अशी एक मैत्री,
हक्काची व्यक्ती
विश्वासाची जेथे
असते खात्री
मनमोकळ्या गप्पा,
हृदयाचा कप्पा
सदैव स्मरावा
जीवनाचा तो टप्पा
दंगा मस्ती,
भावनांची वस्ती
अशी ही
आमची दोस्ती
प्रेमाचे बंध,
अत्तराचा सुगंध
मनी तरंग,
जुळे अंतरंग
सोबतीची लळा,
अनोखा जिव्हाळा
हृदयी फुलावा,
शब्दांचा ओलावा
तिचा सहवास
एकमेव आस
हाच झाला
जगण्याचा श्वास
आसवांचा पूर,
आठवणींचे काहूर
जुळले आमच्या
जीवनाचे सूर
इच्छा अपेक्षांचे
नसे ओझे
स्वच्छदी उडे
पक्षी जसे
पंखांना उडण्याचे
देई बळ
चिखलात जसे
उमले कमळ
चेष्टा मस्करी
रुसवे, फुगवे
जसे निर्मळ
पक्षांचे थवे
एकटेपणात देई साथ,
निराशेवर होई मात
चेहरा पाहून मन वाचावे
एकमेकांचे अश्रू पुसावे
रक्तापलीकडचे
नाते आपुले
प्रेमाच्या धाग्याने
गुंफलेले
अलगद हे बंध फुलावे
सोबतीने क्षण जगावे.
अशी ही जोडी भारी
नसे कोणती दुनियादारी.

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800