Wednesday, September 10, 2025
Homeकलागणपती : कॅनडात "आग्र्याहून सुटका"!

गणपती : कॅनडात “आग्र्याहून सुटका”!

मध्य प्रदेशातील इंदूर येथील मूळ रहिवासी असलेले पण आता कॅनडातील ब्राम्प्टन येथे रहात असलेले श्री अभिषेक फाटक, त्यांची पत्नी सौ स्नेहल आणि मुलगा मयुरेश हे तिघे मिळून दरवर्षी गणपतीसाठी ऐतिहासिक विषयांवर देखावा निर्माण करतात.

२०२१ चा देखावा लोकमान्य टिळकांना समर्पित “केसरी वाडा” ह्या विषयावर  होता. २०२२ मध्ये महेश्वर चा नर्मदा घाट हा देखावा मातोश्री अहिल्याबाई होळकरांना समर्पित केला होता. २०२३ मध्ये त्यांनी वेरूळचे कैलास मंदिर साकारले होते. २०२४ चा देखावा राजस्थान मधील हवामहालचा होता. तो  राजपूत वीरांना समर्पित केला होता.

हीच परंपरा कायम राखत फाटक परिवाराने यंदाचा देखावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपार शौर्य, चातुर्य आणि स्वाभिमानाला समर्पित केला आहे

शिवाजी महाराज आणि औरंगझेबाची १२ मे १६६६ रोजी, आग्रा किल्ल्याच्या दिवाण-ए-खास मध्ये  भेट झाली. औरंगझेबाने महाराजांचा अपमान केला. महाराजांनी चढ्या आवाजात आपली नाखुशी जाहीर केली, औरंगझेबाकडे रागाने पाहिले आणि पाठ फिरवून दरबारातून निघून गेले.

मोघलांच्या रिवाजाप्रमाणे हा मोठा अपराध मानून औरंगझेबाने महाराजांना नजरकैद केले. महाराजांनी विलक्षण युक्ती केली. आजारी असण्याचे सोंग केले. गरीबांमध्ये दान करण्यासाठी फळे आणि मिठाई  पेटाऱ्यांमधून त्यांच्या डेऱ्या बाहेर जाऊ लागली. आधी काही दिवस सर्व पेटाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती, पण जेव्हा सैनिकांचा विश्वास बसला की ह्या पेटाऱ्यांमध्ये फळे आणि मिठाई व्यतिरिक्त काही नसते, तेव्हा त्यांनी तपासणी करणे कमी केले. महाराजांनी विलक्षण युक्ति करून पेटाऱ्यांमध्ये लपून  स्वतःची कशी सुटका केली हे जगजाहीर आहेच.

हा प्रसंग मराठा आणि संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरल्या गेला. औरंगजेबाला मराठी वाघाच्या सामर्थ्याची पुरेपूर जाणीव झाली, फलस्वरूप महाराजांच्या मृत्यू पर्यंत त्याने कधी स्वराज्यावर आक्रमण नाही केले.

देखाव्याचा उद्देश्य :
आपला इतिहास अनेक महान लोकांच्या प्रेरक गोष्टींनी नटलेला आहे. इतिहासातले रोमहर्षक प्रसंग, गोष्टी आणि महापुरुषांचे पराक्रम सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच त्यांचा उद्देश्य आहे. नवीन पीढी ला देखाव्याच्या माध्यमातून गोष्टी रूपात इतिहास सांगणे, हा या देखाव्याचा  उद्देश आहे.

देखाव्याची रचना :
“आग्र्याहून सुटका” हा देखावा ४ दृश्यातून प्रस्तुत केला आहे :-
१. दिवाण-ए-खास मधील महाराजांचा अपमान, त्यांचे भडकणे आणि चकित दरबारी

२. महाराज हवेलीत नजरकैद

३. पेटाऱ्यातून पलायन आणि फुलाद खानाचा पहारा

४. संन्याशी वेशात महाराज आणि बाल संभाजीराजे

सर्व  ३६ मुर्त्या फाटक यांनी स्वतः मातीच्या घडवल्या आहेत. त्यात शिवाजीमहाराज, बाल संभाजी, औरंगजेब, रामसिंग, फुलाद खान, इतर सैनिक, दरबारी, दुकानदार इत्यादी पात्रांचा समावेश आहे.

हा देखावा निर्माण करण्यात या तिघांची मिळून जवळपास २५० तासांची मेहनत आहे. त्यांनी २ महिन्यापूर्वी काम सुरु केले होते. नोकरी आणि इतर कामे सांभाळून देखावा निर्माण करणे, ह्यात फाटक परिवाराची  चिकाटी आणि आपल्या संस्कृतीसाठीचे प्रेम दिसून येते. सर्व कलाक्रुत्या हस्तनिर्मित आहेत. देखाव्या मागचे चित्र सौ. स्नेहल ह्यांनी स्वतः रंगवले आहे.

आतापर्यंत फाटक यांच्या घरी अनेक जणांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे अनेक अमराठी लोकांनीही शिवाजी महाराजांच्या इतर गोष्टी पण सांगाव्या, अशी मागणी केली आहे. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय.

कचऱ्यातून कला :
देखावा उभारण्यासाठी निरुपयोगी कार्डबोर्ड, थर्मोकोल, कागद वापरला आहे. टाकाऊ वस्तूंपासून हा देखावा तयार करण्यात आला आहे. कचऱ्यातून सुद्धा सुंदर देखावे निर्माण करता येतात हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. असे देखावे पर्यावरणपूरक असतात आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करतात.

देखाव्याची संपूर्ण योजना, इमारती आणि सर्व पुतळे घडवण्याचे काम अभिषेक ह्यांनी केले. सौ. स्नेहल यांनी पुतळे रंगवणे आणि मागचे चित्र तयार केले. तसेच, मयुरेश ने इतर रंग काम करण्यास मदत केली.

परिचय :
१. अभिषेक फाटक : अभिषेक हे आयटी बिझीनेस अँन्यालिस्ट आहेत. त्यांना वाचनाची आवड असून इतिहास हा त्यांचा प्रिय विषय आहे. त्यांचे इतर छंद म्हणजे त्यांना गाण्याची आणि कविता करण्याची आवड आहे.

२. सौ. स्नेहल फाटक : स्नेहल पूर्वी नोकरी करीत होत्या. पण सध्या त्या गृहिणी आहे. त्या उत्तम गायिका तर आहेतच, परंतु चित्रकलेची सुद्धा त्यांना आवड आहे. सुंदर कलाकृती बनवणे ह्यात त्यांना विशेष रस आहे. 

३. मयुरेश फाटक : मयुरेश सध्या सहाव्या वर्गात आहे. सुंदर कलाक्रुत्या बनवणे, बुद्धिबळ, स्केचिंग करणे, हे त्याचे छंद आहेत. 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा. 🙏गणपति बाप्पा मोरया.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिषेक ,स्नेहल ,मयुरेश पाठक यांचे मनापासून अभिनंदन 🤝आपण आपली संस्कृती वेगळ्या देशात जाऊनही जपत आहात यातच आपल्या देशावर असलेलं आपलं प्रेम दिसून येतं .आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद 💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !