साडी पुराण ! 😊
अहो, त्यादिवशी मी आणि माझी मैत्रिण साड्यांच्या दुकानात गेलो… गेलो म्हणजे आपोआपच पाय वळले हो आमचे … तर झालं असं की बाहेर लावलेल्या त्या इतक्या छान होत्या की माझं तर बाई मनच जडलं हो त्या साड्यांवर… खरंतर त्या दुकानदारांची चालच असते हो बायकांना भुरळ पाडण्याची. नाहीतर आपण बायका कित्ती म्हणजे कित्ती ग भोळ्या नाही का… बाहेर लावलेल्या साड्या आणि त्यात त्या कमनीय बांध्याच्या म्यानीक्वीन ला नेसवलेल्या (म्हणजे आपणही असतोच की कधी काळी कमनीय बांध्याच्या) साड्यांवरून तर नजरच हटत नव्हती मेली… घ्यायची तर खूप इच्छा म्हणून घुसलो की दोघी एकदम आपलंच दुकान असल्यासारखं… मग काय दुकानदार तयारच असतो साड्या दाखवायला. एवढया साड्या दाखवल्या बिचाऱ्याने पण एक आवडेल तर शप्पथ… एकीचा रंग आवडला तर तिचा पदरच नाही आवडला… एकीच डिझाइन आवडलं तर तो रंग घरातल्या कपाटात आधीच विराजमान झालेला..

असं करत करत त्या साड्यांच्या ढिगाऱ्याखाली आमची आता समाधीच लागते की काय असं झालं होतं आणि त्या सगळ्या साड्या रागाने आमच्याकडे बघायला लागल्या. पण आम्ही दोघीही त्या सगळ्या साड्यांची नजर चुकवत तिथून उठलो आणि तडक त्या दुकानदाराला म्हणालो तुम रहेनो दो भैय्या हम खुद देखेंगे …

मग काय त्या रॅक मधल्या सगळ्याच साड्या मनात भरू लागल्या.. जणु काही त्यांच अन माझं जन्मोजन्मीच नातच…. मग काय मीपण त्यांच्या प्रेमात पडत पडत ही घेऊ का ती घेऊ करत करत तब्बल सहा साड्या निवडल्या अगदी मनपसंत अशा… होना एक अन् दोन साड्या घेणं शोभतं का हो आपल्याला… कसंय ना इतका वेळ साड्या बघायच्या आणि एखादीच साडी घ्यायची म्हणजे त्या बिचाऱ्या दुकानदाराचा अपमानच की हो… म्हणून कमीत कमी सहा साड्या निवडल्या.

तशा अजुन आवडल्या होत्या पण मनावर अक्षरशः मोठा दगड ठेवला हो मी आणि सध्या तरी एवढ्याच बास असं म्हणतच होते मनातल्या मनात तोवर मैत्रीण डोळे विस्फारून बघायलाच लागली माझ्याकडे म्हंटल हिला काय झालं आता….🤔

झा sss लं…. घरी गेल्या गेल्या नवरोबाने मुलांच्या संगतीने टोमणा मारलाच आता अजुन एक मोठं कपाट घ्यावं लागणार बहुतेक … तर लग्गेच पप्पांना लेक म्हणते कशी एक बास होईल ना हो कपाट…. दोघांनी एकमेकांशी संगनमत करून जणू माझ्याशी युद्धच करायचं ठरवलं होतं बहुतेक ….. पण मी बापडी तिकडे लक्षच दिलं नाही. 😏 त्या बिचाऱ्या साड्यांना अशी कितीकशी हो जागा लागते.. कुठेही एका कोपऱ्यात बिचाऱ्या गपगुमान बसतात त्या, आता तुम्हीच सांगा ह्या पुरुषांना काय हो माहिती बायकांच्या साड्यांच ….. एखाद्या कार्यक्रमात एकदा नेसलेली साडी परत कधीतरी नेसली तर बाकीच्या बायकांच्या डोळ्याला लगेच त्रास व्हायला लागतो. ती लगेच तिसरीला म्हणतेच अग मागच्या एका कार्यक्रमात तिने हीच्च साडी नेसली होती ना …. बाई ग हा बायकांचा त्रास बायकांनाच माहिती हो … बायकांचं कसं आहे ना की कितीही साड्या असल्या तरी कुठेही जाताना नेसायला चांगली साडीच नाही आणि कपाट तर साड्यांनी इतकं खचाखच भरलेलं असतं की साड्या ठेवायला जागाच नाही अशी गत असते बिच्याऱ्या आम्हा बायकांची….

जाऊ दे पण छान मिळाल्या हो साड्या असं मी मनातल्या मनात पुटपुटले … अन् मनातल्या मनातच माझ्या मनाला बजावलं सुद्धा की पुन्हा लगेच नाही हं साड्या घ्यायच्या असं म्हणत म्हणत मी माझं साडीपुराण थांबवणारच होते. तेवढ्यात नवीन साड्या कपाटात ठेवायला म्हणून कपाट उघडलं तर कपाटातल्या साड्यांनी अंगावर उड्या मारत मारत नवीन साड्यांच स्वागतच केलं की.
मग काय पुन्हा मनातल्या मनात म्हंटल नवरा म्हणाला ते काही चुकीचं नव्हतं 😇….
तसं तर याआधी पण खूपदा माझ्या कपाटातल्या साड्यांनी कपाट उघडल्या उघडल्या आज तरी मला नेस ग बाई असं म्हणत म्हणत माझ्या अंगावर उड्या मारत माझ्या पायावर लोळण घेतलेलं आहेच बऱ्याचदा… 😉
असो…. सध्या तरी साड्यांच्या रामायणात महाभारत होता होता राहिलं …. 😅🙏🏻

— लेखन : सौ. मंजुषा किवडे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800