१. बैलपोळा
मानी किसान
श्रावण अवस
बैलांचा दिवस
करी सन्मान – १
बैलांचा आज
खास असे सण
मानाचा रे क्षण
चढवा साज – २
उष्ण पाण्याने
आंघोळ घालून
छान सजवून
दाद गाण्याने – ३
फित बांधून
शिंगे सजवली
झूल पांघरली
गोंडे लावून – ४
खावया देई
पोळी पुरणाची
संधी स्मरणाची
पुन्हा न येई – ५
कष्टाचे काम
वृषभाच्या संगे
धडपड रंगे
देण्या आराम – ६
बळीराजाचा
बैलपोळा छान
कृषकाची शान
बैल मानाचा – ७
घरी लक्ष्मीची
घेऊन तबक
लावून दिपक
पूजा बैलाची – ८
प्रथा महान
आपुल्या धर्मात
तशीच कर्मात
प्राण्यांना मान – ९
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
२. शिवारातील काळी माती
श्रावणाचा शेवटचा दिन
साजरा करतो आम्ही पोळा
हरण्या-मोहन्याच्या जोडीसाठी
जसा आनंदी सोहळा !१!
राबराबती हरदिन वर्षभर
नाही कष्टाला पारावार
त्यांच्या कष्टाने फुलते
आमचा आवार – शिवार !२!
त्यांच्या खांद्याला शेकुन
थोडी मालिश करतो
हरहर महादेवाले बाप्पा
मग आंघोळ घालतो !३!
गोडघास त्यांना भरवूनी
मनोभावे पूजा करतो
झुला – बाशिंग बांधून
त्यांना तोरणाखाली नेतो !४!
शेतकऱ्यांच्या दैवतांची
होते सामुहिक पुजा
मारूतीच्या मंदिरा समोर
सारा गाव होतो सज्ज !५!
बोले कौतुकाने झडती
माझ्या हरन्या – मोहन्याची
साज – श्रुंगाराची त्यांच्या
चर्चा चालते सर्वांची !६!
काय वर्णावी महती त्यांची
राबराबती शेतामंदी
त्यांच्या कष्टाने फुलते
शिवारातील काळी माती !७!
–– रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
३. पोळा
आला आला हो पोळा
माझ्या सर्जा राजाचा
वर्षभर करुन कष्ट
सण हा सर्जा राजाचा ॥१॥
काळ्या मातीत राबतो
सर्जा राजा माझा
कष्टाचे मोल किती हो
सर्जा राजा माझा ॥२॥
पोळ्यास सजवु या बैलांना
घागरमाळा बांधु गळ्यात
बेगड लावु शिंगास
सजवु बैलांना मळ्यात ॥३॥
मानेवरती जु ठेवितो बैल माझा
श्रमास कधी न त्याच्या मोल
घामात भिजतो माझा राजा शेतकरी
श्रमास देवु बैलांच्या नेहमी मोल ॥४॥
पोळा येता सजवु सर्जा राजाला
रंगवु रंगात माझा सर्जा राजा ला
कंठे,घुंगुरुमाळा बांधु गळ्यात
घास भरवु पुरण पोळीचा बैलांला ॥५॥
बैल माझा राबतो मातीत वर्षभर
थोडे सन्मान देवुया या बैलांना
पोळ्यास नको फक्त सन्मान
वर्षभर देवु सन्मान बैलांना ॥६॥
शेतकरी माझा राजा आहे
त्याची श्रीमंती आहे हे धन
बैलपोळा हा मोठा त्याचा सण
सर्जा राजा हीच दौलत धन ॥७॥
माझा देश आहे कृषीप्रधान
तिथ शेतकरी माझा बळीराजा
गोधन आहे त्याची संपत्ती
कष्ट करतो माझा बळीराजा ॥८॥
सण आला आला पोळा हो
सर्जा राजांचा करु सन्मान
भरवु गोडधोड आज त्यांना
पुरण पोळी ने होईल सन्मान ॥९॥
श्रावणात हा सण आला हो
पोळा बैलाचा झाला हो
निसर्गाने धुंद बेधुंद रंग उधळले हो
सर्जा राजा चा सन्मान झाला हो ॥१०॥
— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800