“पनीरचे पिंजरा रोल्स”
सध्या सर्वांना हॉटेल्स मधील किंवा स्ट्रीट फूड मधील वेगवेगळी स्टार्टरस् खायला खूपच आवडतात. बरेचदा ती तळण्यासाठी वापरलेले तेल आरोग्यासाठी खूप घातक असते. त्यात वापरले जाणारे पदार्थ देखील कमी दर्जाची असतात. पण जिभेला छान, टेस्टी लागतात म्हणून आनंदाने खातात आणि मग आजारी पडतात. आता पावसाळ्यात तरी याची खूपच काळजी घेणे गरजेचे असते.
मग असे काही मस्त, चटपटीत स्टार्टर्स आपण घरातच बनवली तर ? आणि काही स्टार्टर्स तर अशी सुद्धा असतात की ही दिसायलाही इतकी आकर्षक असतात की पाहूनच खाण्याचा मोह आवरत नाही. पहायचे म्हणता ? पहाच मग एक असेच बेस्ट स्टार्टर !
साहित्य :
पावकिलो पनीर, एक वाटी बेसन, 1चमचा तांदूळाची पिठी किंवा कॉर्न फ्लोअर, एका मोठ्या हिरव्या आणि लाल सिमला मिरचीचे पातळ आणि लांबट काप, एका मध्यम आकाराच्या कांद्याचे पातळ, लांबट उभे काप, 1चमचा लाल तिखट, चवीनुसार सैंधव आणि स्वादानुसार हिंग चिमूटभर ओवा, पाव चमचा हळद, पाव चमचा धनेजिरे मसाला, 1 चमचा मस्टर्ड ऑइल.. मोहरीचे तेल, ते नसेल तर मोहरीची पाव ते अर्धा चमचा डाळ बारीक कुटून साध्या तेलात मिक्स करून घेतली तरी चालेल, तळण्यासाठी तेल.
कृती :
सर्वांत आधी पनीरचे लांबट काप करून घ्यावेत. मग एका वाटीत तिखट, सैंधव, हिंग, धने जिरे पावडर, हळद, मिक्स करून घ्यावे. पनीरला मस्टर्ड ऑइल लावून घ्यावे. व त्यावर हा मिक्स मसाला भरपूर लावून मुरण्यासाठी ठेवावे.
एका बाऊल मध्ये बेसन, पिठी घेऊन त्यात शिल्लक राहिलेला मिक्स मसाला, चवीनुसार तिखट, मीठ, ओवा घालून त्याचे भज्याच्या पिठापेक्षा थोडेसे पातळ म्हणजे डोशाच्या पिठासारखे पीठ भिजवून छान बॅटर बनवावे आणि हे बॅटर टोमॅटो सॉस- केचप च्या बाटलीत भरून घ्यावे. मुरलेले पनीर नॉनस्टिकच्या तव्यावर परतावे. कच्च्या आवडत नसतील तर भाज्याही थोड्या परतून घ्याव्यात. मग तव्यावर सॉस च्या बाटलीत भरलेले बॅटर घेऊन उभ्या आडव्या रेषा मारून जाळीदार डिझाईन बनवावे. त्यावरुन तेल सोडावे. लगेच त्यावर पनीर, भाज्या घालाव्यात. आता आपली पिठाची खालची बाजू मस्त क्रीस्पी झाली असेल आणि सुटलीही असेल. मग त्याचा उलथण्याने अलगद गुंडाळून रोल बनवून घ्यावा. हा रोल सर्व्हिंग डिश मध्ये काढून मेयोनीज आणि केचप मिक्स करून त्याचे सोप्पे डिप बनवावे आणि त्यासोबत सर्व्ह करावा.
वैशिष्ट्य :
हे रोल्स दिसायला खूपच आकर्षक दिसतात. शिवाय बनवायला फारसे कष्ट लागत नाहीत. मोहरीचा स्वाद आणि खमंगपणा यामुळे वेगळीच सुंदर टेस्ट येते. पनीर आणि सलाड तर आरोग्यासाठी उत्तमच असते. बेसनाचा सोनेरी जाळीदार क्रीस्पी पिंजरा आणि त्यात पांढरे पनीर, लाल.. हिरव्या सिमला मिरच्यांचे पातळ लांब लांब काप यामुळे इतकी सुरेख दिसते ही डिश, की पाहून खाण्याचा मोह आवरणे केवळ अशक्यच ! लाल सिमला मिरची ऐवजी बिटांचे पातळ स्लाईस घातले तरी चालतात. वरून चटपटीतपणासाठी आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस आयत्यावेळी वरून घालावा किंवा चाट मसाला भुरभूरावा.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800