आपल्या पोर्टल चे नियमित लेखक, निवृत्त माहिती अधिकारी श्री रणजित चंदेल हे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त परदेश भ्रमण करून आले. पण या भ्रमणापेक्षा पसायदान मध्ये साजरा केलेला वाढदिवस त्यांना अधिक भावला. त्यांच्याचकडून जाणून घेऊया या “पसायदान” विषयी.
श्री रणजित चंदेल यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
सिंगापूर, मलेशिया येथून मी नुकताच पुणे येथील मुलाकडे आलो. तिथून पुढे आम्ही आळंदी स्थित पसायदान गुरूकुलाला भेट दिली आणि एक वेगळाच आनंद अनुभवला. “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती” ह्या काव्यपंक्ती मला आठवल्या.
ज्यांना आईवडिल नाहीत किंवा ज्यांना एकल पालक आहे, अशी मुले “पसायदान” मध्ये आहेत. आपण वंचित आहोत, पोरके आहोत याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर कोठे दिसत नाही. नियमित शाळेत जाणारी, संगीत आदि कलांमध्ये रस घेणारी, आलेल्या पाहुण्यांचे चांगले आतिथ्य करणारी अत्यंत गुणी अशी ही मुले आहेत.

या गुरुकुलाला पसायदान हे नाव देण्यामागे संत ज्ञानेश्वर यांच्या प्रार्थनेचा संदर्भ आहे. ह्या प्रार्थनेव्दारे ज्ञानेश्वरांनी ईश्वराला दु:खीतांच्या जीवनातील अंधार दूर करून सर्वांना सुखी करण्याची विनवनी केली आहे. त्यास अनुरूप अनााथ, वंचित मुलांना आधार, प्रेम आणि उज्वल भविष्यासाठी शिक्षण मिळावे हाच या पसायदान गुरुकुलाचा हेतु आहे.

आश्रमाचे प्रभारी योगेश्वर वाघ यांनी या मुलांना आईवडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही. ह्या मुलांना त्यांनी आईची माया दिली. या वंचित मुलांसाठी ते खऱ्या अर्थाने माऊलीची भूमिका वठवत आहेत. वाघ यांचे आश्रमाप्रती असलेले समर्पण पाहून माझी मान आपसुकच त्यांच्या समोर झुकली. माझ्या कुटुंबियांसोबत माझा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी, माझा आनंद ह्या मुलांशी शेअर करण्यासाठी आलो होतो. त्यामुळे मला ह्या मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

पसायदान गुरूकुल सारखी संस्था उभारणारे योगेश्वर वाघ हे मूळचे वर्धा जिल्ह्याचे. ते दोन महिन्याचे असताना आईचे छत्र हरवले. पुढील संगोपनाची जबाबदारी आजी गंगुबाई यांनी स्वीकारली. ते लहानपणीच आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झाले असले तरी आजीची माया, त्याग आणि संघर्ष त्यांनी जवळून पाहिला. ते संस्कार त्यांच्यावर झाले. निराधार, वंचीत लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांनी मनोमन ठरविले. वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षणाला सुरूवात करून पुढे ते एमबीए झाले. गांधी जिल्हा अशी वर्धा जिल्ह्याची ओळख असून, गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव वाघ यांच्यावर आहे.

वाघ यांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण सामाजिक दायित्वाची मुळातच ओढ असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही. ते ज्ञानोबाच्या आळंदीला आले. तेथे त्यांना दोन निराधार मुले भेटली. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ह्यातूनच त्यांच्या मनात पसायदान गुरूकुलाचे बीज अंकुरले.

प्रारंभी वाघ यांनी या मुलांच्या निवासाची व्यवस्था पत्र्याच्या शेडमध्ये केली. अशा प्रकारे पसायदान गुरूकुलाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.

या आश्रमातील मुलांची वाढती संख्या आणि अडचणी पाहून समाजातील दानशूर मंडळींनी मदतीचा हात द्यायला सुरूवात केली. मुलांच्या खाण्यापिण्याचे, निवासाचे प्रश्न सोडविण्यास ते पुढे आले. बसवराज माटुरे यांनी आळंदीला १ हजार चौ.फु. जागा वापरण्यास दिली. पण काही काळाने ही जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे भाड्याच्या जागेत गुरुकुल हलविण्यात आले. यवतमाळ येथील महेश सावंत, सचीन कडू व त्यांचा वात्सल्य परिवार, टाटा मोटर्सचे कर्मचारी, ब्रम्हांड संस्थान, संदीप सपाट, संतोष हुसगे इ. च्या योगदानातून आळंदी जवळ १८५० चौ. फुट जागा उपलब्ध झाली आहे. पण बांधकाम होण्याची गरज आहे, त्याकरिता प्रतिक्षा आहे आर्थिक मदतीची. २ मुलांपासून सुरू झालेला पसायदानचा हा संसार आता तब्बल ७० मुलांचा झाला आहे.
आश्रमात पंचमुखी शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात आला असून, स्वावलंबन, शिस्त, शिक्षण आणि त्याबरोबरच कला, कौशल्य मुलांनी शिकावे हा आश्रमाचा प्रयत्न आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय असून, काहींनी स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे. एकंदरीतच अत्यंत अभिनंदनीय असे कार्य हे आश्रम करीत आहे.
— लेखन : रणजित चंदेल. यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800