“कहाणी नमोची – एका राजकीय प्रवासाची”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ; १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने, त्यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे परीक्षण पुढे देत आहे. श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “द नमो स्टोरी – ए पॉलिटिकल लाइफ” हे चरित्र पत्रकार किंगशुक नाग यांनी इंग्रजीत लिहिले आहे. पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे आकर्षक छायाचित्र पाहून आपण प्रभावित होतो. अनुवादक सुनील माळी म्हणतात, “हे पुस्तक म्हणजे किंगशुक नाग या अस्सल पत्रकाराने केलेले एका राजकीय व्यक्तिमत्वाचे चित्रण आहे़. दर्जेदार पत्रकारिता कशी करावी, याचा तो आदर्श नमुना आहे़.”

या चरित्रपर पुस्तकात, लेखकाने श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्व भल्याबुऱ्या गोष्टींचा अत्यंत तटस्थतेने परामर्श घेतला आहे़. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीत मोदी यांच्या भूमिकेबाबतचे मत, लेखनात कुठलाही भडकपणा न आणता लेखकाने जसे सूचित केले तसेच मोदी यांना ‘विकासपुरुष’ म्हणण्यात तथ्य किती आणि प्रचाराचा भाग किती याचेही परखड परीक्षण केले आहे़.

“गतिमान गुजरात” मोहीम राबवताना मोदी यांनी दाखवलेल्या निश्चयी वृत्तीचे लेखक संयत शब्दांत कौतुक करतात. निष्ठुर राजकारणी असे मोदी, झपाटलेपणाने अहोरात्र कामात मग्न असलेले मोदी, हिंदुत्ववाद जोपासणारे मोदी, बहुतांश अल्पसंख्याकांच्या मनात साशंकता असलेले मोदी, गुजराथी जनतेमध्ये ‘मैं नही, हम’ अशी अस्मिता जागवणारे मोदी , परकीय आणि स्वकीय गुंतवणुकीला चालना देणारे आणि त्यासाठी धडाकेबाज वेगाने निर्णय घेणारे मोदी, वैयक्तिक जीवनात एकटे असलेले मोदी असे विविध पैलू लेखकाने समोर आणले आहेत. अत्यंत निष्पक्षपणे मोदी यांचा राजकीय प्रवास रेखाटताना ते गुजराथी जनतेची स्वभाव वैशिष्टे, तेथील समाजकारण, अर्थकारण यावरही भाष्य करतात.
‘एखादी वस्तुस्थिती आक्रस्ताळेपणाने, आक्रमकतेने सांगितली की त्याची धार निघून जाते. परिणाम कमी होतो. पण तीच गोष्ट तटस्थपणे, कोणत्याही भावना न मिसळता सांगितली तर ती प्रभावी ठरते, वाचकाला चीड आणणारी ठरते,’ हे पत्रकारितेतील तत्व लेखक किंगशुक नाग यांच्या लेखनातून स्पष्ट होते.
अनुवादक सुनील माळी म्हणतात की, नाग यांनी पुस्तकात ग्रांथिक भाषा वापरलेली नाही.ती पत्रकारितेच्या वृतांकन करताकरताच भाष्य करणारी अशी आहे़.”

लेखकाच्या मते “नमो” म्हणजेच नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास म्हणजे पैसा, धर्म, विश्वास आणि उसळती महत्वाकांक्षा यांच्या एकत्रीकरणातून देशाचे राजकारण आणि अर्थव्यवस्था कशी बदलली, याची कथा होय. नेमका कोणता बदल हवा, याबाबत सार्वमत न घेताही लोकांमुध्ये घडवलेल्या बदलाची ही गोष्ट आहे़. राजकीय सुधारणांबरोबरच करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांची ही कथा आहे़.
“कहाणी नमोंची” हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एक वर्षांच्या आत हे पुस्तक सतत चर्चेत राहिले.या पुस्तकाचा विषय राष्ट्रीय बातम्यांमध्ये सातत्याने येत असल्याने त्या पुस्तकाला जास्त लोकप्रियता लाभली. लेखक किंगशुक नाग यांच्या मते ‘नमो’ हे नाव गुजरातच्या काही वर्गापुरतेच मर्यादित होते. या पुस्तकाने ते सर्व देशभर पसरवले. त्यामुळे, ‘नमो’ हे नाव घरोघर घेतले जाऊ लागले.
इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करतांना सुनील माळी यांनी किंगशुक नाग यांच्या शैलीचा तसेच भाषेचा मूळ बाज जपण्याचा प्रयत्नं केला आहे़.हे पुस्तक तळागाळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यापासून ते राज्यशास्त्राच्या अभ्यासकापर्यंत सर्वांना उपयोगी पडेल असे आहे़. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक जावे , अशी अनुवादक सुनील माळी यांची इच्छा आहे़. मला खात्री आहे़ सर्व नमो भक्त तर हे पुस्तक वाचतीलच परंतु नवोदित पत्रकार व नवोदित लेखकांनी तसेच राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वपक्षीय युवकांनी तर हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे.

— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800