Sunday, July 27, 2025
Homeबातम्यासाहित्याने मन उदात्त होते - सुधीर शेरे

साहित्याने मन उदात्त होते – सुधीर शेरे

साहित्य वाचनाने मन उदात्त होते. अनेकांचे दुःख पाहिले की जीवनातले सत्य समजायला लागते. अहंकार विरून जातात. म्हणून माणसे आणि पुस्तके रोज वाचली पाहिजेत, अशी अपेक्षा लेखक सुधीर शेरे यांनी व्यक्त केली. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मूळ चवणेश्वर हे गाव असलेले लेखक सुधीर शेरे यांनी नुकताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री सुधीर शेरे म्हणाले, मानवी जीवन हे सुखापेक्षा दुःखाने भरले आहे. आपण हे दुःख शोधले पाहिजे. साहित्यिक संवेदनशील असतात. ते मनाला लावून घेतात. म्हणून विचारी असणे, शोधक असणे, कल्पना सुचणे, अनुभव घेणे हे लेखक होण्यास उपयुक्त ठरते. यावेळी सुधीर शेरे यांनी त्यांच्या गाजलेल्या “एक होती गंगा” या कथेच्या लेखनामागील प्रेरणा,लेखनानुभव विशद करताना सांगितले,
“एक होती गंगा” ही नागझरी येथील एका आश्रमात मला भेटलेली मुलगी होती. माझी मुलगी याच आश्रमात शिकत होती. एकदा तिला भेटायला गेल्यावर मला गंगा भेटली होती. तिच्याशी बोलणेही झाले होते. पण पुढे आठ दिवसात ती हे जग सोडून गेली. ही गोष्ट कळताच मी अतिशय दुःखी झालो. त्यामुळे माझ्या ह्रदयात सहानुभूतीच्या भावना जाग्या झाल्याने तिच्या बद्दल लिहिण्याचे ठरवले. त्यासाठी तिची सर्व माहिती मिळविली. शक्य तितके सत्य, काही ठिकाणी कल्पना याचा संयोग घडवून “एक होती गंगा” ही कथा तयार झाली.

अनाथ जीवन माणसाच्या मनाला कसे आतून व्याकूळ करते हे मी माझ्या मनात अनुभवले, असे सांगून त्यांनी प्रामाणिकपणे केलेला अभ्यास, आवड, अखंड परिश्रम चांगला माणुस घडायला मदत करतात. एकदा चांगलं मनुष्यत्व प्राप्त करु शकलोत की साधेपणाने आनंदी , समाधानी जीवन जगता येते. समस्या निवारण संयमाने करता येते. गरजा कमी असल्या की ओढाताण न होता आयुष्याचा आनंद समाधानाने घेता येतो. संवेदनशीलता अंगी असेल तर लेखनादी कार्यात समाधानपूर्वक यश मिळतं. म्हणून चांगले विद्यार्थी, चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करा. तेच खरे शिक्षण आहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी त्यांची वेस, एक होती गंगा व ओव्या दिनाच्या ही पुस्तके भेट दिली.

मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य मा.प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी त्यांचा बोलीगंध प्रातिनिधिक कवितासंग्रह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की, आता प्राध्यापकाने केवळ व्याख्यान द्यायचे आणि विद्यार्थ्याने ऐकायचे,अशा प्रकारचे अध्यापन उपयुक्त ठरणार नाही. तर प्रत्यक्ष प्रयोग करणे, कौशल्य आत्मसात करणे यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असेल. त्यामुळेच आम्ही “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करीत आहोत. लेखक कसा तयार होतो, लेखकाचा जगण्यासाठी कोणता दृष्टीकोन आहे, त्याचे साहित्य आणि जीवन यांचा सबंध काय असतो समजून घ्यायला हवे. केवळ परीक्षेतले गुण महत्वाचे नसून माणूस समजून घेण्याचे सामर्थ्य वाढत असते,त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः कार्यक्रमात व उपक्रमात संवाद साधला पाहिजे, असे सांगितले.

संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी जाणीवेने निरीक्षण करणे आवश्यक आहे हे मत योग्य असल्याचे सांगितले. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नसून जीवन घडविण्यासाठी सतत क्रियाशील असणे, शोधक दृष्टीचा विकास करणे, नवे अनुभव घेणे, घेतलेल्या अनुभवाचे विश्लेषण करणे हे आम्हाला चांगले कळले, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी प्रा.डॉ.विद्या नावडकर, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे, प्रथमेश बाबर यांची उपस्थिती होती.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ५८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ