पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये १९८३-८४ साली पत्रकारितेचा अभ्यास करतानाच्या ज्या काही गोड आठवणी आहेत, त्यातील बऱ्याचशा आठवणी या, आज एकपात्री हास्य कलाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या बंडा जोशी याच्याशी संबंधित आहे. आज बंडा चा वाढदिवस (कितवा ते विचारू नका!😀) त्या निमित्ताने हा लेखन प्रपंच. बंडा ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
आम्ही १९८३-८४ साली रानडे इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकारितेचा अभ्यास करताना, सर्वच जण काही नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आलेलो नव्हतो. तर आमच्यातील काही जण हे नोकरी, व्यवसाय करीत शिक्षण घेणारे होते. आमचे एक वर्ग मित्र वसंतराव शिंदे यांचे स्वतःचे सहारा नावाचे वृत्तपत्र होते. सुनील कडूसकर हा टेलिफोन खात्यात ऑपरेटर म्हणून काम करीत होता. एक पेंढारकर म्हणून, ते ही कुठे तरी नोकरी करीत असत. आणि आम्हा सर्वांमध्ये प्रिय असणारा, बंडा जोशी हा तर चक्क पुणे आकाशवाणी केंद्रात पूर्ण वेळ निवेदक म्हणून काम करीत असे.

पुणे आकाशवाणी केंद्रात पूर्ण वेळ निवेदक म्हणून काम करणे, इतकेच काही बंडाचे वैशिष्ट्य नव्हते. तर आम्हा मित्रांसाठी त्याचे विशेष वैशिष्ट्य होते, ते म्हणजे आमच्या वयातील आणि अन्य प्रकारचे अंतर विसरून बंडा एकेक असे काही किस्से, अशा पद्धतीने सांगायचा की सर्व जण तो असतानाच नाही, तर इतर वेळीही ते किस्से आठवून हसत राहायचो.काही किस्से तर माझ्या अजूनही लक्षात आहेत !
बंडा,पुणे आकाशवाणीत निवेदक होता, पुढे आपली आवड ओळखून त्याने आकाशवाणीची पूर्णवेळची सरकारी नोकरी सोडण्याची हिंमत करून पूर्णवेळ लोकांना हसविण्याचा धंदा अंगिकारला तरी त्याच्या घरी काही साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण असे काही नव्हते. तर कोल्हापूर येथे जन्मलेल्या बंडाच्या वडिलांचे चक्क किराणा मालाचे दुकान होते. या किराणा मालाच्या दुकानाचा बंडाला एक फार मोठा उपयोग मात्र झाला, तो असा की, दुकानात पुड्या बांधण्यासाठी म्हणून जे कागद येत असत, ते सर्व बंडा ला आपसूक वाचायला मिळत. यातूनच त्याला वाचनाची आणि पुढे लिखाणाची गोडी लागत गेली. त्यात परत बंडाची वाचनाची आवड लक्षात घेऊन त्याच्या मामांनी त्याच्यासाठी वाचनालयाची फी भरून त्याला वाचनालयाचे द्वार कायमचे उघडून दिले. तिथे बंडा रोज एका तरी पुस्तकाचा फडशा पाडत असे.
पुढे महाविद्यालयीन जीवनात बंडा कविता लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकात भाग घेऊन आपल्यातील कलागुण दाखवू लागला. या काळात त्याला महाविद्यालयातील प्रा. शेठ सरानी खूप प्रोत्साहन दिले, असे बंडा आजही कृतज्ञतेने सांगतो. शेठ सरांची पत्नी सारखी आजारी असायची, अशा वेळी बंडा सरांच्या घरी जाऊन, त्या गुरू माऊलीला काही काळ तरी हसविण्याचे पुण्यकर्म करीत असे.
पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंडा ने काही काळ किर्लोस्करवाडीत नोकरी केली. पण त्याच्यातील कलाकार काही त्याला गप्प बसू देत नव्हता. म्हणून त्याने पुणे येथे कामगार कल्याण केंद्रात काही वर्षे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचे काम पाहिले. याच दरम्यान बंडाच्या एका कवितेला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूत थोर गायक सुधीर फडके यांच्या हस्ते झाला. तेव्हापासून बंडाची उमेद वाढली. त्याच्या मनात पूर्ण वेळ आकाशवाणी केंद्रात निवेदक व्हायची इच्छा जागृत झाली. नेमकी त्याच दरम्यान आकाशवाणी केंद्रात निवेदक हवेत, म्हणून जाहिरात आली होती.बंडाने निवेदक होण्यासाठी कसून तयारी केली. त्याचे फळ म्हणजे जवळपास १ हजार स्पर्धकांमधून बंडाची निवेदक म्हणून निवड झाली. बंडाच्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू झाले. या नोकरीच्या काळात बंडाला पु ल देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पुरुषोत्तम दारव्हेकर अशा थोरामोठ्यांचा सहवास लाभला आणि बंडाचे व्यक्तिमत्व फुलत गेले.

आकाशवाणीत असताना बंडा जोशी सादर करायचा ते “सुप्रभात”, ’आरसा’, ’हसवाहसवी’ असे कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले.
आकाशवाणीत असतानाच बंडाने “हास्यपंचमी” हा एकपात्री प्रयोग सुरु केला. अतिशय निर्मिश, कुणाच्याही भावना न दुखवणारा, सर्व कुटुंबाने एकत्र पाहून आनंद घेणारा, विनोद म्हणजे चित्रविचित्र अंग विक्षेप असे समीकरण खोडून काढणारा असा हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय होऊ लागला.बंडा ला कार्यक्रम सादर करण्यासाठी गावोगावीची निमंत्रणे मिळू लागली. पुढे ही निमंत्रणे इतकी वाढली की,आकाशवाणीतील निवेदकाची नोकरी करून सर्व ठिकाणी जाणे अशक्य होऊ लागले आणि म्हणून शेवटी बंडाने सरकारी नोकरी सोडली.

आकाशवाणीची नोकरी सोडल्यावर पुढे बंडा ने कधीच मागे वळून पाहिले नाही. ई टीव्हीच्या ’हास्यरंग’, साम वाहिनीच्या ’नववर्ष २०११’, दूरदर्शनच्या ’पुणेरी पुणेकर’, ’नाट्यावलोकन’, बालचित्रवाणी, कंट्रीवाईड क्लासरुम, अशा अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. तर ठाणे, क-हाड, सासवड साहित्य संमेलनात हास्यकवी म्हणून भाग घेऊन चांगलीच लोकप्रियता मिळवली. पहिल्या मराठी हास्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्याला मिळाला.


बंडाच्या ’हास्यपंचमी’ या एकपात्री कार्यक्रमाचे आतापर्यंत जवळपास ५ हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. तर “खळखळाट” या एकपात्री कार्यक्रमाचेही शेकडो प्रयोग झाले आहेत. ‘खळखळाट’ हा हास्यकविता आणि विडंबन गीतांचा कार्यक्रम अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

बंडा ला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहेत. त्यातील काही महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट नाट्य समीक्षणासाठी २००९ मध्ये ’माधव मनोहर’ पुरस्कार, २०१२ मध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, २०१४ मध्ये सुखकर्ता पुरस्कार आदी होत.
पु.लं.च्या शैलीत लेख लिहिण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याच्या लेखाची सर्वोत्कृष्ट लेख म्हणून निवड झाली होती.काही काळ बंडा ’आम्ही एकपात्री’ या संघटनेचा अध्यक्षही होता.

कोरोनाच्या काळात सर्व जग दुःखात बुडालेले असताना बंडा ने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विनोद, किस्से, विडंबने सादर करून त्रासलेल्या हजारो, लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

असा हा सर्वांच्या जीवनात हास्य पेरणारा आमचा मित्र, पुढील १०० वर्षे तुम्हाआम्हाला हसवत राहो, हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800