आपल्या आईवडिलांची काळजी घेणे हे त्यांच्या मुलांचे केवळ कौटुंबिक, नैतिक कर्तव्य नसून, ती कायदेशीर जबाबदारी देखील आहे. मुले त्रास देतात म्हणून जर आईवडिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली तर मुलांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा कारवाया झाल्याच्या बातम्या अधूनमधून वाचनात येतात आणि वाईट वाटते. एकत्र कुटुंब व्यवस्था हे वैशिष्ट्य असलेला भारत कुठे हरवत चालला आहे, कुठे जाईल, पुढे आणखी काय काय होईल, अशी चिंता वाटू लागते.पण काही आशेचे किरण दिसतात आणि वाटते, सर्वच काही अंधारलेले नाहीय.
असाच मला दिसलेला आशेचा किरण म्हणजे मनोज भोयर आहे. उत्कृष्ट टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेबद्दल मनोजला विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा अनिलकुमार स्मृती पुरस्कार नुकताच नागपूर येथे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते आणि वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या बद्दल मनोजचे मनःपूर्वक अभिनंदन.
मनोज माध्यम जगतात गेली २५ वर्षे चमकदार कामगिरी करीत आहे.पण मला तो केवळ त्याच्या व्यावसायिक कामगिरीमुळे भावतो असे नाही तर तो अधिक भावतो ते, तो प्रखर मातृपितृ भक्त आहे म्हणून. हा पुरस्कार स्वीकारताना त्याच्या सोबत तत्वनिष्ठ, विद्यार्थीप्रिय राहिलेले ८० वर्षांचे शिक्षक वडील भीमराव भोयर आणि आईदेखील होती, हे विशेष. इतकेच काय,काही काळापूर्वी सिंगापूर येथील शब्द साहित्य संमेलनाचा उदघाटक म्हणून मनोज गेला असताना, वडिलांची विमानात बसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो या संमेलनासाठी आईवडिलांनाही सोबत घेऊन गेला होता. त्याने त्यांना केवळ विमान प्रवासच घडवून आणला नाही तर एक परदेश ही दाखवून आणला.

मनोजच्या वडिलांनी त्यांची शिक्षणक्षेत्रातील वाटचाल, त्यांनी केलेले प्रयोग, शिक्षणविषयक विचार असलेले ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला त्यांचे मित्र डॉ.अभय बंग यांची प्रस्तावना लाभली आहे.
‘पद्मगंधा’ ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मनोजने मुंबई मराठी पत्रकार संघात शानदारपणे प्रकाशन केले होते. मी देखील या कार्यक्रमास उपस्थित होतो. पुढे हे पुस्तक वाचून प्रभावित झाल्याने मी या पुस्तकाचे परीक्षण देखील लिहिले होते.

मनोजचे बाबा वाटखेडा या गावात जन्मलेले. तिथेच ते चौथी पर्यंत शिकले. महात्मा गांधी यांच्या विचारातून सेवाग्राम येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘नई तालीम’ शाळेत ते लोकांच्या मदतीने शिकायला गेले. ज्येष्ठ गांधीवादी स्व. ठाकूरदास बंग यांचे चिरंजीव, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी त्यांची झालेली मैत्री आजही कायम आहे. मनोजच्या बाबांना त्यांचा खूप सहवास लाभला. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक राज्यात दौरे केले. “ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य” हे विषय मनोजच्या बाबांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. त्यांनी स्वावलंबनाला सतत महत्व दिले. या गोष्टींचा मनोजच्या विचारांवर आणि आयुष्यावर फार प्रभाव पडलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिक वेळ देता यावा म्हणून ते नोकरीच्या गावीच रहात असत. फक्त आठवड्यातून एकदा घरी यायचे. त्यामुळे सर्व वेळ मनोजची आईच मुलांना सांभाळायची. त्यामुळे तिचे योगदान या भावंडांच्या जीवनात अनन्यसाधारण आहे.
मनोज नोकरीनिमित्त मुंबईत असला तरी त्याचे सर्व लक्ष आईवडिलांकडे लागलेले असते. इतके दूर राहूनही त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते ते तो करीत असतो. त्यांना थोडे जरी काही झाले तरी,लगेच त्यांच्याकडे धाव घेतो. आजच्या २४ तास चालू असणाऱ्या माध्यमसृष्टीत हातची कामे सोडून किंवा व्यवस्थित मार्गी लावून अचानक गावाकडे निघावे लागणे किती त्रासदायक असू शकते, याची कल्पनाही करवत नाही.
अशी ही आईवडिलांशी, आपल्या मुळाशी नाळ तुटू न देता, प्रसार माध्यमांच्या आजच्या भाऊ गर्दीत स्वतःची वेगळी ओळख, वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या मनोजचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता.
त्याचे वडील जिल्हा परिषदेत शिक्षक असल्याने त्यांची कायम बदली होत असे.
त्याची पहिली चार वर्षे कुटुंबासोबत वर्धा जिल्ह्यातल्या कांढळी गावात गेली. पण शिक्षणाच्या दृष्टीने मुलांची आबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी वर्धा शहरात कुटुंब हलविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मनोज आणि त्याच्या भावंडांच्या भावी जीवनासाठी खूपच महत्वाचा ठरला.
मनोज वर्धा शहरातील संपन्न सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढला. तिथेच त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.महाविद्यालयीन जीवनातच तो लोकमतचा कॉलेज प्रतिनिधी झाला. तसा त्याही पूर्वी तो स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या आणि लेख लिहीत असे. यामुळे त्याची पत्रकारितेची आवड वाढत गेली. एका अर्थाने पत्रकारितेचे बाळकडू मनोजला वडिलांकडून मिळाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ते त्याला सभा, संमेलने, भाषणे, शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी सतत सोबत नेत असत. त्यामुळे मनोजचा पत्रकारितेचा दृष्टिकोन व्यापक होत गेला. सामाजिक, राजकीय प्रश्नांची जाण येत गेली.त्यामुळे त्याने स्वतःची आवड ओळखून त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जगप्रसिद्ध रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
मनोजने पुण्यातच दैनिक लोकमत मध्ये काही काळ काम केले. पण त्याला ओढ होती ती टीव्ही पत्रकार बनण्याची. म्हणून त्याने पुणे सोडले आणि मुंबई गाठली .
मुंबईत मनोजने मॅक्स महाराष्ट्र डिजिटल वाहिनीच्या संपादक पदाची जबाबदारी तर सांभाळलीच पण त्याशिवाय राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. राजकीय विश्लेषण करणाऱ्या ‘टू द पॉईंट’ या कार्यक्रमाचे संचालन केले. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर दौरा करून शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसांशी संवाद साधत ‘त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर ग्राऊंड झिरो’ चे सादरीकरण केले.
मॅक्स महाराष्ट्र आधी मनोज लोकशाही वृत्त वाहिनीच्या आउटपुट विभागाचा संपादक होता. तर तत्पूर्वी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत तो ५ वर्षे डेप्युटी एडिटर होता. या दरम्यान त्याने ‘दिलखुलास’ हा राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सादर केला. विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे विशेष वार्तांकन केले.
कोरोना काळात मनोजने ‘टार्गेट कोरोना’ या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करून राज्यातील कोविड योद्ध्यांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे प्रेरणादायी काम समाजासमोर प्रभावीपणे मांडून लोकांना धीर देण्याचे मोठे काम केले.
सहारा समय या राष्ट्रीय वृत्त वाहिनीत रिपोर्टर ते ब्युरो चीफ म्हणून मनोजने १० वर्षे काम केले. या काळात त्याने विधानसभा, लोकसभा निवडणूक वार्तांकन, सामाजिक आशयाच्या वृत्तकथा, अन्य मुलाखती घेण्याबरबरच गडचिरोलीच्या जंगलात जाऊन थेट नक्षलवाद्यांची मुलाखत घेण्याचे जीवघेणे धाडस केले आहे.याशिवाय त्याने ईटीव्ही, समय, न्यूज वर्ल्ड इंडिया आदी वाहिन्यांमध्ये देखील उल्लेखनीय काम केले आहे.
त्याने गुजरात दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोट आणि त्यांचे न्यायालयीन खटले याचे वार्तांकन, महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान या राज्यातील महत्वाच्या राजकीय घटनांचे वार्तांकन, उत्तरप्रदेश, केरळ, पंजाब, लेह लडाख आदी राज्यात जाऊन तेथील वार्तांकन केले आहे.
आपल्या वाहिनीतील जबाबदाऱ्या निर्भिडपणे, सक्षमपणे पार पाडीत असतानाच मनोजने पुणे, सोलापूर विद्यापीठ आणि अन्य ठिकाणी नवोदित पत्रकारांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले आहे. पुणे इथे २०१७ साली तर इंदोर येथे २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत त्याने व्याख्याने दिली आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासून वेगवेगळ्या सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरणाशी संबधित संस्थासोबत मनोज काम करीत आला आहे.

मनोजला मिळालेले महत्वाचे पुरस्कार म्हणजे नांदेड श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार, बाबुलाल पराडकर पत्रकारिता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वणी येथील संमेलनात पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा दीपस्तंभ पुरस्कार आदी होत.
नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोजचे अत्यंत कळकळीचे सांगणे आहे की, “मुळात या क्षेत्राची आवड असेल तरच हे क्षेत्र निवडा. या क्षेत्रात भरपूर संधी आहेत, तशी आव्हाने देखील खूप आहेत. पण आवड नसेल तर तुम्हाला येणाऱ्या अडचणींवर मात करता येणार नाही. तुम्ही थकून जाल. केवळ ग्लॅमर आहे म्हणून पत्रकारितेचा विचार करू नका. त्यासाठी लागणारा अभ्यास, जनसंपर्क याचीही तयारी ठेवा. अन्यथा आईवडिलांचे मेहनतीचे पैसे तर तुमची उमेदीची वर्षे वाया जातील. पत्रकारितेचे उत्तम शिक्षण देणाऱ्याच महाविद्यालये, विद्यापीठे, संस्थांमध्ये शिक्षण घ्या, कारण आता खूप ठिकाणी पत्रकारितेचे अभ्यासक्रम शिकवले जातात पण त्यांना अजिबात दर्जा नसतो.”
आपली नोकरी, सांसारिक जबाबदारी उत्तमपणे निभावत असतानाच सतत सामाजिक बांधिलकी जोपासून वाटचाल करीत असलेल्या मनोजला आणि त्याला सतत साथ देणाऱ्या त्याच्या परिवाराला आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.