“ती”, १४ वर्षे !
जळगावात ब्रुक बाॅन्ड कॉलनीत आम्ही जवळजवळ १४ वर्षे राहिलो. आमच्या सहजीवनातली ही १४ वर्ष खूप महत्त्वाची होती. आयुष्यातला तो एक अत्यंत महत्त्वाचा काळ होता. दगदगीचा, खूप धावपळीचा, सुंदर भविष्याचा भक्कम पाया रचण्याचा, पैसे मिळवायचा, साठवायचा, आणि त्याहीपेक्षा मुलींच्या संगोपनाचा.
ज्योतिका नंतर चार वर्षांनी मयुराचा जन्म झाला. एक मोठ्या डोळ्यांचं, डोक्यावर विरळ जावळ असलेलं, गुलाबी रंगाचं, गुबगुबीत गोंडस बाळ बघून आम्ही दोघेही हरखून गेलो होतो. तिच्या जन्माच्या वेळेची एक गंमत सांगते. प्रसूती झाल्यानंतर डॉ कणबूरांंनी (त्यावेळचे ठाण्यातले नामांकित स्त्रीरोगतज्ञ) मला कितीतरी वेळ “मुलगा की मुलगी” हे सांगितलंच नाही. नंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ”पहिली मुलगी आहे ना तुम्हाला ?”
“ हो !”
“ मग आता काय वाटतं ?”
“डॉक्टर मला अगदी छान वाटतंय. एकच सांगा माझं हे दुसरं कन्यारत्न कसं आहे ? सर्व ठीक आहे ना ?”
डॉ कणबूर ज्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यावरूनच मी ओळखलं होतं “मला देवानं आणखी एक छान कन्या दिली आहे”. संपूर्ण नऊ महिन्याच्या गर्भारपणात आमच्या दोघांच्याही मनात “आता मुलगाच व्हावा” असा कधीही विचार आला नव्हता पण त्या लेबर रुममध्ये थकलेल्या अवस्थेतही मला, “अजूनही काळ बदललेला नाही. मुलीच्या जन्माचा आनंद सोहळा होत असल्याचाचा अनुभव डॉ कणबुरांनाही अभावानेच आला असेल म्हणून ते असे काठाकाठावरून माझ्याशी बोलत असावेत” असा विचार आला आणि माझे मन नाराज झाले. जेव्हा माझ्या चेहऱ्यावरचं खुलं हास्य, आनंद त्यांनी पाहिला, तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन केलं.
त्यावेळचा आणखी एक लक्षात राहिलेला क्षण म्हणजे चार वर्षाच्या ज्योतिकाची निरागस भाबडी प्रतिक्रिया. विलास तिला घेऊन भेटायला आला तेव्हा मला अशी हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली पाहून तिला बिलकुल आवडलं नाही. ती लगेच रडवेल्या सुरात म्हणाली, “बाबा मम्मीला आपल्याबरोबर घरी घेऊन जाऊया. हिलाही घेऊन जाऊया. इथे काय करताहेत या दोघी ?”
तिचे ते चिंतातूर बाळबोल ऐकून आम्हाला दोघांनाही खूपच हसू आलं. पालकत्वाची खरी सुरुवात त्या क्षणापासून सुरू झाल्यासारखे वाटले. आत्तापर्यंतचं पालकत्व हे प्रायोगिक होतं. आता काही अनुभवांचं ॲप्लीकेशन करण्याची वेळ आली आहे असेही वाटलं तेव्हा. आनंदाबरोबरच जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली.
दोन भिन्न वयाची, प्रकृतीची, स्वभावाची, आवडीनिवडीची मुलं वाढवताना पालकत्व म्हणजे काय याचे विविध धडे शिकायला मिळत होते. खरं म्हणजे बालसंगोपनाची मी भरपूर पुस्तके वाचली होती पण पुस्तक आणि प्रात्यक्षिक यात जमीन आसमानाचे अंतर असावे हे तेव्हाच कळलं. “चूक असेल की बरोबर असेल“ पण माझ्या मुलींना वाढवताना नकळतच मी माझी स्वतःची अशी एक चाईल्ड थीअरी निर्माण केली होती. त्यातला पहिला मुख्य मुद्दा होता तो “प्रेमाची समान वाटणी, कुणाच्याही मनात न्यूनगंड न यावा याची बाळगलेली सावधानता, एकीला एक वागणूक तर दुसरीला थोडी झुकती, किंवा ‘तू मोठी ही लहान’” असा भेद निर्माण करणाऱ्या पालकत्वाचा अवलंब चुकूनही करायचा नाही हे मनाशी पक्क ठरवलं होतं. तरीही दोघींच्या प्रतिक्रिया मला कधी कधी गोंधळात टाकायच्या. ज्योतिका नेहमीच शांतपणे माझं ऐकून घ्यायची. मयुराचा बाणा थोडा वेगळा असायचा. ती तिचे मोठे पाणीदार डोळे रोखून माझ्याकडे पहायची. तेव्हा तिने न बोललेलेच मला कळून जायचे.
”असं काय माझं चुकलं ?
मी नाही भिंतीकडे तोंड करून उभी राहणार. मला नाही आवडत ते.”
दोघींच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. त्यांना हसतखेळत वाढवताना आणि त्या वाढत असताना, त्यांच्यासाठी सुखाची दारं उघडून देताना कधी नियमबद्ध शिस्त तर कधी नियमांना शिथील करून काही निर्णय घेताना आम्हा दोघांची खूप दमछाक व्हायची. शिवाय प्रत्येक वेळी आम्ही दोघं मुलींच्या बाबतीत एकाच रेषेवर असायचो असंही नाही. विलास मुलींच्या बाबतीत अत्यंत हळवा. कित्येक वेळा तर मुलींच्या डोळ्यात अश्रू जमले की याच्याच डोळ्यातून पाणी गळायला लागायचं. (आजही ते तसंच आहे!) अशावेळी माझं त्यांच्यावर रागावणं, त्यांचा कसकसून अभ्यास घेणं, करच, केलंच पाहिजे, आलंच पाहिजे, येईलच. या ‘च ला च” नियम रेषा आणि त्यामुळे नकळत दुखावली जाणारी मुलींची मनं पाहून तो माझ्याच विरोधात जायचा. असं असूनही मुली माझे नियम तोडायच्या नाहीत पण ‘बाबा’ त्यांना जास्त जवळचा वाटायचा. त्यांचा मानसिक आधार म्हणजे ‘बाबाच’ होता. त्यांच्या सुखासाठी, भविष्यासाठी, आज त्यांना कळत नाही याचं महत्त्व म्हणून कशाकशासाठी मी झटत होते, ते माझं झटणं हे या हळव्या बापाच्या प्रेमापुढे नगण्य, विनाकारण, नको तेवढं कठोरपणाचं होतं.
कोण बरोबर होतं ? माझ्यातली तळमळणारी आतुरलेली चिंतातुर ‘आई’ की कुठल्याही परिस्थितीत फूल कोमेजूच न देणारा त्याच्यातला ‘बाबा’ याचे उत्तर मला आजही मिळालेलं नाही. त्यावेळी मला माझं आणि माझ्या पप्पांचं नातं आठवायचं आणि इतिहासाची कशी पुनरावृत्ती होते हे जाणवायचं.
जणू काही कौतुकाचे बोलू कानात साठवण्याचेही ते दिवस होते. ज्योतिका शिशुवर्गात असताना एका तोंडी परीक्षेत तिला आईचे नाव विचारले तेव्हा तिने उत्तरच दिले नाही. तिचा एक गुण कमी झाला. मी तिला विचारले, ”तू आईचं नाव का नाही सांगितले ?”
मम्मी तुझं नाव बिंबा.
ते कसं सांगू ?
मिस हसली असती ना?”
घरी मला माहेरच्याच ‘बिंबा’ या नावानेच हाक मारतात. राधिका हे नाव फक्त कागदोपत्री. ज्योतिकाच्या या उत्तराने मला हसू आले आणि मी अचंबितही झाले. मुलं किती खरं बोलतात !
मयुरा तर शब्दरचनेत फारच गंमतीदार होती. आजही आहे. एकदा आम्ही गणपती विसर्जन बघायला दादर चौपाटीवर गेलो होतो. मयुरासाठी हे पहिलेच सागरदर्शन होते. तो अथांग सागर पाहून ती अगदी प्रतिक्षिप्तपणे चित्कारली, ”बाबा ! पाणाss”
खूप पाणी असं अनेकवचनात तिला पाणी म्हणायचं असेल. पण तिचं ते उत्तेजित होऊन ‘पाणा’ म्हणणं आजही कानात रुणझुणतं.
कधी कधी मागे वळून बघताना माझ्या पालकत्वातल्या चुका माझी मीच शोधत राहते. माझ्या हृदय पटलावर मुलींच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी आज पर्यंतचे त्यांचे हसरे, अचंबित, व्यथित, आनंदी, अमान्यतेतले, विरोधातले चेहरे कोरलेले आहेत आणि हे सारे चेहरे सुप्तपणे माझ्याशी आजही संवाद करतात.
आता कधी मी माझ्या नातीच्या बाबतीत मुलींना काही विरोधात बोलले, तर त्याच उलटून मला म्हणतात,
”मम्मी तूच तर आम्हाला हेच सांगत आलीस ना ?” मुलींच्या बाबतीत एक आणि नातींच्या बाबतीत एक असं का व्हावं ? हाही एक गूढ प्रश्नच आहे नाही का ? रंग प्रेमाचे निराळे.
पण तो जो काही आयुष्याचा एक लांबलचक टप्पा होता तो मात्र खूप महत्त्वाचा होता हे नक्कीच. सुखाचा, आनंदाचा तर तो होताच पण त्याचबरोबर तणावाचा, दडपणाचा, धाकधुकीचाही होता. एकेका वळणावरचे निर्णय घेताना पुढे पाऊल टाकतानाचा तो काळ धपापवणारा होता.
पण १४ वर्षाचा ब्रुक बाॅन्ड कॉलनीतल्या वास्तव्याचा काळ खरोखरच सुंदर आणि आधारभूत होता. तो एक संयुक्त परिवार होता म्हणाना ! घराघरात साधारण एकाच वयाची मुलं वाढत होती आणि ती सारीच मुलं एखाद्या कुटुंबातली असावीत तशी एकत्र खेळत, बागडत, शिकत मोठी होत होती. सुचु, बाली, अनु, पंकज, चेतन, केतन, योगेश, पराग, मकु आणि त्यांच्यात माझ्या ज्योतिका, मयुरा अतिशय चांगल्या पद्धतीने रमल्या होत्या. त्यांची परिपूर्ण मानसिक वाढही होत होती. कॉलनीत होणारे गणपती, दहीहंडी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी, संक्रांत, होळी या सारखे सण त्यांच्यावर परंपरेचे सुसंस्कार घडवत होते. मैत्रीतून, रुसव्याफुगव्यातून, एकमेकांशी भांडणातूनही ही मुलं आपोआपच शेअरिंगही शिकत होती. मुलांना फक्त आई-वडील घडवत नसतात तर अगदी बालपणापासूनच समाजही घडवत असतो. ब्रुक बाॅन्ड कॉलनीच्या निमित्ताने माझ्या मुली नेहमीच एका चांगल्या समाजाला जोडल्या गेल्या होत्या त्यामुळे त्यांचं शरीराबरोबर मनही निरोगी होत होतं. आयुष्यातली केवढी मोठी जमेची बाजू होती ही ! त्यावेळी मला माझं स्वतःचं धोबी गल्लीतलं बालपण आठवायचं आणि तशाच प्रकारचे रम्य बालपण माझ्या मुलींनाही मिळाल्याचं सुख मी अनुभवायची.
खाच खळगे, टक्केटोणपे कोणाच्या जीवनात नसतात ? टंचाई, उणीव, कमतरता, मनोभंग, फसवणूक, विश्वासघात कधी ना कधी सर्वांच्या वाटेला येत असतात. जीवनातली कधी कधी भेडसावणारी असुरक्षितता, अस्थैर्य, संकट काळ, अपघात, दुखणी, भावनिक वादळं यातून प्रत्येकालाच जावं लागतं. वादळं येतात, वादळ जातात. उरलेला पालापाचोळा ही विरून जातो पण जीवनाचा जमा खर्च मांडताना जेव्हा जमेची बाजू वरचढ असल्याचं लक्षात येतं तेव्हा सारे दुर्भोग आपोआपच विस्मरणात जातात हेच खरं आणि जीवनाच्या जडणघडणीतले हेच मोती असेच चमकत राहतात.
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800