Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यकाही कविता : प्रिती लाड

काही कविता : प्रिती लाड

सौ. प्रिती संतोष लाड यांचे शालेय शिक्षण त्यांच्या  मालवाडा या गावी, तर कॉलेजचे शिक्षण स्वामी विवेकानंद आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वाडा येथे झाले. शालेय जीवनात त्या अनेक स्पर्धा, परीक्षा सर्व खेळांमध्ये भाग घेत असत. त्यांनी मराठी व इतिहास विषय घेऊन पदवी घेतली. त्यांनी कॉलेजला असतानाच कविता लेखनाला सुरुवात केली. सोबतच वाचनाचा छंद जडला. जुनी हिंदी गाणी, मराठी भक्तिगीते व भावगीते ऐकायला त्यांना खूप आवडतं. २००२ साली लग्न होऊन त्या पनवेल मध्ये आल्या. काही वर्षे त्यांनी पतीस व्यवसायात साथ दिली. आता पूर्ण वेळ गृहिणी आहेत. माणसाने  माणसाशी माणुसकीने वागावे असे त्यांचे उदात्त विचार आहेत. आजच्या कवितांमध्ये त्यांनी पाऊस आणि मनाची छान तुलना केली आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

१. “तू

तहानेने व्याकुळ
‘मी’ रूपी चातकाची तहान
शमवणारा पावसाचा एक थेंब
तो ‘तू’ आहेस

मोती घडण्यास उघडलेल्या
‘मी’ रूपी शिंपल्यात
बरसणारा पावसाचा एक थेंब
तो ‘तू’ आहेस

शांत स्तब्ध
‘मी’ रूपी पाण्यास
तरंगणारा पावसाचा थेंब
तो ‘तू’ आहेस

रखरखत्या उन्हात
‘मी’ रूपी तप्त मातीस
सुगंध देणारा पावसाचा थेंब
तो ‘तू’ आहेस.

२. उद्विग्नता

आभाळ कोसळलं
की ढग रिकामे होतात
अश्रूंना वाट करून दिली
तरी मन मात्र रिकामं होत नाही

अंतर्मनातील उद्विग्नता
ऋतूंसारखी धोबीपछाड करते
कधी उन्हाळ्यासारखे
रखरखीत चटके देते

कधी पावसासारखे
पुन्हा दमट सावट धरते
कधी कडाक्याच्या थंडीसारखे
विचारांची भेसळ गोठून टाकते

३. आक्रंद

बरसू दे दाही दिशांनी
बेधुंद पावसाला
उधळू दे विखरूनि
चौफेर वादळाला

गर्जू दे अवकाशात
विजेची स्वर्णमाला
जाहले अस्ताव्यस्त
विस्कळीत सगळे

मोकळ्याने एकदा
आक्रंदू दे मनाला
जगाने तोडलेली
एक एक लक्तरे

खपल्या पडून
रक्ताळलेली शक्ले
झडूदे रक्ताच्या थारोळ्यात
त्या जीर्ण जखमांना

मोकळ्याने एकदा
आक्रंदू दे मनाला
मोकळ्या हवेतला
तो एक उसासा

थिजलेल्या मनाला
तेवढाच दिलासा
जाऊदे बिलगुन एकदा
चिंब पावसाला
मोकळ्याने एकदा
आक्रंदू दे मनाला.

प्रिती लाड.

— रचना : सौ. प्रिती लाड. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments