Monday, September 15, 2025
Homeलेखअभियंता दिन आणि मी !

अभियंता दिन आणि मी !

थोर भारतीय अभियंते सर विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या गौरवार्थ हा दिन देशात अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही आगळीवेगळी शब्दांजली. सर विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

मी अभियंता, इंजिनिअर आहे असं सांगताना खरंच एक आत्मिक समाधान लाभते. आणि त्यात वरती जहाजी अभियंता म्हणवताना तर अभिमानाने ऊर भरून येतो. अर्थात यात मी गर्व दाखवत नाहीय कारण ते माझ्या स्वभावात कधीच नव्हते, नाहीय पण ज्या कार्यात आपल्याला आत्मिक समाधान लाभते, ज्यामुळे आपली ओळख तयार झाली त्या कामाबद्दल इतकी आत्मीयता आणि अभिमान असायलाच हवा.

आयुष्यातील जवळपास ३ दशके समुद्राच्या सहवासात काढत असताना समुद्री वातावरण आणि इथली शुद्ध हवा, जहाजातील शिस्त आणि जीवनपद्धती रोजच्या जीवनाचा एक भाग बनून गेलीय. घरी असताना ही त्याच सवयीने आणि विचाराने वावरतो पण त्यामुळे काही अगदी छोट्या मोठ्या गोष्टी कधी आनंद तर कधी महात्रासदायक ठरतात. असो, त्यावर पुन्हा कधीतरी बोलू.

आज अभियंता दिनाच्या निमित्ताने इतकं मात्र नक्की सांगू शकेल की, वयाच्या विशीच्या अगदी सुरुवातीला जेंव्हा जहाजात आलो तेंव्हा एखादी ट्यूबलाईटही दुरुस्त करताना हात थरथरायचे. अतिशय जुनाट, अगदी सर्व काही मॅन्युअल कंट्रोल असणाऱ्या जहाजातून करिअर ची सुरुवात केलेला मी सध्या चांगलं ४ हजार कोटी किमतीच्या जहाजाच्या आणि पूर्णतः स्वयंचलित कार्यप्रणाली असणाऱ्या जगातील सर्वात आधुनिक जहाजाच्या टेक्नॉलॉजीच्या देखभालीची जबाबदारी एक हाती उचलतो आहे, हे केवळ आणि केवळ अभियंता असण्यामुळे शक्य झाले आणि मुळात या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की हे तंत्रद्न्यान मला या नोकरी मध्ये अनुभवता येतेय, त्याचा हिस्सा बनता येतोय हेच माझं भाग्य आणि यश ही आहे.

सर विश्वेश्वरय्या

सर विश्वेश्वरय्या आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मनस्वी नमन करून मी अभियंता झाल्याचे श्रेय त्यांच्यासोबतच माझ्या आईवडीलांना ही देतो. कारण शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि शिक्षणामुळेच आपली मुलं एक जबाबदार आणि यशस्वी व्यक्ती बनू शकतात हे त्यांनी गरिबीतही ओळखलं. प्रसंगी त्यासाठी पोटाला चिमटे लावून आमच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि आमचं जीवन घडवलं.

अभियंता आहेत म्हणून अनेक सुख सुविधा मनुष्याला उपलब्ध झाल्या आणि त्या वापरता आल्या. अभियांत्रिकी शोध आणि अभियंते यांच्यामुळे आज जगातील सर्वसामान्य नागरिक देखील वाहने, विमाने, जीवन सुखावह करणाऱ्या अनेक वस्तू, मोबाईल अशा एक ना अनेक वस्तू वापरीत आहेत, ज्या कधी काळी राजे महाराजे, लाखो करोडोची संपत्ती आणि दागदागिने असताना वापरू शकले नाहीत !

अभियंता मित्रांना आणि तुम्हा सर्वांना आजच्या अभियंतादिनाच्या मनापासून शुभेच्छा.

बाळासाहेब पाटोळे

— लेखन : बाळासाहेब पाटोळे. इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर,
MOL ग्लोबल शिपिंग कंपनी, टोकियो जपान, सध्या बहामा समुद्र, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments