Monday, September 15, 2025
Homeसाहित्यखड्डे म्हणजे खड्डेच…

खड्डे म्हणजे खड्डेच…

थोर भारतीय अभियंते सर विश्वेश्वरैया यांची आज जयंती आहे. त्यांच्या गौरवार्थ आजचा दिवस हा अभियंतादिन म्हणून देशभर साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने भारत देश रस्त्यावरील खड्ड्यातून मुक्त करण्यात जर अभियंते यशस्वी झाले तर ती सर विश्वेश्वरैया यांना खरी आदरांजली ठरेल आणि प्रवासी, वाहनचालक सुद्धा आयुष्यभर दुवा देत राहतील. या खड्ड्यांमुळे जाणारे जीव वाचू शकतील. कुणी जायबंदी, जखमी होणार नाही. असो. या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके कवी श्री मंगेश पाडगावकर रचित “प्रेम म्हणजे प्रेम असतं” या गीताचे कवी गजाभाऊ लोखंडे यांनी केलेले विडंबन पुढे देत आहे, अर्थातच मंगेश पाडगावकर यांची त्रिवार माफी मागून !

खड्डे म्हणजे खड्डेच असतात
खड्डे म्हणजे खड्डे म्हणजे खड्डेच असतात
कुणा कुणासाठी
ते कमविण्याचे अड्डे असतात

काय म्हणता ?
या ओळी मनास भावतात ?
धंद्याच्या दृष्टीने कुणास पावतात
भावल्या तर भावू दे,
पावल्या तर पावू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा,
खड्डे म्हणजे खड्डे म्हणजे खड्डेच असतात
कुणा कुणासाठी ते कमविण्याचे अड्डे असतात

मराठीतून च्या मायला…
म्हणून शिवी देता येते..
उर्दुमधे उसकी….
म्हणून व्यक्त करता येते ;

खड्ड्यात पडला तरी
मनात बोलता येते.
बसमध्ये बसलात तरी
जनात बोलता येते !

गाड्या सुरु झाल्या की
गाड्या उडू उडू लागतात
बसल्या क्षणी हाडे
मस्त कुडकुड वाजू लागतात !

आठवतं ना ?
तुमची याच सुंदर रस्त्यावरून
सुसाट गाडी गेली होती
हेमाच्या गाला प्रमाणे
जणू दाढी गुळगुळीत झाली होती

याच रस्त्यावर बहुतेकांच्या वरातीत
बेभान होऊन नाचलो होतो,
आणि कालच्या वरातीत
मी बूडता बूडता वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
पण एखादे वाहन अंगावरून धावले असते
तुम्हाला ते कळले होते
सरकारला सुद्धा कळले होते !
कारण
खड्डे म्हणजे खड्डे म्हणजे खड्डेच असतात
कुणा कुणासाठी ते कमविण्याचे अड्डे असतात

कंत्राट बिनत्राट सब झूट असते
म्हणणारी माणसं भेटतात,
सह्या करताना चलनावर
सरकारी अधिकारी लाटतात

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी पगाराला हात लावलेला नाही
१० वर्ष झाला तरी पगार खर्चलेला नाही
आम्हाला कुणी नडलं का ?
पैसे खाल्ले म्हणून अडलं का ?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
खड्डे म्हणजे खड्डे म्हणजे खड्डेच असतात
कुणा कुणासाठी ते कमविण्याचे अड्डे असतात

तुझ्यासोबत कुटुंब खड्ड्यात
कधी पडला असाल जोडीने,
एक दोन फ्रॅक्चर,
थोडासा मार खाल्ला असेल गाडीने
वाटली असेल टक्केवारी
पुढारी अन् मंत्र्यांना एक दिस येईल आठवण,
खड्ड्यात तुम्ही पडताना

लोक झालीत शहाणी सुरती,
काढणार नाही वरती
माती घेवूनी तय्यार राहतील,
भरण्या खड्ड्यावरती

खड्डे म्हणजे खड्डे म्हणजे खड्डेच असतात
कुणा कुणासाठी ते कमविण्याचे अड्डे असतात

(टीप : रस्त्यांची सध्याची हालत पाहून सुचलेली ही विडंबन कविता आहे. चांगल्या लोकांनी मनाला लावून घेवू नये. माझ्या कवितेने कोणी सुधारतील असा बिलकुल दावा नाही. पण माझे मन साफ झाले. तळमळ होती म्हणून ती आपल्यासमोर मांडली.)

— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments