Wednesday, December 3, 2025
Homeसाहित्यश्रेष्ठ हिंदी साहित्यिक : १

श्रेष्ठ हिंदी साहित्यिक : १

सुमित्रानंदन पंत

नमस्कार मंडळी.
आज पासून आपण दर बुधवारी “श्रेष्ठ हिंदी साहित्यिक” ही लेख माला सुरू करीत आहोत. ही लेखमाला प्रा. डॉ. एम. डी. इंगोले. हिंदी विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड, जिल्हा परभणी हे लिहिणार आहेत. इंगोले सर सातत्याने लेखन करीत असतात. आता पर्यंत त्यांची ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.यापूर्वी त्यांच्या बातम्या आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध होत आल्या आहेत. आता लेखमालेच्या निमित्तानं ते आपल्याला दर बुधवारी भेटत राहतील.

ही लेखमाला मराठी आणि हिंदी मधील एक सेतू बनण्याची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
— संपादक

हिंदी साहित्यातील छायावादी छायावादी कालखंडाचे आधारस्तंभ सुप्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म: २० मे १९०० मध्ये उत्तर प्रदेशातील अलमोडा जिल्ह्यापासून ३२ मैलावर असलेल्या ‘कौसानी’ नावाच्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या गावात झाला. “त्यांची आई ‘सरस्वती देवी’ पंत च्या जन्मानंतर सहा तासातच मृत्यू पावली. त्यामुळे पंत यांना त्यांच्या जन्मापासूनच मातृ वियोग सहन करावा लागला.

पंत यांचे संगोपन त्यांच्या आत्याने केले. ते लहानपणी शांत स्वभावाचे होते. बाल सुलभ चंचलता त्यांच्यात नव्हती. खेळाकडे त्यांचा कल नव्हता.” त्यांचे वडील ‘गंगाधर पंत’ त्यांच्या गावातील मोठे जमीनदार होते. त्यांची चहाची बागायती शेती होती. तसेच लाकडाची ठेकेदारी होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कौसा आणि व अलमोडा येथील सरकारी हायस्कूलमध्ये झाले. काशी येथील जय नारायण हायस्कूल मधून त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते प्रयागराजच्या ‘म्योर सेंटर कॉलेज’ मध्ये गेले परंतु १९२१मध्ये असहकार चळवळ सुरू झाल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले. “पंत केवळ संवेदनशील कवीच नव्हते तर ते एक प्रखर देशभक्त पण होते.” त्यामुळे स्वातंत्र्याच्या महायज्ञामध्ये सहभागी होणे त्यांना क्रमप्राप्त वाटले. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांचे शिक्षण त्यांना स्थगित करावे लागले.” त्यानंतर त्यांनी तीन वर्षे इंग्रजी साहित्य, वेद, उपनिषद, रामकृष्ण, विवेकानंद, रामतीर्थ यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. तसेच बांगला साहित्य आणि संस्कृत काव्यांचा त्यांनी अभ्यास केला. पुढे ते मद्रास आणि पांडिचेरीलाही गेले.

सुमित्रानंदन पंत यांचे बालपण कौसानीच्या चहुबाजूनी पसरलेल्या पर्वतीय नैसर्गिक सौंदर्याच्या कुशीत व्यतीत झाले. याच निसर्ग सौंदर्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. बाल सुलभ साधेपणा व सरळ स्वभाव आणि स्त्रियांसारखी कोमल व नाजुकता तसेच पुरुषांसारखी सहज गंभीरता इत्यादी गुणांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू म्हणून सांगता येतील. त्यांच्यावर पाश्चात्य सौंदर्य सौंदर्यवादी कवींचा, मार्क्सच्या विचारांचा तसेच गांधीवाद, अरविंद दर्शन व वैदिक दर्शन इत्यादींचा प्रभाव दिसून येतो.

सुमित्रानंदन फक्त यांनी अनेक काव्य ग्रंथ लिहिले. उच्छवास, वीना, ग्रंथी, पल्लव, गुंजन, युगांत, युगवानी, ग्राम्या, स्वर्णकिरण, स्वर्णधुली, युगांतर, युगपथ, उत्तरा, प्रतिमा इत्यादी त्यांच्या काव्यकृती आहेत. याच बरोबर त्यांनी ‘हार’ ही कादंबरी व ‘पांच कहानियां’ हा कथासंग्रह लिहिला. तद्वतच त्यांनी ज्योत्सना, रंजन शिखर, शिल्पी, उत्तरशती अशी रूपके आणि परी, क्रीडा, राणी इत्यादी नाटके लिहिली. गद्यपाठ, साठ वर्ष, एक रेखांकन, शिल्प आणि दर्शन, आत्मकथा आणि निबंध लिहिले. ‘मधुज्वाला’ या नावाने त्यांनी उमर खैयाम यांच्या रुबाईंचा हिंदी अनुवाद केला. ‘रूपांभ’ या पत्रिकेचे संपादन पंत यांनी केले.

आकाशवाणी मध्ये अधिकारी म्हणूनही कार्य केले अशा या युगपुरुषाचा मृत्यू इसवी सन १९७७ मध्ये झाला.

पंतांविषयी असे सांगितले जाते की, “पंत हे निसर्ग सौंदर्याचे गायक होते.” त्यांच्या कवितेत नैसर्गिक सौंदर्याच्या प्रतीकांचे सुंदर समायोजन आहे. सुमित्रानंदन पंत ही कोमल भावनांचे कवी होते तसेच ते निसर्ग चित्रण करणारे श्रेष्ठ कवी होते. त्यांनी विना, पल्लव आणि गुंजन या काव्यसंग्रह मध्ये निसर्गाचे मनमोहक रूप व मधुर आणि रस पूर्ण चित्र अंकित केले आहे. त्यांच्या कवितेची मुख्य विशेषता आहे ‘कोमल कल्पना शक्ती’. पंत यांनी संध्या समयीचे सुंदर निसर्ग चित्र प्रस्तुत केले आहे.
“मासो का झूरमुट/
संध्या का झूटपूट/
हैं चहक रहीं मीडियां/
करती टी वी टी टुट कुट”

सुमित्रानंदन पंत हे जसे कोमल मनाचे कवी होते तसेच ते निसर्गप्रेमी कवी सुद्धा होते. त्यांनी निसर्ग सौंदर्य भावना आणि कल्पना यांचा सुंदर समन्वय केला आहे. त्यांचे निसर्गप्रेम उल्लेखनीय आहे,
“छोड द्रुमों की विदू छाया/ तोड प्रकृती से भी माया
बाले तेरे बाल जाल में/ कैसे ऊर्जा दू लोचन
छोड अभी से इस जगत को…”
वरील काव्यांच्या ओळी पंत यांच्या ‘विना’ काव्यसंग्रहातील आहेत. येथे कवीने निसर्गाच्या कोमलतेचे वर्णन केले. कवीला निसर्गाच्या सौंदर्य छटांसमोर बारा तेरा वर्षाच्या सुकोमल सुंदर किशोरीचे सौंदर्य सुद्धा महत्त्वही वाटते.

निसर्गाला मानवी रूपात प्रस्तुत करण्याचे कसब सुमित्रानंदन पंत यांच्या काव्य कुशलतेत आहे. त्यांचे हे कौशल्य प्रशंसनीय आहे.
उदा. “निले आसमान के शतदाल पर/ वह बैठी शारद हासीनी
निज कर्तल पर शशि मुख धर/ निरव अनिमेष एकाकीनी”

सुमित्रानंदन पंत यांनी हिमालयाचे सुंदर निसर्ग वर्णन ‘गुंजन’ मधील कवितेत साकारले आहे ते असे,
“अचल के जब वे मिल विचार अवनि से उठ उठकर उपर |
विपुल व्यापकता में अविकार लीन हो जाते वे सत्वर ||”

अर्थात हिमालयाच्या प्रदेशात हे दृश्य नेहमी बघावयास मिळते की रात्रीच्या वेळी जे ढग खड्ड्यांमध्ये भरतात ती सकाळच्या वेळी हळूहळू असंख्य तुकड्यांमध्ये विभक्त होऊन पर्वतांच्या वर इकडे तिकडे जाताना दिसून येतात व शेवटी आनंद आकाशात विलीन होतात.

तद्वतच कवी पंत यांनी हिमालयातून उद्गम पावलेल्या ‘गंगा’ नदीचे नैसर्गिक सौंदर्य वर्णन केलेले वाखाणण्याजोगे आहे पण त्यांनी गंगा या कवितेत आपल्या विशिष्ट भाषाशैलीत गंगा नदीचे सौंदर्य चित्र अंकित केले आहे. ते असे-
“अब आधा जल निश्चल पीला, आधा जल चंचल औ नीला,
गीले तन पर मृदु संध्या तप| सिमटा रेशम पट-सा ढीला!
ऐसे साॅंझ-प्रात, ऐसे चांदी के दिवस-रात,
ले जाती बहा कहाॅं गंगा! जीवन के युग क्षण किसे ज्ञात !
विश्रुत हिमपर्वत से निर्गत, किरणोज्वल चल कल ऊर्मि निरत
यमुना, गोमती आदि से मिल| होती यह सागर में परिणत !
यह भौगोलिक गंगा परिचित, जिसके तट पर बहु नगर प्रथित,
इस जड गंगा से मिली हुई | जन गंगा एक और जीवित |”
प्रस्तुत कवितेत कवीने गंगा नदीच्या उगमापासून ते त्रिवेणी संगमा पर्यंत तसेच समुद्रात समाविष्ट होण्यापर्यंतचे भौगोलिक नैसर्गिक आणि पौराणिक महत्त्वाचे चित्र रेखाटले आहे.

निसर्ग सौंदर्याची गायक म्हणून कवी सुमित्रानंदन पंत प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने निसर्गासाठी अर्पित केले. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मानवी जीवनाचे दर्शन घडले. त्यामुळे त्यांच्या काव्यात काही ठिकाणी निसर्ग आणि मानव यांचे विश्लेषण एकाच स्तरावर दिसून येते.
जसे- “नीले नभ के शतदल पर | वह बैठी शारद हासीनी |
मृदु करतल पर शशिमुख धर | निरव, अनिमेश, एकाकिनी |”

पण त्यांना निसर्गामध्ये मानवाच्या अनेक प्रतिमा दिसतात. कधी त्यांना बालकाची, बालिकेची, स्त्रीची तर कधी पुरुषाची प्रतिमा निसर्गामध्ये दिसते. त्यांनी खऱ्या अर्थाने प्रथमच स्त्रीचे मूल्यांकन केले. स्त्री ही समाजात हजारो वर्षापासून उपेक्षित होती. तिचे दैन्य, दुःख, वेदना पंत यांनी आपल्या कवितेत मांडली. त्यांनी स्त्रीला आई, सहचारिणी आणि प्राण असे संबोधले आहे. कविने,
“तुम्हारे छुने में था प्राण, संग में गंगा स्नान,
वाणी में त्रिवेणी की लहरों का गान |”

इत्यादी रुपात स्त्रीचे वर्णन केले आहे. त्यांच्या काव्यातील निसर्गसौंदर्य चित्रणात नारी भावना आणि रतीभावना दिसून येते.
“बिंदू में थी तुम सिंधु अनंत, एक स्वर में समस्त संगीत |
एक कलिका में अखिल वसंत, धरा में थी तुम स्वर्ग पुनीत ||”
तसेच निसर्ग सौंदर्यात कविला स्त्रीचे सौंदर्य दिसते. याचे सुंदर उदाहरण पुढीलप्रमाणे सांगता येईल,
“करुण भौहो में था आकाश, हास में शैशव का संसार |
तुम्हारी ऑंखों में कर वास, प्रेम ने पाया था आकार ||”

वरील ‘पल्लव’ मधील कवितेत कवीला प्रेयसीच्या भुवयांमध्ये आकाश आणि तिच्या हसण्यांमध्ये बालकाचे जग दिसते. तिच्या गालांमध्ये हृदयातील कोमल भाव आणि सरळ संकेतातील संकोचशील स्त्री हृदयातील सौंदर्य प्रकट होताना दिसून येते.

“गुंजन मध्ये स्त्री सौंदर्य निसर्ग सौंदर्य पेक्षा अधिक प्रभावीपणे कवीने चित्रीत केले आहे. कवीला निसर्गाच्या समस्त सौंदर्यात स्त्री सौंदर्याचे प्रतिबिंब दिसते. वास्तविक पाहता यामध्ये कवीच्या इतर भावनांपेक्षा येऊन भावना प्रामुख्याने दिसतात.”

बालकाच्या रूपात वायूचे सुंदर चित्र कवीने रेखांकित केले आहे. कवीने केलेले वायूचे मानवीकरण वाखाणण्याजोगे आहे.
“हरियाली से ढंक मृदु गात, कानों में भर सौ सौ बात,
हमें झुलाते हैं अविराम, विश्व पुलक से तरु के पात,
कुसुमित पलकों में अभिराम !”

अर्थात हिरवळीचे नाजूक शरीर झाकलेले आहे. वायु कानात अनेक गोष्टी सांगत आहे. हवा न थांबता झोका देत आहे. जगामध्ये रोमांचकारी वृक्षाची पाने आहेत. फुलांच्या पाळण्यात सुंदर बालक आहे. कवी पंत यांनी नैसर्गिक प्रतिकांची निर्मिती केली त्याचा प्रयोग कवी आपल्या काव्यात करताना दिसतात.
“देखूं सबके उर की गाली, किसने रे क्या क्या चूने फूल
जग की छवि उपवन से अकुल ? इस में कलि, किसलय, कुसुम शूल !”

कवी पंत म्हणतात की,
मी पाहू इच्छितो कोण माझ्या मनाची इच्छा पूर्ण करतो ? कुणी कोण कोणती फुले वेचली, जगाची शोभा ही असीम बाग आहे. त्यामध्ये नवीन फुटलेली पालवी आहे. कळ्या आहेत. फुले आहेत आणि काटे पण आहेत. कवी पंत यांनी येथे पालवी, कळी, फुले आणि काटे यांचे प्रतीक रूपाने मानवी जीवनाची अशा, उल्हास, आनंद आणि दुःख चित्रित केले आहे.

सकाळी दुपारी आणि सायंकाळी निसर्गाची छबी ही सातत्याने बदलत राहते. उषःकाली गवताच्या पात्यावर, पानावर, कळ्यावर आणि फुलावर पडलेले दवबिंदूचे चित्र कवी रेखाटतात-
“ओस बिंदू ! लघु ओस बिंदू नीले, पीले और हरे लाल
चंचल ताराओं से जल-जल, फैलाते शीतल सजल ज्वाला !”

‘युगवानी’ तील हे दवबिंदू वेगवेगळ्या रंगात निळे, पिवळे, हिरवे आणि लाल दिसतात. तसेच ते अत्यंत उज्वल, कोमल, चंचल आणि दोषमुक्त असतात. पाऊस ऋतुतील बदलत्या निसर्गाचे चित्रण कवी करतात.
“पावस ऋतु थी, पर्वत प्रदेश | पल-पल परिवर्तीत प्रकृति वेष |”

पावसाळ्यात निसर्ग क्षणाक्षणाला आपले रूप बदलत असतो. हे मूर्तिमंत उदाहरण होय. तसेच पावस ऋतु मध्ये श्रावणातील बरसणाऱ्या सरीचे वर्णन अत्यंत सजीव आहे.
“झम झम झम झम मेघ बरसते रे सावन के,
छम छम छम गिरती बूंदे तरुओं से छनके!
चम चम बिजली चमक रही छिप उर में घन के,
थम थम दिन के तम में सपने जगते मन के !”
‘स्वर्णधुलि’ मधील या काव्यात पावसाचे सजीव दृश्य व शब्दांमध्ये ध्वन्यात्मकता दिसून येते.
“गाता खग प्रांत: उठकर/ सुंदर सुखमय जग-जीवन
गाता खग संध्या तट पर मंगल, मधुयय जग-जीवन
हॅंसमुख प्रसून सिखलाते/ पलभर हैं, जो हॅंस पाओ”

प्रस्तुत ओळी ह्या पंत यांच्या ‘गाता खग प्रातः उठकर’ या कवितेतील आहेत. पंत असे म्हणतात, पक्षासारखा छोटासा जीव सुद्धा निसर्गाच्या क्षणा-क्षणाला बदलणाऱ्या रूपात स्वतःच्या जीवनाची मधुर आणि सुखद अनुभूती घेतो. पृथ्वीवरील लहानशा हसऱ्या फुलांना बघा पाऊस, बर्फ आणि उन्हाला सहन करून हसत मुखाने म्हणतात, जीवन क्षणभंगुर आहे. माहित नाही येणारा क्षण कसा असेल ? त्या क्षणी आपण असू अथवा नसो सांगता येत नाही ? जीवन क्षणभंगुर आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा जो क्षण आपल्याला मिळालेला आहे, जे क्षण मिळणार आहेत, त्या क्षणाचा उपभोग आपण आनंदाने घेतला पाहिजे.

कदाचित यामुळेच की काय छायावादी युगीन कवी वास्तविक जीवनापासून पलायन करून निसर्गसौंदर्यात रममान होताना दिसतात. पंत त्याला अपवाद असू शकत नाहीत. ते वास्तविक जीवनापासून दूर जाताना दिसतात आणि वास्तविक जीवनाचे समाधान निसर्गाच्या विविध रूपात शोधण्याचे प्रयत्न करताना दिसतात.
“सुनता हूं इस निश्चल जल में/ रहती मछली मोती वाली
पर मुझे डूबने का भय हैं/ भाती तट की चल जल माली |”

भारत हा जसा कृषीप्रधान देश आहे तसाच तो ग्राम प्रधान सुद्धा आहे. म्हणून भारत मातेला ‘ग्रामवासीनी’ मानले जाते. कवी पंत यांनी आपल्या ‘ग्राम्य’ कवितेत भारताच्या भौगोलिक स्वरूपाचे वर्णन केले आहे. खरा भारत हा खेड्यामध्ये पहावयास मिळतो म्हणून पंत म्हणतात-
“भारत माता/ ग्राम वासिनी |
नत मस्तक/ तरुतल निवासिनी ||”

कवी पंत भारत मातेला वंदन करून भोगोलिक सौंदर्याचे वर्णन तर करतातच परंतु त्याच बरोबर खेड्यातील गरिबी, दुःख, दैन्य, दारिद्र्य, शोषण, अशिक्ष आणि निर्धनता इत्यादींचाही उल्लेख करतात.

‘पल्लव’ मधील कवी पंत भव्य कल्पना करताना सुद्धा दिसतात. समुद्रावरील उठणाऱ्या लाटांमध्ये कवीला आपले हुंडके दिसतात. हवेच्या थंड झुळूक यामध्ये त्यांना आपले दुःख शीतल वाटते. अशा प्रकारे कवी पंतांनी पृथ्वी, समुद्र ते आकाशापर्यंत निसर्गाचे भव्य चित्र आपल्या काव्यात रेखाटले केले आहे.

सारांश रुपाने असे म्हणता येईल की, प्रतिभा संपन्न कवी सुमित्रानंदन पंत खऱ्या अर्थाने निसर्गाचे गायक होते. निसर्गातील संपूर्ण प्रतिमांचा, प्रतिकांचा प्रयोग त्यांनी आपल्या काव्य भाषेत केला. निसर्गाच्या सर्वांगावर कवीची दृष्टी खिळून राहते. त्यांच्या काव्यातील खडीबोलीची मधुरता, कोमलता, तत्सम शब्दावली, विविध भाषेचे शब्द, दृशात्मकता, चित्रात्मकता, शब्दाच्या अर्था व लिंगानुसार प्रयोग, तसेच त्यांच्या काव्य भाषेच्या लालीत्यामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते. यातच कवीचे महत्त्व दडलेले आहे.

सुमित्रानंदन पंत यांना भारत सरकार द्वारा ‘पद्मभूषण’ (१९६१) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ‘चिदंबरा’ या रचनेला ‘भारतीय ज्ञानपीठ’ (१९६८) पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘काला और बुढा चांद’ या कृतीला सुद्धा ‘साहित्य अकादमी’चा (१९६०) पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अखंड साहित्य सेवेबरोबरच आकाशवाणी मध्ये अधिकारी म्हणूनही कार्य केलेल्या या युगपुरुषाचा मृत्यू २८ डिसेंबर १९७७ रोजी प्रयागराज येथे झाला. सुमित्रानंदन पंत यांना विनम्र अभिवादन.

प्रा डॉ एम डी इंगोले

— लेखन : प्रा डॉ एम डी इंगोले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुमित्रानंदन पंत यांचा व त्यांच्या साहित्यिक योगदानाचा विस्तृत परिचय आपण करुन दिला, याबद्दल प्रथमतः आपले मन:पूर्वक अभिनंदन व आभार. आपण या मालिकेत विविध प्रथितयश हिंदी साहित्यिकांचा परिचय करून देणार आहात, ही हिंदी साहित्य रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरेल. हिंदी भाषा, हिंदी
    साहित्यिक एकूणच हिंदी साहित्य याविषयी इत्यंभूत माहिती देणारे हे सदर नक्कीच वाड्मयप्रेमींच्या पसंतीस उतरेल, यांची खात्री आहे. यानिमित्ताने मलाही हिंदी साहित्याची उजळणी करावयास मिळेल याचा आनंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments