“धृतराष्ट्र”
रणजीत आपल्या आई-वडलांना भेटण्यासाठी गावी येत असे. दर वेळी आला की तो म्हणे, ‘बाबा, हे जुनं घर पाडून नवीन बंधू.’ आणि दरवेळी, ‘पुढल्या वेळी बघू’ असं म्हणत रघु टाळत असे. यावेळी तो म्हणाला, ‘आपल्या आणि माधवकाकाच्या मधल्या भिंतीत जी खिडकी आहे, ती तरी बुजवून टाकू. सगळं उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. ‘
‘त्या खिडकीमुळे झाकलंसुद्धा जातं’ रघुला म्हणायचं असतं पण तो काहीच बोलत नाही.
भिंतीतली ती खिडकी म्हणजे काय, तर एक फूट लांब आणि एक फूट रुंदीची भिंतीत सोडलेली मोकळी जागा होती.
आज रणजीतने गवंड्याला बोलावून ती मोकळी जागा बांधून घेतली. मग तो रघुला म्हणाला, ‘मी रात्रीच्या गाडीने जाईन. प्लॅस्टरवर तेवढं उद्याला पाणी मारा.’
रणजीत निघून गेला. मग रघु बायकोला म्हणाला,
‘झालं, ते काही चांगलं झालं नाही. माधवभाऊला किती वाईट वाटेल ! ‘
‘कुणालाही वाईट वाटेल अशीच गोष्ट घडली.’ बायको म्हणाली, ‘या खिडकीतून माधवभाऊ आणि यशोदावहिनींनी आपल्याला किती म्हणून झाकून ठेवलं होतं.
‘होय. आपल्याकडे आधी होतंच काय?’
‘पाहुणे आलेले दिसले की यशोदावहिनी चहासाठी दुधाची तपेली द्यायच्या.’
‘सणावारी शिरा आणि लाडूंची पातेली यायची. रणजीतसाठी कधी कधी पकोडे यायचे.‘
‘सध्या त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना फारच वाईट वाटेल. ’
‘खरं आहे. बांधकाम ताजं आहे. मी काय करतो, उद्या पाडून टाकतो.’
‘पण तसं केलं, तर मुलाला वाईट वाटेल.’
दुसर्या दिवशी रघु बादलीत पाणी घेऊन डबड्याने बांधकामावर पाणी मारू लागला.
मनातल्या मनात म्हणाला, विटा खेचून काढणार होता, पण रात्रीपासून धृतराष्ट्र मनात येऊन बसला होता.
मूळ गुजराती लेखक : मोहनलाल पटेल

— मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धृतराष्ट्र ही मनोवेधक आणि संवेदनशील कथा आहे.
धृतराष्ट्र….मानवी मनाचे नेमके दर्शन घडवणारी कथा