भारतभूमीपासून हजारो मैल दूर, अमेरिकेच्या शिकागो शहरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी जल्लोष साजरा होत असताना, एकीकडे तिरंग्याला मानाची सलामी दिली जात होती आणि दुसरीकडे ‘ज्ञानोबा-माउली-तुकाराम’चा गजर आसमंतात घुमत होता. परंपरा टीम मधील सभासदांनी पालखी समोर ढोल ताशाच्या गजराच्या तालावर धरलेला फेर, खेळलेल्या फुगड्या लोकांचे प्रमुख आकर्षण बनले होते. आशिया मेडिया वार्ताहरांनी तर फुगड्यांचे आणि फेराचे पुन्हा पुन्हा चित्रफित केली.
शिकागो आणि उपनगरांतील भारतीयांनी साजरा केलेला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा यंदा एका विशेष कारणासाठी अविस्मरणीय ठरला – तो म्हणजे शिकागो महाराष्ट्र मंडळाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला नयनरम्य ‘पालखी’ सोहळा ! शिकागोच्या रस्त्यांवर भक्तिभावाने सजलेल्या पालखीसोबत पारंपरिक रीतीने, मराठमोळी मिरवणूक काढण्यात आली होती “माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंहि पैजा जिंके ।” (ज्ञानेश्वरी ६.१४)

शिकागो महाराष्ट्र मंडळाने स्वातंत्र्याच्या जल्लोषाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची एक सुंदर जोड दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे ७५० वे जयंती वर्ष, आणि याच औचित्याने मंडळाने माउलींच्या पालखीचा एक सुशोभित तयार केला होता, जो दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भव्य मिरवणुकांमध्ये सहभागी झाला. आळंदीच्या पवित्र भूमीतून प्रेरणा घेऊन, शिकागोच्या रस्त्यांवर पारंपारिक वारकऱ्याप्रमाणे गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, डोक्यावर पांढरी टोपी, घातलेल्या ज्ञानदेव माऊलींच्या भक्तांनी भक्तिभावाने सजलेली पालखी मिरवणूक काढण्यात आली.
बफेलो ग्रोव्ह येथे झालेल्या मिरवणुकीत शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व म्हणजे, या मिरवणुकीला इलिनॉय राज्याच्या ५९ व्या जिल्ह्याचे प्रतिनिधी (State Representative) श्री. डॅनियल डिडेच (Daniel Didech) यांनी आवर्जून उपस्थिती लावली. इतकेच नव्हे, तर बफेलो ग्रोव्ह शहराचे पोलीस आयुक्त आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीही या आनंदात सहभागी झाले होते.
श्री. डिडेच यांनी भारतीय समुदायाच्या उत्साहाचे आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या प्रेमाचे कौतुक केले. तत्पूर्वी माधवदादा गोगावले यांच्याकडून माऊलीच्या कार्याची महती समजावून घेतली. अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

सोहळ्याची सुरुवात बफेलो ग्रोव्ह उपनगरात आयोजित केलेल्या शानदार मिरवणुकीने झाली. सकाळच्या उत्साहपूर्ण वातावरणात, भारतीय नागरिक तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शिकागो महाराष्ट्र मंडळाची ‘माउलींची पालखी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या पालखीने केवळ महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचे दर्शन घडवले नाही, तर अमेरिकेत वाढणाऱ्या नव्या पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देण्याचे मोलाचे कार्यही केले.
दिवसाचा मोठा कार्यक्रम शॉम्बर्ग येथील ‘नॅशनल इंडिया हब’ येथे दुपारी ४:३० वाजता आयोजित करण्यात आला होता. हे ठिकाण भारतीय समुदायासाठी एक सांस्कृतिक केंद्र बनले आहे. या ठिकाणी अक्षरशः जनसागर लोटला होता. अंदाजे ३ ते ४ हजार भारतीय नागरिक या सोहळ्यासाठी जमले होते आणि भारतभूमीच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. संपूर्ण परिसर तिरंग्याच्या तीन रंगांनी आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेला होता.
नॅशनल इंडिया हब’मधील कार्यक्रमात देशभक्तीपर गीतगायन, पारंपरिक नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भारतीय खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समधून येणारा खमंग सुवास आणि सोबतीला देशभक्तीच्या गीतांचे सूर, यामुळे संपूर्ण वातावरण एखाद्या जत्रेसारखे झाले होते.

या उत्सवी वातावरणात, मराठी संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य असणारा सोहळा, माउलींची पालखी म्हणजे जणू काही शांततेचा, ज्ञानाचा आणि भक्तीचा संदेश देणारी एक शीतल लहर होती. महाराष्ट्राचं आद्य दैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माउली -“विठू माउली” श्री ज्ञानेश्वर माउलींनी जिच्या चरणी संपूर्ण जगासाठी पसायदान मागितले, त्या ज्ञानेश्वरांची प्रतिमा जमलेल्यांना एक चेतना देत होते. अनेक भक्तगण पालखी जवळ येऊन माऊलींचे दर्शन घेत होते. दुपारचे रणरणतं ऊन, घाम गाळणारं तापमान मधेच पडलेल्या मुसळधार पावसामुळे देखील लोक मिरवणुकीत सहभागी होण्यापासून परावृत्त झाले नाही. जस जसा पाऊस जोरात येत होता तस तसा ढोल ताशा पथक तितक्याच जोरात वाद्य वाजवीत होते. अशा पावसाला न जोमानता पालखी व ढोल ताशा पथक आपल्या मार्गावर पुढे पुढे वाटचाल करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचं समाधान दिसत होतं.

ह्या कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनाचे श्रेय श्री माधवदादा गोगावले आणि त्यांची टीम, नमिताताई वेदक, उर्मिला दामले, मनोज भट यांना जाते. ढोल ताशा पथकाचे नेतृत्व श्री अनिरुद्ध दामले यांनी केले. लेक काऊंटी इंडियन असोसिएशन येथे महाराष्ट्रातील प्रतापगडाचा अप्रतिम देखावा पल्लवी बेटसूर आणि अश्विनी कुंटे यांनी सजविला होता. प्रतापगड किल्ला महादेव व मनीषा दिवेकर यांनी केला होता. किल्ल्यावर ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. माऊलींची पालखी दीपा सावंत व नरसिंम्हा कामत यांनी केवळ तीन दिवसात तयार केली आणि आकर्षक अशी सजवली होती.

पालखीचे भोई माधवदादा गोगावले, श्रीदत्त राऊत, नरसिंम्हा कामत आणि मनोजदादा भट होते. विशेषत: युवा पिढीतील जतिन जाधव, सोहम व श्लोक आगाशे, श्री रेगे, साना कुळकर्णी, सिया जोशी उत्कृष्ट- ढोलताशा वाजवत होते.
ह्या कार्यक्रमात सोहम जोशी, विक्रांत जाधव, धनेश नार्वेकर यांनी प्रथमच ढोल ताशा वाजवून सर्वांना प्रभावित केले. मंडळातील अनेक ज्येष्ठ नागरिक श्वेता व विष्णू महाडेश्वर, श्रीधर दामले, माधवदादा गोगावले, रेखाताई व सुभाषकाका देवधर, अल्काताई रिसवाडकर, अनिताताई गोडबोले, प्रकाशकाका अंतुरकर, अनुपमाताई भट, नमिताताई व डॉ. चंद्रा वेदक, आशाताई खासबागे व इतर पालखी सोहळ्यामध्ये भक्ती भावाने तल्लीन झाले होते. नेहमीप्रमाणे उल्का नगरकर सर्वांना प्रोत्साहन देत होत्या.
शिकागो महाराष्ट्र मंडळाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, देह जरी परदेशात असला, तरी मन आणि आत्मा कायम भारतभूमीच्या आणि आपल्या समृद्ध परंपरेच्या चरणी लीन आहे.शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या सहभागामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि संत परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचवण्यात आला.
भूतां परस्परें पडो ।
मैत्र जीवाचें ।।
— संकलन : श्रीदत्त राऊत. शिकागो
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

मी पण तुमच्या. मताचीच या बाबतीत !
Goood excellent efforts Mitra I proud of you
वाह वा! अभिमानास्पद 👍👌💐💐
जय जय महाराष्ट्र माझा