Wednesday, September 10, 2025
Homeलेखहवाईदलातील माझे दिवस : ५१

हवाईदलातील माझे दिवस : ५१

एयर फोर्स स्टेशन हलवारा

मार्च २००१ महिन्यात पुण्याहून लुधियाना स्टेशनवर उतरून पासून ३० किलोमीटरवर असलेल्या एयर फोर्स स्टेशन हलवारा (डा) ला रिपोर्ट केला. मेस ते ऑफिसच्या वाटेवर हिरवीगार भातशेती पाहून मन प्रसन्न होत असे. ऑफिस जणू माझी वाट बघत होते. कारण बराच काळ तिथे विंग कमांडरची पोस्ट मोकळी होती. सुरवातीच्या दोन महिन्यात क्वार्टर मिळण्याची शक्यता, हवामान, मुलांच्या पुढील शिक्षणासाठी सोई वगैरे पाहून त्यांना आणायचे की नाही ते ठरणार होते. मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मुलीला सोईचे वाडिया कॉलेज मिळाले आणि जुलैत मला एकटाच परतावे लागले. पालम अकौंट्स सेक्शन मध्ये काही कारणांनी १ महिना जायची ऑर्डर आली. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ भारतात विमानाने उतरले आणि कारगील कांडानंतर आले आणि भाव खाऊन गेले. तेव्हा मी तिथे होतो. पत्नीनेे साठवलेले २० हजार माझ्या हातात एयर कंडिशनर रूममध्ये लावायला दिले होते. ३१ जुलैला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेली प्रेमळ भेट होती.

तिथले बॉस वेळेबाबत फारच कडक होते. मॉर्निंग ब्रीफिंगसाठी सगळे हजर आहेत की नाही यावर त्यांचे बारीक लक्ष असे. त्यांच्या टेबलवर फक्त कॉम्प्युटर दिसत असे. कधीकधी ते सॉलिडायर खेळत असत. पुढील काही वर्षांत सगळे चित्र पार बदलले. याची दखल घेत मी कॉम्प्युटर वापरायला शिकलो. आणि ऑफिसच्या वेळेनंतर रूमवर न थांबता कॉम्प्युटरवर टायपिंगची उजळणी करत असे. तेव्हापासून मराठीत टायपिंग करायला लागलो. ते आता कामाला येत असून त्यामुळे तिन्ही भाषेतून मिळून माझी २३० पेक्षा जास्त ई-बुक्स वाचकांना उपलब्ध आहेत.

दर शुक्रवारी ट्रेनिंग सेशन सुरू केले .त्यातून चुणचुणीत एयरमनला ओळखून जास्त जबाबदारीची कामे दिली. प्रत्येक टेबलवरील कामासाठी ड्रिल तयार केले. त्यामुळे कामात सुसूत्रता आणली. तिथेही मला वेल्फेअर ऑफिसर व्हावे लागले. लुधियाना ३० किमी लांब असल्याने बँकादेखील गचाळ स्टाफ ठेवत. इतर मोठ्या बँकात पब्लिक फंड अकौंट उघडायची परवानगी मिळाली. पंजाब नॅशनल, आयसीआयसीआय आणि १, २ बँकेच्या संपर्कातून आयसीआयसीआयची निवड केली. एटीएम मशीन बसवले. एका महिन्यात ३५०० डेबिट कार्ड बनवायला लावले. यासाठी आमचा स्टाफ त्यांच्या मदतीला दिला. महिन्याच्या पगारासाठी फाटक्या नोटांचे दर्शन संपून गेले. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अकौंट्स सेक्शन मध्ये तीन कॉम्प्युटरची वेगळी रूम माझ्या नियंत्रणात आणली. फ्लाईंग स्क्वाड्रन्समधे पेमेन्टसाठी आमचा स्टाफ पाठवून टारमॅकवरील हँगरमधे गुंतलेल्याच्या कामातील व्यत्यय संपवला.

पूर्वी अकौंट्स सेक्शन हे चहा पाणी आणि टंगळमंगळ करायचे गप्पांचा अड्डा बनत असे. ते हळूहळू बदलले. माझा एक तत्पर डेप्युटी स्क्वाड्रन लीडर राजेश गुप्ता मूडी होता. त्याचे कोणाशी कधीही बिनसत असे. नेहमी सर, सर करणारा माझ्यावर रुसला. अबोला धरला. त्याच्या घरी मी डीनरला टपकलो. बायकोला विचारले, ती म्हणाली, ‘त्यांना काही कारण लागत नाही. दोन दिवसांनी पुन्हा बोलायला लागतात.’ तसेच झाले !
गणेश उत्सव साजरा करताना विद्वांस कुटुंबियांचा उत्साही सहभाग असे. नाच गाण्याची रिहर्सल करायला त्यांचे क्वार्टर सोईचे होते. पंजाबीत ओरडून गायची पद्धत आहे. खांदे उडवून – बल्ले बल्ले – भांगडा करून विविध गुण दर्शन कार्यक्रमाची सांगता होते. विद्वांसांनी ते बदलून पहिल्यांदा करायला आणून नंतरच्या डान्सला धडाकेबाज स्टेप्स शिकवल्या. विसर्जन सुधार नावाच्या गावातून सतत भरभरुन वाहणाऱ्या कॅनॉलमधे होत असे. पुण्याहून भलीमोठी गणेश मूर्ती आणायची जबाबदारी मी घेत असे. दर ३ महिन्यानी स्टेशन वेल्फेअर मीटींगला प्रत्येकाला हजर राहायची सक्ती केली. एओसी एयरमन लोकांच्या तक्रारी ऐकायला हजर राहायची प्रथा सुरू केली. त्या स्टेशनमधे वयाने सर्वात वरिष्ठ असल्याने माझ्या म्हणण्याचा मान राखला जाई.

मे महिन्यात घरचे कुटुंबिय आले. पंजाबी वड्डा ग्लासातून लस्सी, सूर्यफूलाच्या शेतात फोटो काढत, सरसों का साग, चिकन बिर्यानी वगैरे वर ताव मारत मजा केली. आता हवाईदलातील नोकरीचे दिवस संपत येत होते. पुन्हा इतके दूर कधी यायला मिळेल, नाही म्हणून आम्ही सर्वजण होशियारपुर भृगुसंहिता केंद्रात गेलो. तिथे आमच्या चौघांची नावे असलेले एक भृगुपत्र सापडले. त्यात आदेशानुसार आम्ही जलदान, करून भृगु महर्षींच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून आलो. आमचे गुरू पुण्यातील चितळेबाबा यांचा एके दिवशी फोन आला म्हणाले, लिहून घ्या. त्या प्रमाणे मी भृगुसंहिता पानांच्या शोधात हिमालयात निघालो. जानेवारी महिन्यातील ऐन बर्फाळ केदार नाथ शिवमंदिरात जायचा आदेश मिळाला. जीपच्या टायर्स साखळ्या बांधून मी शोधात निघालो. वाट संकटातून जात होती. रोज सकाळी चितळेबाबांना आता कुठे जायचे आहे असे रिपोटिंग करून आदेश घेत होतो. तेंव्हा म्हणाले, आता परत या. शोध संपला. तुमच्या निर्धार शक्तीची परीक्षा होती. ती भूर्ज पत्रे हाती यायची वेळ आलेली नाही, असे आदेश मला माझ्या गुरू जालंधरनाथानी दिले आहेत. या ऐन बर्फाच्छादित मार्गांचा मागोवा स्क्वाड्रन लीडर धनंजय खोत यांच्याकडे हवाईदलातील मॅपचा आधार घेऊन ठरवायला मदत झाली. ते धनंजय नंतर काही वर्षांनी एयर कमोडर म्हणून हलवारा स्टेशनचे एओसी झाले.

अशा अनेक आठवणी घेऊन मी ३१ जुलै २००३ ला हवाईदलाच्या सेवेतून निवृत्त झालो. ऑफिसर्स मेस मध्ये ग्रँड पार्टी झाली. मी अलकासह डान्स फ्लोअर रंगवली. टाळ्या, अनेक प्रेझेंट्स घेताना हुरहुर लागली होती. माझ्या आयुष्यातले एक पर्व पुढे सरकले होते. पुढील काळातील घटनांना जागा करून देण्यासाठी…

लाडका फ्लाईंग ऑफिसर धनंजय मोटे…
हवाईदलातील माझ्या आठवणीत घर केलेला धनंजय. आमच्यात वयाचे बरेच अंतर. तो मुलाच्या वयाचा. तो काय नव्हता ? सकाळच्या ब्रीफिंगमधे बेस्ट प्रेझेंटर, गिटार, सतार वादक, सुंदर कॅलिग्राफर म्हणून लेडीज कार्यक्रमात रांगोळी डिझायनर, वेट लिफ्टर म्हणून प्रसिद्ध, स्पोर्ट्समन, मला तो आपल्या बरोबर पळायला लावे. शिर्डी साईबाबांचा भक्त. धार्मिक ग्रंथांचे वाचन, पाठांतरात विलक्षण असलेला. मातृभक्तीचा आदर्श.आईला नवी विकत घेतलेली गाडी दाखवायला सांगलीला चालवत घेऊन गेला. या शिवाय माझ्या आवडत्या माधवनगरचा! राहायचा यशवंतनगर कुपवाड रस्त्यावर. अमृतसर स्वर्ण मंदिरात दर्शनाला मला नव्या टाटा सुमो मधून घेऊन गेला. मी चालवतो म्हटले तर नाही सर, तुम्ही गाडीत आरामात रहा. शिकून कमी दिवसांत इतक्या सराईतपणे तो चालवत असे की मला तसे जमले असते का असा प्रश्न पडावा! त्याला भविष्य पहायला उत्सुकता होती. १०० किमी अंतरावर होशियारपुर भृगुसंहिता केंद्रात त्याचे भविष्य कळाले. नंतर पुण्यात माझ्याबरोबर त्याची ताडपट्टी सापडली. पुढील काळात त्याच्या विवाहासाठी आम्ही सर्वजण आवर्जून पन्हाळ्याला हजर होतो! पुढील १५ दिवसांनी त्याच्या अस्थि विसर्जनाला हवाईदलातर्फे हजर होतो. काय झाले, कसे झाले ते नाडीभविष्य पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. जयसिंगपूर – हातकणंगले जवळच्या एका ओव्हर ब्रिजवर अचानक एक ट्रक ओव्हरटेक करून समोरून धडकला. त्यात तो गेला.
क्रमशः

विंग कमांडर शशिकांत ओक

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !