बाल्य, शैशवापावेतो मज
बोट धरून बा तूच फिरविले
तुझ्या प्रेरणेने, इच्छेने
जगदर्शनही तूच घडविले
तुवा दिलेल्या शक्तीतुन या
इंद्रियसंवेदना जागल्या
अपूर्व संज्ञाने राखाया
तू मेंदूच्या कुप्या उघडिल्या
त्यांत नोंदले अक्षर अनुभव
अपरुग धन हे निरागसाचे
किती कालवा झाला तरिही
रूप न पुसले संस्कारांचे
पुढे धावलो पोटासाठी
उलटे वारे, अनुभव झेलत
कितीतरी त्यांतील विसरलो
गेले जे जे अंतर छेदत
हेहि मिळाले वरदानच की
भार नको तो गळून गेला
बालपणातिल गोड स्मृतींचा
अस्सल ठेवा मागे उरला
किती दूर आलो मी आता
स्वर्गसुखाचे क्षण न विसरले
उरी धरुन ते हिंडहिंडलो
तुझे बोट ना कधी सोडले
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800