“जिनी डोसा”
डोसा हा खरंतर दक्षिण भारतीय पदार्थ ! पण तो भारतातच नव्हे तर परदेशातील लोकांचासुद्धा इतका लाडका झाला आहे की त्यामुळे या डोशाचे इतके नवीन नवीन प्रकार बनवले जातात. विशेष म्हणजे प्रत्येक प्रकार खूप आवडतो सर्वांनाच अगदी मनापासुन ! म्हणूनच हा अगदी स्ट्रीट फूड पासून ते सेव्हनस्टार हॉटेल मध्येही हमखास असतोच.
आज आपण असाच एक वेगळाच डोशाचा प्रकार पाहूया. काय? तोंडाला पाणी सुटलेय ? मग चला ना,वाट कशाला पाहायची ?
साहित्य बॅटर साठी :
1वाटी उकडा तांदूळ, पाववाटी उडीदडाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धीवाटी बेसन, अर्धी वाटी रवा, चवीनुसार मीठ.
स्प्रेड करण्यासाठी मसालाभाजीचे साहित्य :
2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धी वाटी पातळ चिरलेला कोबी, अर्धी वाटी चिरलेली कांद्याची पात, कोथिंबीर, 4- 6क्यूब्ज प्रोसेस्ड चीज, 2 बटर क्युब्ज्, पनीर, चार पाच चमचे शेजवान चटणी, 4चमचे केचप, 2 चमचे काश्मिरी मिरची तिखट, 1चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ,2 चमचे तेल.
कृती :
बॅटर बनवण्यासाठी पूर्व तयारी, नियोजन करावे लागते. उकडा तांदूळ, उडीदडाळ स्वच्छ धुवून त्यात मेथीदाणे घालून 4..5 तास घट्ट झाकून ठेवावी. म्हणजे छान भिजते. नंतर मिक्सरमध्ये पाणी काढून सर्व घालावे व 1 कप पाणी घालून रवाळ वाटून घ्यावी. आता मोठ्या बाऊलमध्ये किंवा मोठ्याभांड्यात बेसन आणि रवा घालून त्यात 1 कप पाणी घालून व्हिस्करने व्यवस्थित फेतून घ्यावे. मग त्यात वाटलेले बॅटर घालावे आणि ते सर्व हलक्या हातानी व्हिस्करने गोल गोल फिरवत मिक्स करून ते पुन्हा 4 तास घट्ट झाकून ठेवावे म्हणजे व्यवस्थित फुगून येईल. जास्त वेळपण ठेवू नये नाहीतर रवा खूपच सॉफ्ट होतो आणि डोसे हवे तसे कुरकुरीत बनत नाहीत.
बॅटर होईपर्यंत आपण मसाला भाजी बनवून ठेवू. त्यासाठी गॅसवर कढईत बटरचे 2 क्यूब्ज आणि तेल घालून गरम करावे. मग त्यात कांदा, घालून 2 मिनिटे परतावे. आता त्यात कांदा,सिमला मिरची, टोमॅटो, कोबी घालावा व छान मिक्स करावे. नंतर त्यात शेजवान चटणी, केचप, तिखट, गरम मसाला घालावा. थोडीशी कांदापात आणि कोथिंबीर वरून घालण्यासाठी बाजूला ठेवून त्यात घालावी आणि चवीनुसार मीठ घालावे. मग छान मिक्स करून गॅस बंद करावा.
आता आपले बॅटर मस्त फुगून वरती आलेले आणि हलके झालेले दिसेल. त्यात चवीनुसार मीठ घालून अतिशय हलक्या हातानी व्हिस्करने गोल फिरवत मिक्स करून घ्यावे. त्यामुळे हवेचे बबल्स त्यात जातात आणि पीठ मस्त हलके होते आणि डोसे जाळीदार बनतात.
आता गॅसवर तवा ठेवून तो गरम झाला की त्यावर थंड पाणी शिंपडावे म्हणजे एकदम डोसा करपत नाही. मग त्यावर भाजी पसरून त्यावर पनीर खिसून घालावे. नंतर वरती चीज क्यूब्ज खिसून घालावे. तोपर्यंत आपला डोसा खालून व्यवस्थित भाजला जाऊन कुरकुरीत बनून सुटायला लागलेला असेल. मग पिझ्झा कटरने किंवा नसेल तर धारदार सुरीने डोशाला उभे कट मारावेत. म्हणजे त्याचा रोल बनवता येईल. रोल बनवून झाल्यावर तो सर्व्हिंग डिश मध्ये काढून उभे ठेवावेत. शेवटी सजावटी साठी वरून थोडेसे प्रोसेस्ड चीज किसून घालावे आणि कांदा पात, कोथिंबीर घालून शेजवान चटनी, सॉस सोबत सर्व्ह करावा.
वैशिष्टय :
हा डोसा आतून खमंग, चटपटीत भाजी असल्यामुळे सोबत काहीच द्यावे लागत नाही.बेसन आणि रव्यामुळे किंचीत जाडसर, कडक आणि तितकाच खरपूस, क्रीस्पी बनतो त्यामुळे खाताना खूपच मजा येते. एरव्ही डोशाचे बॅटर तांदूळ आणि उडीद डाळीचे असते. कारण ते झटपट तव्यावरून काढायचे असतात. पण यात भाजी, पनीर, चीज वगैरे घालून ते कट करून रोल करण्यासाठी थोडासा वेळ जातो त्यामुळे बेसन आणि रवा घातल्यामुळे ते लगेंच करपत नाही. उलट वेगळाच बेस बेस्ट लागतो. चीज आणि बटर मुळे चीझी सुरेख टेस्ट येते तर शेजवान चटणीमुळे खमंग, चटपटीत होतो. नक्की हा आगळा वेगळा डोसा बनवून पहा, पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील सगळेच.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.