श्रावणाची महती सांगणाऱ्या चित्रपट गीतांसोबतच काही अल्बममधेही बरीच श्रवणीय व लोकप्रिय श्रावण गीते आहेत. श्रावणाच्या निमित्ताने मराठी मनाला मोहविणाऱ्या मधूर लोकप्रिय श्रावण गीतांचा आस्वाद.
श्रावणात घन निळा
लता दिदींच्या आवाजातील “श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा” हे गीत विसरुन कसे चालणार.मंगेश पाडगावकरांच्या
गीतरचनेला श्रीनिवास खळे यांनी चढवलेला साज आणि दिदींचा आवाज. हे गीत कितीदाही ऐकले तरी अविटच वाटते.
ऋतू हिरवा
ऋतू हिरवा या मराठी भावगीतांच्या अल्बममध्येही असेच एक सुरेख गीत आशा ताईंनी गायलेले आहे. हे गीतही प्रचंड लोकप्रिय असे आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या गीतरचनेला संगीतकार श्रीधर फडके यांनी दिलेला साज म्हणजे “ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा, युगविरही हद्यावर, सरसरतो मधूशिरवा” हे गीत. या गीतातही श्रावणाचा उल्लेख आहे. मंगेश पाडगावकर असो की शांता शेळके असो शब्दरचनेच्या बाबतीत ही कविवर्य मंडळी दिग्गजच.
रिमझीम झरती श्रावणधारा
सुमन कल्याणपूर हे नाव मराठी आणि हिंदी भाषेतील सिनेसंगीत रसिकांना नक्कीच आठवते. त्यांचे श्रावणाचे अप्रतिम वर्णन असलेले एक भावगीत म्हणजे “रिमझीम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात, प्रियाविण उदास वाटे”. मधुकर जोशी यांच्या या गीतरचनेला संगीकार दशरथ पुजारी यांनी साज चढवला आहे.गीतकाराच्या प्रत्येक शब्दाला यथायोग्य न्याय दिल्याने हे गीत लोकप्रिय ठरले.
रंग बावरा श्रावण
पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा २००८ साली आलेला रंग बावरा श्रावण या अल्बममध्येही कुसूमाग्रजांचे “हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला” हे गीत आहे. यास गिरीश जोशी यांनी संगीतबध्द केलेले आहे. पद्मजा मॅडम यांनी गायलेले हे गीत ऐकतांना श्रावणाचे एक नाजूक स्वरुप आपल्या समोर आल्याशिवाय रहात नाही.
रिमझिम श्रावण
तर पाऊस गीत या अल्बममध्ये अवधुत गुप्ते व वैशाली सामंत यांनी गायलेली “रिमझिम श्रावण रिमझिम श्रावण, चहुकडे हिरवे संमोहन, कुबेर पाऊस पेरुनी जाई, मातीच्या पोटी हिरवे घन” ही चंद्रशेखर सानेकर यांची रचना असून अर्थातच संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे. हे गीत देखील श्रवणीय असेच आहे.
मराठी चित्रपटातील श्रावण
श्रावण रोजच येऊ दे
शाहिर दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एका पेक्षा एक असे सुपरहिट चित्रपट देऊन दादा कोंडके युग निर्माण केले. त्यांच्या वाजवू का? या चित्रपटातून “श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, गाणं प्रितीच गातो या” हे एक गीत श्रावणाच अनोख रुप दाखविणारे आहे. दादांनी लिहिले की,”धरती मातेला नटुन अशीच राहु दे, अशीच राहु दे, श्रावण रोजच येऊ दे” या गाण्यात सनईचा केलेला वापर हा अत्यंत लक्षवेधक आहे. उषा चव्हाण व दादा कोंडके यांच्यावर चित्रीत झालेले हे गीत ऐकतांना कळत न कळत आपले मन ताल धरते.
श्रावण आला ग वनी
दिग्दर्शक राजदत्तजी यांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे १९७३ ला प्रदर्शित झालेला वऱ्हाडी आणि वाजंत्री. अनेक दिग्गजांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट. यात “श्रावण आला ग वनी श्रावण आला, दरवळे गंध मधूर ओला” हे आशा दिदींच्या आवाजातील एक श्रावण गीत आहे. गीतकार ग.दि.मा. आणि संगीतकार राम कदम त्यामुळे या गीताच्या लोकप्रियतेबद्दल शंकाच नाही.
श्रावणाच उन मला झेपेना
डॉ.जब्बार पटेल यांचा १९९२ साली प्रदर्शित झालेला “एक होता विदुषक” चित्रपट. या चित्रपटात “भरल आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाच उन मला झेपेना” ही सुरेख अशी एक लावणी आहे. गायिका आशा भोसले, गीतरचना कविवर्य ना.धो.महानोर अन संगीत आनंद मोडक.मधु कांबीकर यांनी अत्यंत मेहनतीने ही बैठकीची लावणी साकारली असून चित्रीकरण देखील यथायोग्यच झालेले आहे.
झिर मिर श्रावण धारा
नवरी मिळे नवऱ्याला या सचिन पिळगावकर यांच्या १९८४ यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘झिर मिर झिर मिर श्रावण धारा, धुंद करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना’ हे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील आणखी एक सुरेख श्रवणीय असे गीत. अशोक सराफ आणि नीलिमा या कलावंतांवर हे गीत चित्रित झालेले आहे. प्रेमी युगुलांचा साठी हे गीत बहारच..
रिम झिम श्रावण
चतुर नवरा चिकनी बायको या चित्रपटातील हे एक उत्तम गीत. तरुणाईला आवडेल असे संगीत देऊन मन रिजवून टाकणारे संगीतकार अनिल मोहिले. गीताचे बोल “रिम झिम श्रावण प्रिया तुज सवे झुलतो, मनी झुलतो” भरत जाधव आणि आदिती भागवत यांच्यावर चित्रीत झालेल्या या गीतात आदितीने उत्तम नृत्याविष्कार दाखविला आहे तर भरतने देखील त्यास यथायोग्य साथ दिलेली आहे.
नभ झाले घन वेडे..
बाजी हा श्रेयस तळपदेचा चित्रपट. यातील “नभ झाले घन वेडे.. बरसे हा श्रावण श्रावण” हे त्या गीताचे बोल असून गीतकार श्रीरंग गोडबोले आहेत तर संगीत आतिफ अफजल यांनी दिलेले आहे. आतिफ यांनी स्वत: हे गीत गायले असून सोबत गायिका चिन्मयी आहेत.
श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांची अदाकारी. वा क्या बात है। युवापिढीला हे गीत भारावून टाकते.
– डॉ.राजू पाटोदकर, मुंबई, 9892108365