“कवितासंग्रह : सोनचाफा”
स्त्री जीवनाच्या जगण्यातील सल, भान आणि जाणिवांच्या रंगछटा सहज, सूचक शब्दातून कमीत कमी शब्दांत लपून छपून मनात बसलेल्या, हरवलेल्या भावनांचा कल्लोळ हळुवार मनाने हाफिजा बागवान आपल्या कवितांमधून मांडतात.
आपल्या भावनांचा निचरा रिक्त करतांना घर, समाज, नातेसबंध, परिसर, निसर्ग, गर्द निळे मेघ, आठवांच्या परिघातील भाव रेखाटतांना नवा आशावाद जागवणा-या या कविता खरोखरच वाचतांना अनुभव वर्तुळ, परिघ, त्रिज्या, व्यास, फुलांचा सुंदर पाकळ्या विविध रंगात रगूंन जातो. कळ्यातील मनाचा भाव उमजत जातो. निसर्ग सौंदर्यांत वनमालाही मुक्या होत जातात. सखीचा मायेचा हात बासरीच्या बोला प्रमाणे मनात स्वस्वर छेडत राहतो. प्रेमळ शब्दांशब्दातला अमृत कण चाखतांना हर्षोउल्हास वाटत राहतो. निदान जीवनातील ज्ञानकण चाखणारी, पारखणारी एक सखी मिळावी इतकी माफक इच्छा कवयित्री हाफिजा करतेय. तिच्या सोबतच काव्याचा अर्थ उमजणार आहे. मनातला भाव शब्द रुपाने येऊन कविता फुलत जाते. (पा.क्र.१४)
मनाच्या भावनांचा
गंध गं फुटला
माझ्या शुभेच्छा
घे गं उमजून
कारण मनाच्या छायेत मनातला दीप अंतरीचा किणारा पार करुन प्रकाशित होणार आहे. नात्याचा मायाजाळ कधी कधी गवसतो. पण त्यातील प्रेम, भलेपणा स्वत्व हरवतो. शेवटी सर्व श्रम नि:ष्पळ होतात. हे सत्य कवयित्री नाकारत नाही.खोबरं तिकडं चांगभलं याचा प्रत्यय सामाजिक जीवनात येत राहतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी कधी आनंदाच्या सरी मुक्त बरसतात. त्यावेळी मनात कृष्णरंगी सुंदर अवसान, ऊर्मी मिळते. जगणं सुंदर होते.पण कधी वाटते जीवनांच्या मैफलीत नवरंगाची बरसात होईल काय ? अश्रूजलांच्या थेबांचा वर्षाव होईल काय ? असा आशावाद मनात घुमत राहतो. सुखाचा धागा गवसतो, कधी मनातील विचार धारा मनालाच घेऊन पळून जातात की काय ? या जगात धगधगते असे अर्थहिन जगणे का जगायचे ? कारण शेवटी हाती शून्यच राहते. अशावेळी त्या लिहितात (पा.क्र.१९)
“मोर पिसारा तनास
खुलवे हा
नव्या रितीचा संदेश हा
मनातला उसासा सप्तदीच्या सात लाटा संसाराच्या”
कालचक्रात सुखदुःखाच्या फे-यातील जगणे स्त्रीच्या वाट्याला येते. त्यातूनही ती जीवन सजवते.सख्याच्या भेटीच्या क्षणाने विखुरलेले सदन पुन्हा नव्याने प्रसन्न करते. हाच खरा जीवनानंद आहे.मनात एक तानुला रांगत येतो. त्याच्या पदकमलांनी घर आणि मखमली हाताचा स्पर्श आठवतो. कधी कधी सारे सारे सुने -सुने होते.अशात उन्ह सावलीचा खेळ मनात वादळ पेरत राहतो. भावणिक गुंतागुंतीच्या रसाळ चक्रव्यूहात आपण आपल्याच आसा भोवती फिरत राहतो. अशा वर्तुळीय नात्यातील भावविश्वाच्या परिवलनात फिरत फिरत जीवन परिघ आपण आपलाच पुलवतो. यात फुला-यातून गुढवादी जीवनातील अनुबंधाचा उलघडा करण्याचा प्रयत्न कवयित्री करतेय.म्हणून त्या म्हणतात, (पा.क्र३०)
लहरीत गुंतलेल्या जीवा
खेळ हा तुला कधी कळावा
अशा विरक्त अस्वस्थेच्या मनाला वसंताच्या जलधारातील क्षणिक सुखाचा सहवास रुक्ष शिशिर कधीच येऊ नये असे वाटत राहते. श्रावणाच्या सप्त सुराच्या फुलो-यात फुलवीत दिन जातो. सोनचाफा फुलतो. त्याच्याच कोंदणात मातेचे शब्द गुंफले जातात.आणि याच वाटेवर प्रितीचा वृक्ष मिळेल का अशी शंका कवयित्रीला येते. अशा वेळी (पा.क्र.३९)
मेघसागर अथांग असे
शोधू शब्द नित्य कुठे
तुझ्या स्मरणाचा सोहळा
भेट एकच विचार भोळा
एकदाच मनाला थंडावा मिळावा म्हणून सख्याची भेट व्हावी असे वाटते. प्रितीचा पसारा असा धुळीत विरून जातो. वादळ वा-याच्या वर्तुळात आशा-आकांक्षा अशाच भिरभिरत राहतात. मन वर्तुळाच्या कक्षेत धावत राहते. तरीही वाटते प्रितीच्या नव्या घड्या घालत नवमैत्रीचा सुर छेडत कवयित्री राहते. देवाजवळ ज्ञानाची, साक्षरतेची, शौर्यांची शक्ती मागते.ती म्हणते, (पा.क्र.४९)
धुप दीप दरी लडी अंतरिची
काळजाचा नंदादीप रेवती सदा
याच गुणगौरवात मन प्रासाद खुलते. आत्म्याचा हुंकार ऐकू येतो. परिसाचा स्पर्शदीप खुलवतो मनमंदिरात रेखाव्दिप, प्रेम हे निर्मळ जल सरीसारखे,सुमनांच्या गंधा सारखे प्रेम असते. त्याला गुलाब काट्याचे काहीच वाटत नाही. (पा.क्र.५४)
जलबिंदू संपल्याने
होतात मेघ रिक्त
हरवून प्रेम जाता
होते जुनेच व्यर्थ
हेच जीवनाचे सार आहे.मनातील माणसे जेव्हा दूर जातात तेव्हा प्राण जातो की काय असे वाटते. चेह-यावरील मळभ सारे काही सांगून जाते. गर्द जांभळ्या केसात कोणीतरी काजवा माळतो. पुन्हा श्वास ओला होतो. आशेचा दीप लाल रक्तात मिसळून जातो.मग मनमोर नाचू लागतो.सख्याच्या भेटीने मनाचे रान प्रसंन्नतेच्या उजेडात लख्ख होते. प्रगतीची कळी खुलते. वारा मुखाने अमृताचे घोट घेत राहतांना बालमन आठवते.,रेशमी कुंची, झबला, पाळणा याच आठवणीच्या पापण पंखात मन तरळत राहते. दीर्घ काळ…………ठेवणीतल्या अमोल
सैन्याची सैन्याची राती सुखाचा दीप प्रजोलित व्हावा हीच माफक अपेक्षा. शेवटी म्हणते. (पा.क्र.७९)
ह्दयी स्नेहल धागे
गुंतू दे तव धाग्यात
असा हा काव्य संग्रह नात्याच्या ओल्या प्रेमात नि सुक्या विरहात झुलत राहतो. कविता समजपुर्वक वाचन केल्यानेच कळते. मनाच्या गाभाऱ्यातील गुढ वलयाचा शोध कवयित्री घेत राहते. कवयित्रीचा कबितेचा पिंड असूनही प्रतिभेचा व प्रतिमेचा वरदहस्त असल्याच भास कविता वाचतांना होतोच.कविता मनच्या वेदनेला थेट भिडते. साक्षात दु:खाचा आत्मलोप यासाठी कवयित्री स्वतःशी लढतांना आढळते.कवयित्रीला ठायी ठायी जगण्यातील सल सतावते.तिची विचारशक्ती विषण्ण होते आणि एका बेचैनीतून व्यक्त होतांना दु:खाच्या धाग्याच्या पुर्वसुरीने कविता लक्षणीय रुप घेऊन येते.मनातला कल्लोळ कळायचा वेळ लागतो. कल्लोळाचा आलेख मांडतांना प्रतिमांच्या लाटा वरखाली हिंदोळ्या मारतांना अर्थबोध व्हायला, समजायला मनातल्या प्रकृतीचा आणि वृत्तीच्या खेळातील आनंद, भयदर्शन घडविणारी मनातील दीपज्योती कधी कधी गरगरते पण मनात घोंगावणारे विचार वादळात ही ज्योत कवयित्री हाफिजा बागवानांच्या विजू देत नाही हाच या कविता संग्रहाचा गाभाघटक आहे व हेच चैतन्य तिला आत्मबलिदान देते म्हणून हरवलेले भावदर्शन आणि भयदर्शन नमूद करणरी रचना आपणस या कवितासंग्रहात आढळून येतात.

हाफिजा बागवानांच्या या कवयित्रीचे सृजनशील प्रवासाचा आत्मा समजून घेतांना जगण्यातील सकारत्मकता सतत जागी ठेवत केलेले लेखन जगण्यातील लय देत राहते. म्हणून जगून संकटाशी लढण्याचा मंत्र कविता वाचतांना वाचकांना मिळाल्याशिवाय राहत नाही. मांडणीत एकसुरता जरी जागा बदलत कवितेचा डोलारा उभा राहलेला असला तरी त्यातील भाव अत्यंत महत्वाचा आहे.
अनुभावांची सतत लागत गेलेली ठेच कवितेच्या रुपाने साकारते.किस्कटलेले दु:ख ,विरह मनातून कागदावर कवितेच्या रुपाने पाझरत राहतो.प्रश्नांची छळणारी काटेरी झुल कवियित्रीच्या ह्दयी सलत राहते आणि त्याच वेदनेतून कविता साकारते. जाणिवांचे साररुप म्हणूनच कवितेचा जन्म होत राहतो. म्हणूनच भावनांचा साचा जसा हुंदका यावा तसा मुसमुसत वेदनेचे शब्द येतात त्याचा क्रम चुकला तरी भावार्थ कळून आल्यावाचून राहत नाही.काही कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या असे वाटतात. नविन शब्दबीज पेरणा-या कवयित्रीचे अनुभव विश्व पुन्हा नविन दमदार लेखन करत करत कवयित्रीला हवे असणारे शब्दविश्व मिळेल यात शंकाच नाही.
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रिणीचे नाते श्रेष्ठ असे वाटल्याने कवितासंग्रह मैत्रिणीस अर्पण केला आहे. वारकरी प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. अशा कवितारुपी सोनचाफ्याचा आस्वा्द घेण्याचा मी प्रयत्न केला. आपणही या संग्रहाचा सुगंध घ्यावा हीच सदिच्छा !

— परीक्षण : मुबारक उमराणी. सांगली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800