Wednesday, September 10, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ६५

माझी जडणघडण : ६५

आबा”

आयुष्यातले मनावरचे काही काळांचे ठसे सहजासहजी मिटत नाहीत. माझे सासरे ज्यांना आम्ही “आबा” म्हणत असू ते तसे शांत आणि गंभीर प्रवृत्तीचे होते. त्याचबरोबर ते करारी, ध्येयवादी होते. आमच्या कुटुंबात त्यांचा शब्द शेवटचा असायचा. सहसा कोणीही त्यांच्या विरोधात जात नसत. किंबहुना त्यांच्या विरोधात जाण्याचे धाडसही कोणात नव्हते. शिवाय “आबा” जे सांगतील, जे करतील ते सर्वांच्याच हिताचे आणि भल्याचेच असते अशीही एक मनोधारणा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची होती.

या पार्श्वभूमीवर आई आबांच्या सहजीवनाचा माझ्या मनात नेहमीच विचार येत असे. खरं म्हणजे आई सुद्धा तशा आबांच्या आज्ञेबाहेर नसतच. शिवाय घरातल्या कुणाही कडून आबांना न आवडणारे वर्तन, वागणं मुळीसुद्धा घडू नये म्हणून त्या फारच सावध असायच्या. “आटपा रे बाबांनो ! काय पसारा घालून ठेवलाय आणि जरा हळू आवाजात बोला. आबा आल्यावर त्यांना कळलं तर रागे भरतील बरं ?” आणि खरोखरच आबांच्या सायकलच्या घंटीचा पुढच्या दालनात आवाज आला की घराच्या आतल्या भागात प्रचंड धावपळ सुरू व्हायची. सर्वात प्रथम आमचा मदतनीस आणि अत्यंत एकनिष्ठ, स्वामीनिष्ठ असलेला एकनाथ धावायचा. आबांची सायकल जागेवर लावायची, त्यांच्या हातातलं सामान धरायचं, त्यांनी काढलेली टोपी कोट खुंटीला व्यवस्थित लटकवायची वगैरे वगैरे एकनाथ तत्परतेने करायचा.
पादत्राणं काढून रांगेत ठेवून आबा धोतराचा सोगा सांभाळत न्हाणीघरात हातपाय धुवायला जात. पुढचं दालन ते न्हाणीघर १००/ १५० पावलांचा रस्ता नक्कीच असेल. शिवाय दोन वेळा पायऱ्यांचा चढउतार. जवळपास माझ्या नणंदा नयना, वसुंधरा असतच. त्यापैकी कोणीतरी तत्परतेने आबांच्या हातात नॅपकिन ठेवत. या वेळी आबांचं एकच वाक्य ठरलेलं. ”माई कुठाय ?”

आबा

हात तोंड पुसून ते पुन्हा बैठकीच्या खोलीत, तिथे असलेल्या स्वच्छ पांढऱ्या बिनसुरकुतीची ताठ चादर घातलेल्या भारतीय बैठकीवर आराम करण्यासाठी विसावत. त्यांच्या लगोलगच आई थंडगार पाण्याचा स्वच्छ तांब्या- पेला घेऊन बैठकीत जात आणि दिवसभर काय काय घडलं त्याचा वृत्तांत हळूहळू आबा तिथे बसून आईंना सांगत. पण त्यातही मला एक गंमत वाटायची की आबा घरात नसताना घरातलं राज्य आईंचं असायचं. जबरदस्त टिपेच्या आवाजात आई सर्वांना म्हणजे घरातल्या काम करणाऱ्या मदतनीस बायांपासून मुला-मुलींपर्यंत (अर्थात नंतर सून म्हणून मीही त्यात असायचीच) सूचना देत असत. ते सारे चित्र आबा घरात असले किंवा बाहेरून घरी आले की पालटलेलं असायचं. आता मात्र या कौटुंबिक राज्याची सारी सूत्रं आबांच्या हाती. म्हणजे आई सुद्धा प्रजाच. आणि बैठकीत आईआबांचा होणारा संवाद पुष्कळवेळा आतल्या खांबाला कान लावून इतर सारे ऐकायचे. मला अशा वातावरणाची आजिबात सवय नव्हती. या घरात माझं नक्की काय होणार या विचारांबरोबर मला या सर्वांची गंमतही वाटायची. असंही कुटुंब असतं की !

विलाससह सर्वच भाऊ बहिणींनी आबांच्या विरोधात- विरोधात म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की त्यांचा अनादर होईल आणि आपला उद्धटपणा ठरेल असा एकही शब्द आबा हयात असेपर्यंत कधीही उच्चारलेला मला आठवत नाही. विलाससह ही सारी सात भावंडं होती आणि त्यांना काही हवं नको, त्यांच्या त्या वेळच्या विश्वातल्या काही मागण्या, अडचणी दूर करायची वेळ आली तर ते सारं काही “आबांपर्यंत” फक्त आईंच्या माध्यमातून पोहोचायचं. आई हे खालचं कोर्ट होतं आणि आबा म्हणजे हायकोर्ट. खालच्या कोर्टात मान्य केलेलं प्रकरण सहसा हायकोर्टात अमान्य व्हायचं नाही हे विशेष आणि यदाकदाचित झालंच तर पुन्हा अपील करण्याची काही राखीव शस्त्रं आईंकडे असत.

कधीकधी “नरोवा कुंजरोवा” या भूमिकेत मोठा “दादा” म्हणून विलासही बऱ्याच वेळा धाकट्या भावंडांची मने मोडू नयेत म्हणून वेगळ्या मार्गाने काही युक्त्या यशस्वीपणे पार पाडत असे. उदाहरणार्थ माझा दीर सुहास कधीकधी मित्रांबरोबर बाहेर जात असे आणि रात्री उशिरा घरी येत असे. जाताना तो फक्त दादाला (विलासला) सांगून जात असे. तेव्हा विलास आबांच्या नकळत त्याची घरी यायची वेळ झाली की दाराची कडी हळूच काढून ठेवत असे जेणे करून आबांना तो गेला आला काहीच समजत नसे. पण हा सगळा गमतीचा, शिस्तीचा, कधीकधी लपवाछपवीचा भाग सोडला तरी हा सारा एकमेकांच्या अंतःकरणातल्या प्रेमाचाच मामला होता.

आपण ज्याला कुटुंब पद्धती, जीवन पद्धती, जडणघडण, संस्कार म्हणतो ते तुम्ही ज्या गावात, ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीत वाढत असता, घडत असता त्यावरच अवलंबून असतं. त्यासाठी चांगलं वाईट असं काहीच मोजमाप नसतं किंवा हे चांगलं हे वाईट, हे बरोबर ते चूक असं नाही म्हणता येत. नाही ठरवता येत.

खूप वेळा मला आबांच्यात आणि माझे पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेले आजोबा (भाई) यांच्यात काही मूलभूत साम्य वाटायचे. पराकोटीचा व्यवस्थितपणा, स्वच्छता, टापटीप, मोजकं पण अर्थपूर्ण बोलणं या बाह्यबाबीं व्यतिरिक्तही त्यांच्यातल्या व्यावहारिक विचार धोरणातही मला साम्य वाटायचं. अधीरता आणि उतावळेपणाचा अभाव आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या भविष्याचे गांभीर्य यात मला नेहमी एकच सूर, एकच वैचारिक सूत्र जाणवायचं आणि या सगळ्यांमध्ये त्यांच्या पोटातली अपार माया लपलेली, दडलेली असली तरी ती अस्तित्वात होती याची जाणीव व्हायची. कदाचित ती अव्यक्त असेल पण वेळोवेळी ती आधारभूत ठरलेली असायची. शिवाय आबांबद्दल मी माझं वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा मला अधिकार का असावा ? मी तर त्यांच्या आयुष्याची मध्यान्ह उलटून गेल्यानंतरच्या आयुष्यात आले होते. एखादी व्यक्ती कळण्यासाठी त्या व्यक्तीचा गतकाळ अनुभवलेला नसला तरी परिचित तरी असायला हवा. वेळोवेळी विलास मला त्यांच्या एकेकाळच्या मोठ्या एकत्र कुटुंबाविषयी खूप सांगत असतो.

पाच भावांच्यात सर्वात धाकटे पण उच्चशिक्षित असल्यामुळे आबांनी ज्या पद्धतीने तेव्हा धडधडणाऱ्या तेल गिरण्यांचा, कापूस गिरण्यांचा (जिनिंग प्रेसींग) अवाढव्य शेतीचा डोलारा किती हुशारीने आणि सफलतेने पेलला होता आणि तेही मोठ्या भावाचे (आप्पांचे) “कर्ता करविता” हे पद सांभाळून, स्वतःकडे कसलेही अधिकार न बाळगता नि:पक्षपणे आणि निस्वार्थीपणे कुटुंबासाठी जे झटून केलं होतं, त्याचा सुंदर इतिहास मला विलासमुळे अवगत होता. त्यामुळे “आबा” ही नक्कीच साधारण व्यक्ती नव्हती. कुटुंबीयांना त्यांचा अभिमान का वाटू नये ? आणि या अभिमानाच्या भावनेतूनच कदाचित हा आदरणीय दुरावा असेल पण या दुराव्यातून डोकावणारा प्रेमाचा रंग मात्र नक्कीच अस्सल होता याची मी वेळोवेळी खातरजमा करत राहिले.

एक दिवस भांडारकर कुटुंबातल्याच एका सोहळ्यात एकत्र जमलेलो असताना एक ज्येष्ठ वहिनी माझ्या शेजारी येऊन बसल्या. सुरेख, रेखीव, गौरवर्णी, दागदागिन्यांनी मढलेली सौंदर्यवतीच ! वेगळ्या, स्वकर्तृत्वावर रचलेल्या आमच्या सुरेख, नेटक्या, आखीव संसाराचं भरभरून कौतुकही त्यांनी केलं. भांडारकर कुटुंबाच्या वैभवशाली गतकालात त्याही बोलता बोलता रमल्या आणि नकळत म्हणाल्या “गिरण्यांचे भोंगे थांबले, मशीनची चक्र थंडावली कारण तुझ्या सासर्‍यांनी या कारभारातून निवृत्ती पत्करली आणि त्यानंतरच खरी घसरण सुरू झाली. त्यांनी असं करायला नको होतं.”
हे ऐकून मी चकीत झाले पण नंतर वाटलं एक प्रकारे त्या ज्येष्ठ व्यक्तीने आबांना दोष देता देता आबांच्या कार्यावर नकळतच “तुम्ही नाही तर कोणीच नाही” असा गुणांकित शिक्काच नाही का मारला ? मला वैषम्य वाटण्यापेक्षा त्या क्षणी आबांविषयी अभिमानच वाटला.

आता प्रश्न उरतो तो हा की, ”त्या ज्येष्ठ व्यक्ती असं का म्हणाल्या ?” विलासलाच विचारावं पण त्याआधी हा संवाद त्याला सांगावा लागेल मग ती मनं कलुषित करणारी आगळिक नाही का ठरणार ? आणि हे ऐकून तो नक्की कसा रीयाक्ट होईल ?खरंच जीवन किती गुंतागुंतीचं असतं !
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सासू आणि सासरे या दोघांच्या भावनिक गुंतवणुकीचे आणि कळत न कळत एकमेकांचा स्वाभिमान जपण्याचे तंत्र हे पूर्वी बघायला मिळतच असे पण ते तुम्हाला जवळून अनुभवायला मिळाले आणि सर्व वाचकांना खंबीर नेतृत्व आणि कौटुंबिक पसारा सांभाळून नाते सांभाळणे हे किती कठीण असते आणि ते करायला खूप मोठ मन लागतं हे यातून दिसून येते.उत्तम घडलेली माणसंच उत्तम माणसं घडवू शकतात! समर्थपणे सर्व घराण्याचा डोलारा सांभाळू शकतात. राधिका मॅडमचे लेखनातील कौशल्य अप्रतिम आहे च पण प्रसंगां चे केलेले निरीक्षण आणि त्या मागची प्रत्येकाची गैरसमज न करता समजून घेतलेली भावना कौतुक करण्यासारखी आहे

  2. आबा हे व्यक्तीचित्रण खूप आवडले. ही माणसं त्या त्या परिस्थितीत उत्तम घडलेली असतात. आपल्या विचारांवर ठाम असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !