलत) आणि सुनील ला दिल्या. तुला मात्र काहीच दिले नाही. म्हणून तू भडकला आणि पोलिस ठाण्यात जाऊन, तुम्ही चोरी केल्याची तक्रार दाखल करतो, असे सांगून खरेच पोलिस ठाण्यात पोहोचला देखील. पण तू तिथे तोंड उघडणार, तितक्यात आम्ही तिथे पोहोचून, तुझी समजूत घालून, पोलिस ठाण्यातून बाहेर पडलो आणि एक बांका प्रसंग टळला. बेडगे दाखवत होते, तसे ते प्रत्यक्षात नव्हते, हे सर्व आठवून पुढे खूप वर्षे आपण हसत राहायचो”.

तर गोव्याच्या या ट्रीपच्या आठवणी सांगताना, त्या आठवणीत हरवून जात, सुनील कदम ने सांगितले, “गोव्याच्या ट्रीपमध्ये बेडगे दिवसातून तीन-चार वेळेस तरी रुसत असत. पण तास दोन तासात परत नॉर्मल होत. ते वगळता, आपल्या तिघांना अशा सहलीचा आनंद कसा लुटावा हे माहित नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. गोव्याच्या सांताक्रूझ बीचवरुन आपण बोटीने डोना पाउलाला चाललो होतो. आपल्या बरोबर बोटीवर आपल्या समवयस्क ३-४ तरुणांचा एक ग्रुप होता. ते आपल्या गप्पा (खरं तर वाद) ऐकत होते. शेवटी त्यातील एकाने दौलतला बाजूला घेऊन विचारलंच “तुम्ही तिघे (दौलत, सुनील आणि देवेंद्र) एकसारखे वाटता. पण हे गृहस्थ (म्हणजे बेडगे) जरा वेगळे आणि वयस्कर वाटतात. मग ते तुमच्या बरोबर कसे ?”

दौलत म्हणाला, ते आमचे सर्वात छोटे काका आहेत. आमच्यापेक्षा फक्त दहा बारा वर्षांनी मोठे आहेत. कारण बेडगे त्यांच्या वयापेक्षा नेहमीच अधिक प्रौढ दिसत आणि तसेच वागत. आम्ही पंचविशी ओलांडलेले पोरकट होतो तर ते माझ्यापेक्षा वर्ष सव्वा वर्षाने तर तुझ्या आणि दौलतपेक्षा चार-सहा महिन्यांनी लहान असूनही चाळीशी ओलांडलेल्या प्रौढासारखे वागत. बोट साहजिकच उघडी होती आणि आपण समुद्राकडे (खरं तर ती नदी किंवा खाडी होती पण आपल्याला ती समुद्रच वाटायची) बघत होतो. बेडगेंना साप पोहताना दिसला आणि ते ओरडले, ‘अरे साप बघा’. आपण तिकडे बघेपर्यंत साप पाण्यांत गायब झाला होता. त्यामुळे तू आणि मी (देवेंद्र/सुनील) म्हणालो, ‘आम्ही नाही पाहिला’. झालं ! बेडगेंचा पारा चढला. तुम्हा लोकांना प्रवासाचा आनंद कसा घ्यावा तेच कळत नाही. तुम्ही सगळे पोरकट आहात असं म्हणत त्यांनी आपल्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. पण प्रसंगावधान राखून, बेडगेंची समजूत घालत दौलत म्हणाला, मलाही बोटीच्या दुसऱ्या बाजूला साप दिसला. दौलत चक्क खोटं बोलतोय हे आम्हाला कळत होतं. बेडगेंना काय बोलावं ते सुचेना आणि आम्ही तिघे जोरजोरात हसायला लागलो. झालं, बेडगे नेहमीप्रमाणे रुसले !.
यथावकाश आम्हा प्रत्येकाला नोकऱ्या लागल्या. दौलत हवालदार यूपीएससी मार्फत आधी भारतीय पोलिस सेवेत, मग एमपीएससी मार्फत डेप्युटी कलेक्टर म्हणून निवडला गेला. काही महिने डेप्युटी कलेक्टर म्हणून राहून तो पुन्हा यूपीएससी मार्फत निवडला जाऊन गोवा सरकारच्या सेवेत दाखल झाला. सुनील कदम बामर (याचा योग्य उच्चार फक्त तोच करू शके!) लॉरी या कंपनीत अकाउंट्स ऑफिसर म्हणून लागला. मी मुंबई दूरदर्शन केंद्रात लागलो आणि बेडगे डेप्युटी इंजिनिअर म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या सेवेत गेले.
मात्र एक मान्य करावे लागेल, ते म्हणजे आमची गोव्याची ही ट्रिप खूप अविस्मरणीय ठरली. मी दूरदर्शन मध्ये असताना बऱ्याचदा काही कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी गोव्यात जात असे. काही वेळा शासकीय विश्रामगृहात तर काही वेळा चक्क पाचतारांकित हॉटेल मध्ये राहायला मिळत असे. (ज्या त्या आयोजकांच्या क्षमतेनुसार!) नंतरही काही वेळा स्वखर्चाने बऱ्याचदा गोव्यात गेलो. पण त्या ट्रिपची मजा काही आली नाही.
दुसरे म्हणजे, गोव्याच्या त्या ट्रिप मध्ये आमच्यात इतकी वादावादी होऊनही त्याच्या परिणामी आमच्या संबंधांमध्ये कधीच कटुता आली नाही. त्यामुळे आमच्या भेटीगाठीतही कधी व्यत्यय आला नाही. इतकेच काय सिक्कीम, दार्जिलिंग, कुर्ग अशा काही सहली, पदभ्रमण मोहिमा आम्ही एकत्र केल्या. त्यातील काही सहकुटुंब देखील केल्या. आम्ही काही जण मुंबईतच असल्यामुळे एकमेकांच्या घरी जाणे, येणे, रहाणेही होत असायचे.
बेडगेंचा स्वभाव, व्यक्तिमत्व हे एक प्रकारचे भीतीयुक्त आदर वाटणारे किंवा आदरयुक्त भीती वाटणारे असे मला तरी वाटायचे. त्यामुळे मी कधी त्यांना नावाने किंवा आडनावांनेही संबोधित न करता नेहमीच “बेडगेसाहेब” म्हणत असे. अर्थात हे सर्व आपसुकच घडत असे. तर तेही मला अरे तुरे न करता, “देवेंद्रजी” असेच म्हणत आले आणि तसेच लिहित आले.

वरकरणी जरी बेडगे कठोर वाटत असायचे, तरी त्यांच्या अंतरी सर्वांविषयी काळजी असायची. इतक्या मोहमयी जगात राहूनही, त्यातही आमच्या सारखे मित्र असूनही ते सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले होते. मित्रांसोबत ते “बसायचे” जरूर, हवी ती सरबराईही आनंदाने करायचे. पण कुणी कितीही आग्रह केला तरी त्यांनी एकदाही “एकच प्याला” कधी हातात घेतला नाही. की कधी अंड्याला, अन्य मांसाहारी पदार्थांना हात लावला नाही.
आपली नोकरीही त्यांनी अत्यंत निष्कलंकपणे बजावली. एका पैशाने त्यांनी कधी कुणाला फसवले नाही की कधी खोटेनाटे वागले बोलले नाहीत. आम्ही सर्व जणांनी नोकरीत असतानाच स्वतःची घरे घेतली होती. पण बेडगे शेवटपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील क्वार्टर मध्ये राहिले. याबाबतीत मी कितीदा तरी त्यांना सांगायचो. पण ते काही माझे बोलणे फारसे मनावर घेत नसत. निवृत्तीनंतर मात्र त्यांनी ठाणे येथे स्वतःचे घर बांधले. स्वतःच्या आवडीनुसार फर्निचर बनवले. घराची वास्तुशांती मात्र घरच्या लोकांबरोबरच केली. दोनदा मी ठाण्यात काही कार्यक्रमांच्या निमित्ताने गेलो असता, त्यांच्या घरी जाऊ म्हणून त्यांना फोन केला, तेव्हा दोन्ही वेळेस ते ठाण्याबाहेरच होते. त्यामुळे त्यांचे घर पाहण्याचा योग काही आलाच नाही.
बेडगेंना पदभ्रमण आणि वाचनाची अत्यंत आवड होती. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते पदभ्रमणासाठी निघत. १४ वर्षांपूर्वी त्यांची बायपास तर ८ वर्षांपूर्वी त्यांची इंजोप्लास्टी झाली होती, त्यांना मधुमेह सुद्धा होता. त्यामुळे त्यांनी स्वतःची खूप काळजी घ्यावी असे वाटत होते आणि खरं म्हणजे त्यांनी ती तशी घ्यायला देखील हवी होती. तसेच त्यांचे त्यांच्या खाण्यावरही नियंत्रण नसे. विशेषतः काही तेलकट पदार्थ ; म्हणजेच भजी, बटाटेवडे असे काही दिसले की, त्यांचे पाय तिकडे वळतच. सोबत्यांनी कितीही नाही म्हटले तरी ते काही ऐकत नसत.

नुकतेच ते एप्रिल, मे महिन्यात उत्तरांचल मध्ये राहून आले होते. त्यांच्या सोबत गेलेले, मित्र वाय.जी. कांबळे सांगत होते की, कुठेही काही खाण्याचे पदार्थ बनवणे चालू असल्याचे दिसले की ते लगेच त्यांचा मोर्चा तिकडे वळवत. कितीही सांगितले तरी ते काही ऐकायचे नाहीत. मृत्यूच्या काही दिवस आधी ते पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले होते. वारीच्या दरम्यान असेच काही त्यांच्या खाण्यात आले आणि तिथून आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यांना अती दक्षता कक्षात ठेवण्यात आले. पण सर्व गात्रे शिथिल होत गेली आणि शेवटी ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

याबाबतीत बोलताना सुनील कदम म्हणाला, “अलीकडे म्हणजे गेल्या पाच-सात वर्षात ते बऱ्यापैकी मवाळ झाले होते. पूर्वी प्रत्येक वादग्रस्त विषयांवर त्यांची स्वतःची एक भूमिका असे. पण अलीकडे उघडपणे कोणतीही भूमिका घेणं ते टाळत असत. त्यावर त्यांना विचारलं कि ते सांगत, “आता माझ्यात भांडण्याची ताकद राहिलेली नाही”. माणसाला मृत्यूची चाहूल लागत असावी का ? तसं असेल तर बेडगेंसारख्या बुद्धिमान माणसाला ती नक्कीच लागलेली असणार. कारण त्यांनी एक “इच्छा यादी” बनवलेली होती आणि ती यादी पूर्ण करण्याचा त्यांचा सतत प्रयास असे. ह्या एप्रिल महिन्यात जेव्हा त्यांनी उत्तराखंडला जाऊन राहण्याचा बेत आखला (गेल्या वर्षीही ते तिकडे महिनाभर गेले होते) तेव्हा आम्ही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरूनही ह्या मोहिमेला कडाडून विरोध होता. पण ते हट्टालाच पेटले होते. मला ते म्हणाले, हिमालयातली ही माझी शेवटची सहल आहे. मला विरोध करू नका. मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवाय. अलीकडेच एकदा बोलतांना ते सहजपणे बोलून गेले “आता माझ्याकडे फार वेळ नाहीय”. शेवटी त्यांना सोबत द्यावी ह्या हेतूने वाय.जी कांबळे त्यांच्या हिमालयातील वास्तव्यात मधले तीन आठवडे त्यांच्या सोबत राहिले. बेडगेंचं असं अचानक जाणं आपल्याला जरी अनपेक्षित होतं पण बहुधा त्यांना ते तितकंसं नसावं असं आता वाटू लागलंय.”

डिप्लोमा आणि नंतर इंजिनिअरिंगची डिग्री घेताना चार वर्षे आणि नंतरही मैत्री कायम राहिलेले मित्र गजानन जोशी यांनीही बेडगे यांच्या खूप आठवणी सांगितल्या. पण त्यांचे एक वाक्य माझ्या चांगलेच लक्षात राहिले, ते म्हणजे बेडगेंचे व्यक्तिमत्वच असे होते की, ते गेलेत तरीही “ते” गेलेत, असे वाटतच नाहीय !
मला वाटते ही भावना फक्त गजानन जोशी यांचीच नसून तुम्हा आम्हा सर्वांचीच असेल !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. 9869484800
खूप हृदय हेलावून टाकणार्या आठवणी!!! खूप सहजसुंदर लेखन!!