खरंतर निसर्ग हा माणसाचा सगळ्यात चांगला सखा आहे. मध्यंतरी गुगलवर एका उत्कृष्ट पत्राला जे बक्षीस मिळालं, त्यात त्या वाचकाने सांगितलं की, “आठ तासाच्या झुरीच हुन आलेल्या विमान प्रवासानंतर मी माझ्या, गावच्या शेताच्या मागच्या जंगलात फिरायला गेलो. दमलो होतो तरीही गेलो. उघड्यावर खुर्ची टाकून बसलो आणि मला खूप बरं वाटलं. लेखकाची अडचण संतृप्ती, लेखकाचा थांबा त्याच्यामुळे दूर होतो आणि वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचतात कारण मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे प्राणवायू मिळतो.”
मी देखील अनुभवले की बहिणीचा किंवा कुणाचा बंगला असला असतो, तिथे मजा येते. एकत्रित किंवा एकटे असो, आम्ही गच्चीत थोडा वेळ रमतो. जरी पलंगावर लोळून चंद्र, चांदणे बघितले तरी निसर्ग सख्याने माझा हात पकडला, माझ्या अंगावर हात फिरवला असं वाटतं. वाटते की माझ्या आत्म्यापर्यंत तो आनंद झिरपतो किंवा माझं अस्तित्व मला त्या जंगलात मोकळ्या आकाशाच्या खाली सापडतं. मी अधिक आनंदी होते. वर्षा सहलीसाठी म्हणजे पावसाळ्यात देखील भिजण्यासाठी किंवा पावसाळ्यात एखाद्या तंबूमध्ये राहण्यासाठी लोकं सहलीसाठी जंगलात जातात. तो पण एक आनंद मिळवण्याचा मार्ग असतो.

निसर्ग सखा सगळा थकवा शोषून घेतो आणि भरपूर चालल्यामुळे थकल्यामुळे आपल्याला झोप देखील शांत लागते. शहरातल्या सारखे आवाज, धूळ, धूर, हवेची कमतरता, याचा त्रास होत नाही. खूप ताजेतवाने वाटते.
मला आठवतं आमच्या लहानपणी एवढे एसी, कुलर पंखे हे प्रकारच नसायचे. सगळेजण गच्चीत झोपायला जायचे. तिथे डासांचा त्रास होऊ नये म्हणून मग थोड्या वेळाने किती जण जास्त डास चावतात, पावसाचे शिंतोडे येतात म्हणून गच्चीवरून गाद्या घेऊन खाली यायचे. कारण तेव्हा नुकताच जेमतेम डास नाशक मलम, कासवछाप अगरबत्ती यांचा शोध लागला होता. पण ते दुर्मिळच होते. मग कडुलिंबाच्या पाल्याचा धुर करायचो. तिथे धूप, उदबत्ती लावायचे. पण तरी डास चावायचे. मच्छरदाणी लावत असू. त्या मच्छर दाण्यासाठी जाड दोऱ्या होत्या. ज्या गच्चीच्या खांबाला किंवा गच्चीच्या हुकला बांधल्या जायच्या. मगच शांत झोपायचं. आकाशात चंद्र चांदणे बघण्याचा आनंद, त्या गप्पा सह वेगळा असायचा. तसे एक गाणे आहे…
“सुहानी चांदनी राते ,
हमे सोने नही देती!
तुम्हारे प्यार की बाते,
हमे सोने नही देती ! “
तशा गच्चीतल्या किंवा मोकळ्या शेतात खाटलं टाकून मारलेल्या गप्पा माणसाला खूप ताजे करतात. सर्व शेजारी आजूबाजूचे भाडेकरू, मित्र-मैत्रिणी देखील ह्या गच्चीत झोपायचे. चंद्र बघत, चांदण्या मोजायचे. गच्चीतल्या चंद्र प्रकाशात वावरण्याचा आनंद घ्यायला यायचे. ते दिवस कायमच आठवतात. म्हणून तर हल्ली टेरेस फ्लॅट लोकांना हवा असतो. पण तरीही ते गच्चीत सगळ्या भावंडांसोबत खिदळत कुदळत झोपणे खास असे. ते दिवस आता राहिले नाही. गेले ते दिन गेले !
वेगवेगळी फुले उमलली, रचूनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले. अजूनही कधीतरी वर्षातून एखाद्या दिवशी, वेळ काढुन बेत रचुनी निसर्ग सख्याला भेटायला, जंगलात रात्र काढायला, गच्चीत झोपायला नक्की जा. तो निसर्ग सखा तुम्हाला खूप आनंद देईल.

— लेखन : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800