Friday, September 12, 2025
Homeलेखअसे ही होऊ शकते !

असे ही होऊ शकते !

आजच्या समाज माध्यमांच्या जमान्यात, या माध्यमावर, माध्यमामुळे कधी, कुठे काय होऊ शकेल याचा काही नेम राहिलेला नाही.

हेच बघा ना काल संध्याकाळी मी एका सांस्कृतिक सदस्य असलेल्या व्हॉट्स ॲप समूहातील एक व्हिडिओ पाहणार, तितक्यात एका झटक्यात माझे व्हॉट्स ॲप बंद झाले आणि अशा आशयाचा संदेश आला की, काही संशयास्पद बाबी आढळल्याने आपले व्हॉट्स ॲप २४ तासापर्यंत निरीक्षणाखाली राहील ! हे वाचून माझी चांगलीच सटारली.

आता का सटारली, ते सांगतो. माहिती खात्याच्या नोकरीत असताना, साधारण २०१६/१७ च्या दरम्यान आमचे महासंचालक तथा सचिव आणि स्वतः सायबर एक्स्पर्ट असलेल्या श्री ब्रिजेश सिंह सर यांनी ज्येष्ठ वकील तथा सायबर एक्स्पर्ट श्री प्रशांत माळी साहेबांचे समाज माध्यमां संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे, या विषयी एक फारच मार्गदर्शक असे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच माळी साहेबांनी असे सांगितले की, “माहिती तंत्रद्न्यान आणि अन्य अनुषंगिक कायद्यांचा जर विचार केला तर, आपण सर्व अपराधी ठरतो” ! सर्वांना हे ऐकून धक्काच बसला. कुणालाच काही कळेना की, आपण असा काय गुन्हा केला आहे, म्हणून अपराधी ठरतो ? मग त्यानीच सांगितले की, “बऱ्याचदा आपल्या कळत, नकळत अशा काही लिंक्स, मजकूर, चित्रे, व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये असतात किंवा येऊन पडतात, जी कायद्याचा भंग करणारी असतात आणि म्हणून आपल्याकडून कळत नकळत असे काही होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे” हे त्यांनी सांगितले.

काल माझे व्हॉट्स ॲप बंद पडल्यावर मला माळी साहेबांचे व्याख्यान आठवले आणि प्रश्न पडला की, आपल्या कडूनही नकळत काही चुकले नाही ना ? काही गडबड तर झाली नाही ना ? आता काय करायचे ? असा मोठा प्रश्न पडला. एका जाणकार व्यक्तीला मोबाईल दाखवून विचारणा केली तर तो म्हणाला, आता तरी आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यांनी कळविल्याप्रमाणे २४ तास वाट पहावी लागेल.

व्हॉट्स ॲप बंद पडल्याने कालचे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल बनविता आले नाही आणि ते बनविता न आल्याने कुठे पाठविता आले नाही. त्यात आता माझे जीवन इतके “व्हॉट्स ॲप मय” झाले आहे की, त्या शिवाय चैन पडत नाही. आधी झोपताना देवाची प्रार्थना म्हणून झोपायचो. सकाळी उठल्या उठल्या देवाचे स्मरण करायचो. पण आता ती सवय जाऊन झोपताना मोबाईल पाहूनच झोपायचे आणि उठल्या बरोबर मोबाईल उघडून बघायचे, अशी सवय लागली आहे. अशा या परिस्थितीत, बिघडलेल्या मनस्थितीत कधी तरी एकदाची रात्री झोप लागली.

पण आज सकाळी उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे मोबाईल ला हात न लावता देवाचे नाव घेतले. म्हटले देवा, काही तरी भानगड मागे लागू देऊ नको. त्या मोबाईलला हात लावायची, उघडून बघायची माझी हिंमतच होईना. सकाळचे सर्व काही आटोपले. चहा पाणी झाले. शेवटी हास्य क्लब आणि सकाळी फिरायला जायची वेळ झाली. मग मात्र काय होईल ते होईल, बघू या मोबाईल उघडून असे म्हणून, मनाचा हिय्या करून मोबाईल हाती घेतला आणि व्हॉट्स ॲप वर गेलो आणि अहो आश्चर्यम !, चक्क व्हॉट्स ॲप कडूनच संदेश आलेला होता की, “आमच्याकडून अपघाताने आपले व्हॉट्सॲप बंद झाले होते. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनःपूर्वक दिलगीर आहोत”! हा अभूतपूर्व संदेश वाचून मी अक्षरशः नाचायचाच बाकी होतो. पण मग मी माझा हा अनुभव हास्य क्लब च्या सर्व हास्यकरूंना सांगून, सर्वांना गुळाचा चहा देऊन आनंद साजरा केला.

पण मनात एक विचार सारखा येत होता, आजकाल डिजिटल अरेस्ट म्हणून जे काय प्रकार घडत आहेत, लाखो, करोडो रुपये लखपती, करोडपती लोकांकडून लुबाडल्या जात आहेत, ते त्या त्या व्यक्तींच्या मोबाईल मधील काही आक्षेपार्ह बाबी या सायबर भामट्यांच्या हाती लागत असतील, म्हणून तर होत नसेल ना ?

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वेगप्रॉब्लेम solve झाला. काही का असेना , लवकर solvळाच अनुभव. पहिल्या वाक्यापासून उत्सुकता कसा e झाला हेच खूप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments