रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर हे निसर्गसंपन्न गांव. नवसाला पावणारा ईच्छापूर्ती करणारा श्री महागणपतीचे पेशवेकालीन मंदिर असलेले गांव, पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांच्या स्वप्नांत येऊन, “मी देवतळ्यात पालथा पडलेला आहे मला बाहेर काढून माझी स्थापना करावी” असा दृष्टांत दिल्यावर या गणपतीच्या मुर्तीला बाहेर काढून पुन्हां स्थापना केली. प्रत्यक्ष पेशव्यांनी दिलेली ही मुर्ती तिळातिळाने मोठी होते अशी अख्यायिका आहे. २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज सरकार विरुद्ध जंगल सत्याग्रह झाला होता त्यावेळी निःशस्त्र स्थानिक सत्याग्रहींवर बेछुट गोळीबार केला गेला त्यात काही सत्याग्रही मृत्युमुखी पडले त्या उठावाची आठवण म्हणून तेथे वीरगति प्राप्त झालेल्या योध्यांची स्मारके उभी आहेत. मंदिरातील गजाला बंदूकीची गोळी लागली होती तो गज आजही पहायला मिळतो. मंदिराशेजारी देवतळे नांवाचे तळ आहे (देवाचे तळे) आहे.

असा निसर्गरम्य परिसर लाभलेल्या चिरनेर या गावात कवयित्री श्रीमती मंजुळा गजानन म्हात्रे, वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांच्या पहिल्याच “मंजुळाक्षरे” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे पी पी खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
श्री पी पी खारपाटील यांचे शुभ हस्ते तथा श्री एल बी पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री भास्कर मोकल, श्री संतोष ठाकूर, श्री वैभव धनावडे, श्री सुनील चिटणीस, सौ सलोनी बोरकर, सौ स्मिता हर्डिकर, श्री अलंकार परदेशी, श्री लालसिंग वैराट, श्री राजाशेठ खारपाटील, श्री संजय पाटील, श्री अरुण पाटील, सौ वैशाली कदम या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दिमाखदार झाला. अनेक साहित्य रसिकजन या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गझलकारा सौ स्मिता हर्डिकर यांनी निवेदिका म्हणून कार्यक्रमाला साजेसं निवेदन केलं. श्री अनील नारंगीकर यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थित सर्वांना अल्पोपहार तसेच ‘मंजुळक्षरे’ काव्य संग्रहाची प्रत भेटी दाखल देणेत आली.
कवी लेखक श्री सुनिल चिटणीस यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना मंजुळताईंनी एकाच काव्य संग्रहावर न थांबता आपली लेखणी झरत ठेऊन आणखी काव्यसंग्रह प्रकाशित करावेत असे आवाहन केले.

कवयित्री सौ सोनाली बोरकर यांनी मंजुळाक्षरे या काव्य संग्रहातील दोन रचना उत्कृष्ठ सादर करून मंजुळाताईंना शुभेच्छा दिल्या. साहित्यसंपदा प्रकाशनाचे श्री वैभव धनावडे हे आधारडासारखे तुमच्या पाठीशी उभे रहातील ही ग्वाही दिली.
श्री सुनिल चिटणीसांनी स्वरचित ‘मंजुळक्षर’ ही कविता सादर करून तिची लॅमिनेटेड प्रत तसेच पिंपळपान, सप्तरंग, पापणपंखी व शब्द दरवळ ही स्वलिखित चार पुस्तके श्रीमती मंजुळा म्हात्रे यांना भेट दिली.
श्री लालसिंग वैराट यांनी मंजुळक्षरे काव्यसंग्रहातील पोवाडा पहाडी आवाजात सादर करून रसिकजनांकडून वाहवा मिळवली. अत्यंत आनंदात व उत्साहात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800