श्रावण सुरू होताच काशीला जाऊया काय असा विचार सौ.स्नेहाने मांडला. मलाही हा प्रस्ताव योग्य वाटल्याने चि. सौरभने अल्पावधीत सर्व नियोजन केले. यामुळेच आम्हाला काशी व अयोध्या तीर्थयात्रा पुरी करता आली.
काशी :
जेव्हा आमचं विमान वाराणसीत उतरू लागलं तेंव्हा वाटलं आम्ही फक्त तेथल्या जमिनीवर उतरत नसून हिंदू धर्माच्या पवित्र भूमीत प्रवेश करतोय ! तेथे पोहोचताच वरुण देवतेने आमचं स्वागत केलं. तेथून कारने मंदिर परीसरालगत तासाभरात लॉजवर पोहोचलो. पहाटे स्नान उरकले. वातावरण छान होते.
आम्ही प्रथम काळभैरव मंदिराकडे कूच केली. भगवान शंकराच्या उग्र रुपाला समर्पित असे हे मंदिर शहराचे क्षेत्रपाल तथा संरक्षक समजले जाते. काशी विश्वनाथाच्या दर्शनापूर्वी काळभैरवाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे. किंबहुना त्याशिवाय काशी विश्वनाथाचे दर्शन पूर्ण होत नसते.
या मंदिराकडे जाणारी वाट चिंचोळी आहे. उत्तरप्रदेशाचा श्रावण नुकताच संपला होता. त्यामुळे भाविकांची गर्दी कमी असल्याने निवांतपणे दर्शन घेता आले. तर यानंतर आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. मंदिरात मोबाईल, चामडी वस्तू व इतर साहित्य सोबत नेता येत नाही. मंदिरालगत पूजा सामान विक्रेत्याकडे लॉकर व्यवस्था आहे.
या मंदिराचा परिसर अन् चार प्रवेशद्वार आहेत. तसेच दर्शन रांग स्वच्छ, सुशोभित अन् ऐसपैस आहे. जनरल दर्शन रांग तसेच सशुल्क (प्रत्येकी रु २५०/-) सुगम दर्शन रांग देखील आहे. येथेही भाविकांची फार गर्दी नव्हती. शासकीय ओळखपत्र असल्यास विनामूल्य सुगम दर्शन रांगेतून दर्शन मिळते.

मंदिर परीसरातील अन्नपूर्णा देवी, गणेशजी आदी मंदिरे आहेत. तासाभरात आमचे दर्शन पार पडले. मंदिर आवारात एका बाजूला पुरातन मशीद निदर्शनास आली.
दर्शन उरकून बाहेर पडताना पावसाची संतत धार सुरु झाली होती. मग आम्ही चहापान उरकून दशाश्वमेध घाटाकडे रवाना झालो. गंगा नदीला पूर आल्याने पाणी पात्राबाहेर पसरले होते. घाटाबाहेर रस्त्यापर्यंत गंगेचे पाणी आलेले होते. पंचक्रोशीतील कावडीवाले अन् भाविकांची पावसात चिंब भिजत गर्दी ओसंडली होती. तेथेच भाविक श्रद्धेने डुबकी घेत गंगा मातेला पूजा साहित्य अर्पण करत होते. येथे दर्शनास येणाऱ्या भाविकास मोक्ष प्राप्त होत असल्याने काशीला अनन्य साधारण महत्व आहे. काशीत बरीच मंदिरे व घाट आहेत.

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात रस्त्याने पूजेचे पितळी साहित्य तसेच बनारसी साड्यांची दुतर्फा दुकाने आहेत.पितळी वस्तू खरेदी करताना ते लोखंडी व पितळी मुलामा दिलेले नाहीत ना ? याची खात्री करून घ्यावी लागते.पितळी वस्तूस लोहचुंबक चिकटत नाही. महिला मंडळीं या परिसरातून मनसोक्त खरेदी केल्याशिवाय पुढे सरकत नाहीत. दुपारी बारा पर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. आम्ही त्या परिसरातच भोजन आटोपले. लॉजवर परतून विश्रांती घेतली.
अयोध्या :
काशी विश्वनाथ दर्शन आटोपून आम्ही थोड्या विश्रांतीनंतर दुपारी तीन वाजता अयोध्याकडे (२२० किमी) रवाना झालो. सुदैवाने प्रवासादरम्यान पाऊस थांबला होता. ढगाळ व उष्ण दमट वातावरणात आम्ही रात्री आठ वाजता पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी श्रावणी पौर्णिमा असल्याने शरयू नदीत प्रवित्र स्नान करण्यासाठी हजारो भाविक जमले होते. गर्दीमुळे घाटाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लाऊन वाहतुकीसाठी बंद केले होते. यामुळे चालक पंकज शुक्लाने आम्हाला रिक्षाने पाठवले अन् तो निघून गेला.
रात्री फ्रेश होऊन आम्ही निवांत जेवण उरकलं. दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदिर व शरयूघाट दर्शन उरकून दुपारचे विमान गाठायचे होते. सौ.स्नेहानं रात्रीच बॅग भरायला घेतली आणि पितळी वस्तूंची पिशवी नसल्याचे लक्षात आले. ती पिशवी कारमध्येच विसरल्याचे मला आठवलं. ते साहित्य परत मिळेल याची बिलकुल आशा नव्हती; तरीही मी पंकजला रात्री सव्वा अकराला फोन केला आणि कारमध्ये पिशवी विसरल्याचे सांगितले. तो झोपेत होता. ‘सकाळी पाहून कळवतो’ असे म्हणाला. खरेतर मी साशंक होतो ; कारण रस्ते वाहतुक बंद होती आणि त्याला दुसरं भाडं असल्यास, तो केवळ पिशवी द्यायला येईल, असं वाटत नव्हतं. नाईलाजाने नाराजीत मी झोपी गेलो.
सकाळी लवकर जाग आल्यानं, मी सहापूर्वीच अंघोळ आटोपली. पंकजला फोन करावा असा मनात विचार करत होतो. तेवढ्यात त्याचाच फोन आला. ‘पिशवी मिळाली आहे; पण वाहतूक बंद असल्याने लता मंगेशकर चौकात या’ असं म्हणाला. मला फार हायसे वाटले. लगोलग मी दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या चौकाकडे निघालो. सुदैवाने वाटेत दुचाकीवाल्यानं लिफ्ट दिली. चौकात पंकज वाट पाहतच होता. पिशवी मिळताच त्याचे मन:पूर्वक आभार मानले. खुशाली पोटी मी दिलेली रक्कम तो नाकारत होता; तरीही त्याच्या खिशात बळेच काही पैसे कोंबून मी निरोप घेतला. श्रद्धेने घेतलेल्या वस्तू मिळाल्याने स्नेहा खुश झाली. पर मुलखात पर व्यक्तीवर आपण नाहक संशय घेतो. जगात अजूनही चांगुलपणा आहे याची प्रचिती आली.
राम मंदिरसाठी ऑनलाईन नोंदणी मुळे आम्हाला सकाळी ९ ते ११ या वेळेत दर्शन घ्यायचे होते. त्यादिवशी राखी पौर्णिमा असल्याने पंचक्रोशीतले भगव्या कपड्यातील हजारो भाविक शरयू नदीवर स्नान करण्यास जमले होते. आम्ही सुगम दर्शन पासावर नऊ वाजता श्री.राम मंदिरात प्रवेश केला. गुलाबी रंगाच्या दगडात हे आकर्षक मंदिर बांधलेले आहे. सर्व परिसरातील मंदिराचे ऐसपैस कोरीव बांधकाम लक्ष वेधून घेते. मुख्य मंदिर सभोवतालच्या इतर मंदिराचे बांधकाम अद्याप प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी ४० किलो चांदीची वीट पाया भरणीत ठेवून या मंदिराचे भूमिपूजन केलेले होते. या मंदिराचे वास्तु विशारद चंद्रकांत सोमपूरा व त्यांची दोन मुले निखिल व आशिष यांनी नाग्रा वास्तु शैलीत हे मंदिर बांधले आहे. हे भव्य मंदिर प्रशस्त, स्वच्छ, प्रकाशमय आहे. यामुळे गाभाऱ्यात प्रवेश करताच प्रसन्न वाटते. कर्नाटकाचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडात कोरलेली शांत प्रसन्न मूर्ती अगदी लांबूनही नजरेस पडते. दर्शनाने भाविकांचे मन आपोआप भरून येते. श्रीरामाच्या मूर्तीचे देखणेपण डोळ्यात किती साठवू असे होऊन जाते. रामलल्लाची मूर्ती ना बाल वा पोक्त वयातील असून किशोर वयातील श्री रामाचे रुप कोरले आहे. ते लोभस रूप पाहून भक्तांचे डोळे तृप्त होतात. मंदिराचा कळस व मूर्तीचा चौथरा सुवर्णजडीत आहे. मंदिर परिसरात गोशाळा असून दर्शनीच राम मंदिराचा इतिहास, जीर्णोद्धार किंवा पुनर्बांधणी आणि न्यायालयाच्या आदेशांची सविस्तर माहिती शिलालेखात कोरलेली आहे. मंदिरात सर्व सोयी विनामूल्य असून प्रत्येकास प्रसाद दिला जातो. राम मंदिर आवारात इतरही मंदिर आहेत. येथेही एक मशीद पहायला मिळते. मंदिराबाहेर पाचशे मीटर अंतरावरील काहीश्या उंचीवर हनुमान गढी या मंदिराचे दर्शन घेतले.

दुपारच्या भोजनानंतर आम्ही शरयू नदीच्या घाटाकडे निघालो. वाटेत लता मंगेशकर चौकात आकर्षक भव्य कोरीव वीणा प्रतिकृती साकारली आहे. तेथून पुढे शरयू नदीचा नवीन घाट असून तेथून काही अंतरावर विस्तिर्ण पात्र असलेली दुथडी मातकट रंगात वाहत जाणाऱ्या शरयू नदीचे दर्शन होते. शरयू घाटावर पंचक्रोशीतील कावडिया भाविक स्नान करुन सोबत तीर्थ घेऊन घरी परततात.

आमची काशी विश्वनाथ व अयोध्या यात्रा निर्विघ्न पार पडली. अयोध्येत महर्षी वाल्मिकी विमानतळ आहे. जेथून आजमितीस देशातील मोठ्या शहराशी विमान सेवा आहे. काशी, अयोध्या वारीत मी अनुभवलेल्या गोष्टी म्हणजे दोन्ही शहरे स्वच्छ वाटली. कोठेही उघडी गटारे नव्हती. सर्वत्र चांगल्या प्रतीचे सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉकचे रस्ते आढळले. येथील साडी, कपडे खरेदीत दराची घासाघीस केली जात नाही. शहरात लोकप्रतिनिधींचे कोणतेही फ्लेक्स किंवा पोस्टर दिसत नव्हते. यामुळे शहरातील चौक विद्रुप दिसत नव्हते. काशी यात्रेस येणाऱ्यानी ऑनलाईन लॉज बुक करताना शक्यतो काशी विश्वनाथ मंदिर नजिकचे निवड करु नये कारण बऱ्याचदा हे रस्ते पोलिसांमार्फत बॅरिकेड्स लाऊन वाहतुकीस तात्पुरते बंद केले जातात. सबब विमानतळ किंवा स्टेशन पासून भाड्याच्या कारने लॉजपर्यंत पोहोचता येत नाही. पुढील प्रवास रिक्षाने करावा लागण्याची पाळी येते. मात्र शहरात सर्वत्र स्वस्तात ई- रिक्षा सेवा उपलब्ध आहेत. सर्व भाविकांना येथील वास्तव्य सुरक्षित वाटते. अशी ही आमची श्रावण महिन्यातली आमची काशी अयोध्या तीर्थयात्रा सफल झाली.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️9869484800