नमस्कार मंडळी.
आज आपण आपल्या पोर्टल वर धुळे येथील प्रसिद्ध कवी चंद्रशेखर कासार यांच्या काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत.
अल्प परिचय :
चंद्रशेखर प्रभाकर चांदवडकर कासार यांचे सोनगीर हे जन्मगाव धुळ्यापासून वीस किलोमीटर आहे. त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावीच झाले. तर कॉलेज शिक्षण धुळे येथे झाले. बी. कॉम. झाल्यानंतर त्यांनी भांडी व्यवसाय, बांगडी जनरल चा व्यवसाय केला. पण कोवीड नंतर व्यवसायातून निवृत्ती घेतली. कॉलेज मधे असताना त्यांनी १९८९ मध्ये “चल रे लक्ष्या यमपुरीला” हि नाट्यछटा लिहिली होती परंतु स्टेज डेअरींग व मित्रपरिवाराची साथ न मिळाल्याने पुढे काही झाले नाही. ते १९९३ साली भांडी दुकानात एकटेच असताना पाऊस पडत होता. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की ह्या वातावरणात जर एखादा कवी असता तर त्याने एखादी सुंदर कविता लिहिली असती ! हा विचार मनात चमकताच त्यांच्या मनात पुढचा विचार असा आला की, मग आपणच का नाही कविता लिहून पाहावी ? आणि त्यांनी “कविता ” हेच शिर्षक घेऊन कवितेवरच कविता लिहिली आणि मग तेव्हापासून पुढे ते कविता लिहितच गेले. आजवर त्यांनी ५४० मराठी आणि ७९ हिंदी कविता लिहिल्या आहेत. त्यातील अनेक कवितांना काव्य रसिकांची दाद मिळाली आहे.
कवी चंद्रशेखर कासार यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
१. हे कविते…
हे कविते
आलीच आहेस तर थोडे थांबून जा
मनात माझ्या घर करून जा
थोडी विचारांची आदानप्रदान
थोडी शब्दांची जुळवाजुळव
करून जा
हे कविते
माझ्या मनाच्या सहवासात
काही काळ राहून जा
आनंदाचे क्षण मी ही टिपावे
तुझ्यावर काहीतरी दोन शब्द लिहावे
मनाला थोडे समजावून जा
हे कविते
कुठले दूरदूरचे विचार घेऊन
दूरदूरचे दृश्य मनात साठवून
दूरदूरच्या कल्पनेचा मनात
संग्रह करून जा
हे कविते
पाहिन मी तुला
माझ्या माझ्यात,
विश्वात, निसर्गात, स्वप्नात,
मनाच्या कोपऱ्यात
एकदा तरी कागदावर उतरून जा
हे कविते……
हे कविते……
२. माय माऊली मराठी
मिळे दर्जा राजभाषा
माय माऊली मराठी
भाषा माझी अभिजात
बोली आमची मराठी
आम्ही लेकुरे मराठी
सभ्य संस्कार मराठी
रीत रिवाज मराठी
सार्थ संस्कृती मराठी
देश माझा महाराष्ट्र
देव विठू रखुमाई
संत महंतांची भुमी
हिच आमची पुण्याई
शोभे आमचे दैवत
छत्रपती शिवराजे
हर हर महादेव
कडा सह्याद्रीच्या गर्जे
थोर महात्मे लढले
देई साक्ष इतिहास
साहित्यिक मांदियाळी
मराठीचा सहवास
३. गोव्याच्या सागरी तटावरून
आज मी त्याला जरा जवळूनच पाहिले
दुष्काळ सदृश्य प्रदेशातील मी
कधीकधीच पाऊस बघायला मिळे
आणि त्यातच समाधान मानावे लागे
आज योगायोगाने
गोव्याच्या सागरी तटावरून
त्याला डोळे भरून पाहिले
तो अथांग सागर डोळ्यात साठवला आणि
सावरकरांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ओळी आठवल्या
पृथ्वीच्या सत्तर टक्के भाग व्यापलेल्या
पाण्याचाच तो एक समुद्र
त्याचे ते अथांग स्वरूप त्याच्या
वाऱ्याच्या वेगा बरोबर
सळसळत येणाऱ्या लाटा
मला माझ्या कणभर देहाची जाणीव
करून देत होत्या हो..
त्या अथांग सागरा पुढे
मी कणभरच वाटत होतो.
त्याक्षणी माझ्या माणूस असण्याच्या
गर्वाचे हरण झाले होते.
मी क्षणभर अगदी स्वतःलाच
हरवून बसलो होतो.
अक्राळविक्राळ रौद्र भासणारा
तितकाच मर्यादा संयम यांचे
पालन करणारा भासला
वर्षानुवर्षे त्या सागर तटाशी
झुंजत राहूनही
तो कधीच मर्यादा ओलांडत नाही.
पाण्याने भरलेल्या
त्या अथांग सागराला
त्या सागर किनाऱ्यावरून
मन तृप्त होईपर्यंत पहात राहिलो,
संध्याकाळी परतण्याची
वेळ झाली म्हणून समाधानाने
रेल्वे स्थानक गाठले आणि
माणसांच्या सागरातल्या
प्रवाहात, प्रवासात सामील झालो.
४. सुखाचा पाऊस आलाच नाही
दोन बिघा जमीनीतला
पाऊण तुकडा
समृद्धी महामार्गात काय गेला
पैशाची लॉटरी लागली
आणि सुबत्तेचा पाऊस पडला
घर गाडी चैनीच्या सुखोपयोगी
वस्तूंची हौसमौज करण्यात
सारा पैसा आला तसा गेला
वडिलोपार्जित शेतीच्या
चतकोर तुकड्यात
आता काय ऊगवायचं ?
पश्चात्तापाच्या पावसाशिवाय
उरला फक्त दुःखाचा पाऊस
सुखाचा पाऊस
बळीराजाच्या
पुढच्या पिढीलाही
कायमचाच बंद झाला
आणि तो फक्त
बातम्या ऐकत राहिला,
कुठे महापूर, कुठे पावसामुळे
दरडी कोसळून गाव संपले
कुठे कोरडाठाक दुष्काळ
तर कुठे अवकाळी
त्यांनी समृद्धी महामार्ग जोडले
त्यांचे रस्ते समृद्ध पावसात भिजले
इकडे मात्र दोन बिघा जमिनीवर
पेरणी कधी झालीच नाही
जमिनीचा चतकोर तुकडाही
दुःखाच्या पावसात लुप्त झाला
पुन्हा सुखाचा पाऊस
आलाच नाही….
५. “गोरा गोरापान” (बालगीत)
इटुकला पिटुकला,
छकुला छान छान
घारे डोळे गाल गोबरे,
गोरा गोरा पान //धृ //
नकटे छोटे नाक,
कुरळे कुरळे केस
रुबाबदार राहतो,
पेहराव सुंदर ड्रेस
येते कुठून शहाणपण,
आहे जरी लहान
घारे डोळे गाल गोबरे,
गोरा गोरा पान //१//
दुडूदुडू पळतोय,
खेळतोय घरीदारी
घोड्यावर सवारी,
त्याची ऐट लय भारी
सैनिक मागे सारे,
पुढे शंभूराजे सान
घारे डोळे गाल गोबरे,
गोरा गोरा पान //२//
आई बाबा आजी आजोबा,
सारे फिरे मागेपुढे
साऱ्यांना चकवतो,
पळतो इकडे तिकडे
दमून भागून झोपतो,
गोष्ट ऐकून छान
घारे डोळे गाल गोबरे,
गोरा गोरापान //३//

— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान कविता आहेत
खूपच छान कविता आहेत, कवी चंद्रशेखर व news story today दोघांना अभिनंदन.